धारावीतील सुविधा केंद्र मुंबईतील पहिलं नव्हे; सुविधा केंद्र ही संकल्पना आदित्य ठाकरेंची नाही

30 Dec 2025 15:17:13
Dharavi Center
 
मुंबई : ( Dharavi Center ) धारावीतील सुविधा केंद्र हे मुंबईतील पहिले सुविधा केंद्र असल्याचा आणि ही संकल्पना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचीच असल्याचा दावा त्यांनी एका सादरीकरणातून केला. मात्र सर्व तथ्ये लक्षात घेतली असता वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे आढळून येते. उपलब्ध नोंदी आणि अधिकृत माहितीच्या आधारे हे दावे चुकीचे ठरतात.
 
तत्कालीन उपनगर पालकमंत्री आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेले धारावीतील सुविधा केंद्र हे मुंबईतील पहिले सुविधा केंद्र नव्हते. प्रत्यक्षात, सुसज्ज सुविधा केंद्रांची संकल्पना एका नामांकित कंपनीच्या या सामाजिक दायित्व उपक्रमातून पुढे आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शहरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्दिष्टांनुसार, या कंपनीने हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला.सुविधा केंद्र उभारण्यामागे केवळ सामाजिक दायित्व नव्हे, तर मुंबईकरांची गरज आणि सोय हा केंद्रबिंदू होता. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका खासगी कंपनीच्या सामाजिक दायित्वातून उभ्या राहिलेल्या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
हेही वाचा : मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप! नावे समोर; कोणाला उमेदवारी?
 
२०१६ साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारसमोर ही संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर सहभागी कंपन्या यांच्या भागीदारीत सुविधा केंद्र उभारणीच्या उपक्रमाला अधिकृत सुरुवात झाली. हा उपक्रम आजही यशस्वीरीत्या सातत्याने सुरू आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांनी मुंबईत १० नवीन ‘सुविधा’ केंद्रे उभारण्यासाठी केलेल्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत घाटकोपर येथील जागृती नगरमध्ये अशा प्रकारचे पहिले सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. हा उपक्रम हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने २०१६ साली सुरू केलेल्या यशस्वी ‘सुविधा मॉडेल’वर आधारित आहे. त्यामुळे धारावीतील सुविधा केंद्र हे मुंबईतील पहिले नव्हे, तर सहावे सुविधा केंद्र होते.
 
“सुविधा केंद्र आम्हीच उभारले” किंवा “धारावीतील सुविधा केंद्र ही आमचीच संकल्पना” असे दावे वस्तुस्थितीशी जुळत नाहीत. आदित्य ठाकरे यांचे सरकार सत्तेत नसतानाही हा उपक्रम आजही वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला आहे.
 
सध्या मुंबईत २३ केंद्रे कार्यरत असून, लवकरच २४ वे केंद्र सुरू होणार आहे. मुंबईत आणखी २ केंद्रे बांधकामाधीन असून ७ केंद्रांचे प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचएसबीसी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही योजना पुढील काही वर्षांत अधिक विस्तारणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0