पाचगणीच्या पठारावरुन १८९ वनस्पतींची नोंद; ७८ प्रजाती प्रदेशनिष्ठ, तर १२ प्रजाती नष्ट

30 Dec 2025 00:35:58
panchgani table land
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या पाचगणीच्या पठारावरुन १८९ सपुष्प वनस्पतींची नोंद पुण्यातील सावित्रीबई फुले विद्यापीठ आणि रानवा संस्थेतील वनस्पतीशास्त्रज्ञांनी केली आहे (panchgani table land). विशेष म्हणजे नोंदवण्यात आलेल्या एकूण प्रजातींपैकी ४८ टक्के प्रजाती या जगात केवळ पश्चिम घाटात आढळतात (panchgani table land). नोंदवलेल्या प्रजातीपैंकी ७८ प्रजाती या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत येत असून यापूर्वीच्या अभ्यासातून नोंदवलेल्या प्रजातींपैकी १२ प्रजाती नव्या अभ्यासात न आढळल्याने त्या पठरावरुन नष्ट झाल्याची शक्यता आहे (panchgani table land). त्यामुळे हा अभ्यास पाचगणीच्या पठारावरील वनस्पतींच्या सद्यपरिस्थितीचा आढावा देणारा महत्त्वपूर्ण अभ्यास ठरला आहे. (panchgani table land)

तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या व सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबललँड म्हणतात. टेबलासारखा दिसणारा हा उंचवटा सुटा वा एकाकी असल्याने तो सभोवतालच्या भूप्रदेशात ठसठशीतपणे उठून दिसतो. कधीकधी याला खंडीय पठार वा टेबल डोंगर असेही म्हणतात. सातारा जिल्ह्यातील पाचगणीचे टेबललँड हे याचे परिचित उदाहरण आहे. पाचगणीच्या टेबललँडची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे १,३८७ मी. असून त्याच्या सपाट माथ्याचे क्षेत्र सुमारे १०० एकर आहे. या पठाराचा समावेश महाबळेश्वर-पाचगणी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात होत असून ते नैसर्गिक वारसा स्थळ देखील आहे. अशा या महत्त्वपूर्ण पठारावरील वनस्पतींच्या सर्वेक्षणाचा अभ्यास पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पीएचडी विद्यार्थी सरिता गोसावी यांनी आपल्या पीएचडी संशोधनादरम्यान केला. त्यांना मार्गदर्शन मिळाले डाॅ. अंकुर पटवर्धन, स्वप्निल व्यास आणि प्रतिक्षा मेस्त्री यांचे.

या अभ्यासामधून पाचगणीच्या पठारावरुन संशोधकांनी वनस्पतीच्या ५४ कुळातील १८९ रोपटेवजा सपुष्प वनस्पतींची नोंद केली. त्यामध्ये पोएसी कुळातील सर्वाधिक प्रजाती आढळल्या असून त्यामधील प्रदेशनिष्ठ प्रजातींची संख्या देखील सर्वात जास्त (नऊ) आहे. नोंदवलेल्या १८९ वनस्पतींपैकी ४८ टक्के म्हणजेच ७८ प्रजाती या जगात केवळ पश्चिम घाटात सापडणाऱ्या आहेत. तर १२ प्रजातींचा समावेश हा 'आययूसीएन'च्या लाल यादीत आहे. त्यामधील दिपकाडी उर्सुली आणि इपिजिनिया स्टिलाटा या प्रजाती संकटग्रस्त (एण्डडेंजर्ड) यादीतील आहेत. वनस्पतीशास्त्रज्ञ ब्लॅटर यांनी १९०९ साली या पठारावरील वनस्पतींचा अभ्यास केला होता. त्यांनी नोंदवलेल्या नोंदीशी तुलना करताना आढळलेले की, त्या काळी नोंदवलेल्या १२ प्रजाती सध्याच्या अभ्यासात आढळलेल्या नसून त्यातील दोन प्रजाती या संकटग्रस्त यादीमधील आहे. तर यापूर्वी नोंद न झालेल्या १२९ प्रजाती या आता नव्याने आढळून आलेल्या आहेत. सध्या पाचगणीच्या या पठाराला अनियंत्रित चराई आणि पर्यटनाचा मोठा धोका आहे.
पाचगणीच्या पर्यावरणीय संवेदनशील परिसंस्थेचे रक्षण व्हावे म्हणून उच्च न्यायालयाने नेमलेली सहनियंत्रण समिती याठिकाणी संवर्धनासाठी काम करत आहे. आम्ही केलेला हा अभ्यास या संवेदनशील पठारावरील वनस्पतींच्या सद्यपरिस्थितीचा हवाला मांडतो. असे अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे आपल्याला सद्यपरिस्थिती आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पर्यावरणीय उपाययोजनांची आखणी करता येते. आम्ही रानवा या संस्थेकडून या पठारावरुन नष्ट झालेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहोत. - डाॅ. अंकुर पटवर्धन, वनस्पतीशास्त्रज्ञ
Powered By Sangraha 9.0