वसाहतवादाचा सामना जगातील अनेक देशांना करावा लागला. मात्र, प्रत्येक देश हा वेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगळ्या काळात वसाहतवादाचा सामना करत होता. त्यामुळे त्याला भोगावे लागलेले परिणाम एकूणच वेगळे असलेले दिसतात. हे वेगळेपण समजल्याशिवाय या प्रवासाचे पूर्ण आकलन होणे शक्य नाही. त्यामुळे जागतिक निर्वसाहतीकरणाचा विविध अंगाने घेतलेला आढावा...
निर्वसाहतीकरणाचा विचार ही मुळातच वसाहतींच्या अनुभवांना उमटलेली प्रतिक्रिया आहे. त्यामुळे वसाहतकालीन अनुभव आणि निर्वसाहतीकरणाचे सिद्धांतन, प्रक्रिया आणि मार्ग हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. निर्वसाहतीकरणाचे जागतिक अनुभव भारतीयसंदर्भात अभ्यासताना एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी लागते, ती म्हणजे वसाहतींचे अनुभव जगभरात एकसारखेच नाहीत. त्यामध्ये काळ, वसाहतकार देश आणि स्वतःच्या वसाहतीकडे पाहण्याची त्या देशांची दृष्टी, यांचाही मोठाच प्रभाव आहे. आफ्रिकेच्या संदर्भात आपण पाहिले की, किनार्यांनी वसवलेल्या छोट्या व्यापारी वसाहतींपासून, अंतर्भागातील पूर्ण राजकीय प्रभाव ठेवणार्या सर्वंकष वसाहतींची स्थापना १९व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. राजकीय निर्वसाहतीकरणही काहीसे उशिरा म्हणजेच, ६०च्या दशकात झाले. दक्षिण अमेरिकेचा अनुभव यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. कारण ज्या काळात युरोपीय वसाहती भारतात पाय रोवत होत्या, त्या काळात दक्षिण अमेरिका स्वतंत्र होत होता. संपूर्ण जग युरोपच्या अधिपत्याखाली येत असताना, दक्षिण अमेरिका मात्र त्यातून बाहेर पडत असल्याने, तेथील निर्वसाहतीकरणाच्या विचाराला स्वातंत्र्यलढ्याचे परिमाणच नाही. दक्षिण अमेरिकेचा युरोपीय वैचारिक वसाहतवादाशी असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण संबंध, त्यांच्या निर्वसाहतीकरण विचाराला इतरांपेक्षा भिन्न बनवतो.
वसाहतीकरणाची भिन्न प्रारूपे समजून घेण्यासाठी, वसाहतीच्या अनुभवांची विभागणी चार प्रकारांमध्ये केली जाते. वसाहतीच्या भारतीय अनुभवास ‘शोषक वसाहतवाद’ म्हणतात. या प्रकारात वसाहतकार देश वसाहतीची आर्थिक पिळवणूक करतो. त्यासाठी राजकीय आणि सामरिक बळाचाही वापर करतो. यामध्ये कंपनी राज आणि प्रत्यक्ष राजसिंहासनाचे राज्य, या दोन्ही प्रकारांचा अंतर्भाव होतो. दुसरा प्रकार जो कॅनडा अथवा ऑस्ट्रेलिया या देशांना लागू पडतो, त्याला ‘स्थायिक वसाहतवाद’ म्हणतात. या प्रकारात वसाहत स्थापन करणारा समाज, नवीन ठिकाणी स्थायिक होतो आणि हळूहळू तेथील प्रभुत्व प्राप्त करतो. कालांतराने हा समाज मूळ वसाहती राष्ट्रापासून स्वातंत्र्य घोषित करतो; परंतु या स्वातंत्र्यात मूलनिवासींना विशेष स्थान नसते. तिसरा प्रकार ‘दूरस्थ वसाहतवाद.’ या प्रकारात वसाहतीवर प्रत्यक्ष सत्ता कधी प्रस्थापित केली जात नाही; परंतु तेथील स्थानिक राज्यकर्त्यांना अंकित करून, वसाहतकार देशाला सोयीची असलेली धोरणे राबवली जातात. या प्रकारात वसाहतकार देशातील व्यक्तींना, वसाहतीत जाऊन मोठे उद्योग उभारण्यास प्रवृत्त केले जाते आणि या व्यक्ती स्थानिक धोरणनिर्मितीत महत्त्वाची भूमिकाही बजावतात. बरेचदा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्ता या गटाच्याच हातात जाते. दक्षिण आफ्रिका याच प्रकारच्या वसाहतीकरणाचे प्रमुख उदाहरण समजले जाते.
वसाहतीकरणाचा चौथा प्रकार निर्वसाहतीकरणाचे स्वरूप आणि आवाका समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या प्रकाराला ‘आंतरिक वसाहतीकरण’ असे म्हटले जाते. युरोपला वसाहतवादासाठीच्या आरोपाच्या पिंजर्यात एकटेच उभे राहायला लागू नये, म्हणूनच हा चौथा प्रकार निर्माण केलेला असावा असा संशय त्याच्याच उदाहरणांवरून येतो. नेहमीचे उदाहरण म्हणजेच चीनने बळकावलेले तिबेटचे राष्ट्र; परंतु मुळात हा वसाहतवादाचा प्रकार कोणत्याही समाजातील प्रभुत्ववान गटाने, प्रभुत्वहीन गटावर लादलेल्या तथाकथित वर्चस्वाचा विचार मांडतो आणि त्याही निर्वसाहतीकरणाची मनीषा बाळगतो. बरेचदा हे नसलेल्या भेदांना निर्माण करून, अवास्तव दुभंग निर्माण करणे ठरू शकते. भारतीय निर्वसाहतीकरण विचाराने या प्रकाराचे प्रत्युत्तर, स्वतंत्र चिंतनाद्वारे निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंडांचा वसाहतीकरणाचा इतिहास, हा साधारण १५व्या शतकातील कोलंबसच्या मोहिमेपासून सुरू होतो. युरोपच्या आकलनानुसार, ’नव्या जगाचा’ शोध लागल्यानंतर तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर हक्क कोणाचा? याचे दावे युरोपीय राष्ट्रांत सुरू झाले. अमेरिकेत पोहोचलेले पहिले दर्यावर्दी स्पॅनिश आणि पोर्तुगीज होते. या दोन सत्तांच्या मध्ये झालेल्या १५व्या आणि १६व्या शतकातील करारांच्या आधारे दक्षिण अमेरिकेच्या भूभागांचे विभाजन होऊन, ब्राझील पोर्तुगालच्या वाट्याला आणि पश्चिम किनार्याचे देश स्पेनच्या वाट्याला गेले. स्थानिक अमेरिकन समाजांना या दोन्ही सत्तांनी आपले अंकित बनवून, अमेरिकेतील साधनसंपत्तीवर एकाधिकार मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अमेरिकेतील इंका, माया आदि संस्कृती युरोपियनांच्या सामरिकशक्तीपुढे तर थिट्या पडल्याच; पण युरोपियनांनी आणलेले देवीसारखे रोगही त्यांच्यासाठी नवीनच होते. त्यामुळे अनेक नवीन साथीच्या रोगांनी त्यांची लोकसंख्या घटत, हळूहळू अमेरिका खंडात युरोपियनांचे आधिय निर्माण झाले. अशाप्रकारे दक्षिण अमेरिकेतील वसाहतवाद हा एकप्रकारे ‘स्थायिक वसाहतवाद’ आणि ‘शोषक वसाहतवाद’ या दोन्हीचा संकर होता.
१६व्या शतकात स्थापन झालेल्या वसाहतींनी, पुढील २०० वर्षांत संपूर्ण दक्षिण अमेरिकेत जम बसवला आणि त्यातूनच त्यांचा स्थानिक मूलनिवासींशी संकर होऊन, मिश्र प्रजाही निर्माण झाली. त्यात भर पडली, ती आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेल्या कृष्णवर्णीय लोकांची. त्यामुळे दक्षिण अमेरिका हे एकप्रकारे वर्णसंकराचे आगरच ठरले. त्यातही युरोपियन वंशाच्या लोकांमध्ये दोन भेद होते. स्पेनमध्ये जन्मलेले लोक अमेरिकेत जन्मलेल्या, ‘क्रिओलो’ म्हणवल्या जाणार्या युरोपियनांना कनिष्ठ समजत. युरोपीय आणि मूलनिवासी यांच्या मिश्र प्रजातीस ‘मेस्टिझो’ म्हणत, आणि ती त्याहून खालची ‘कास्टा’ होती. त्यानंतर आफ्रिकन कृष्णवर्णीय आणि त्यांच्या मूलनिवासींच्या बरोबर झालेल्या संकरातून निर्माण झालेल्या मिश्र कास्टा येत. (भारतातील जातिव्यवस्थेला दिलेले ‘कास्ट’ हे इंग्रजी नामाभिधान या ‘कास्टा’ संकल्पनेतून आले आहे.) २०० वर्षांत या ’कास्टा’ पद्धतीचा जम पूर्ण दक्षिण अमेरिकाभर बसलेला होता.
युरोपसाठीसुद्धा रबर, कापूस, साखर, लाकूड, कॉफी यांसारखा कच्चा माल स्वस्तात पुरवणारी ही वसाहत, भारत आणि चीनसारख्या बलाढ्य आशियाई देशांशी व्यापार करण्यास अतिशय फायदेशीर व्यवस्था होती. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धानंतर या परिस्थितीत किंचित फरक होऊन, ‘क्रिओलो’ समाजाला युरोपीय शासनकर्त्यांपासून स्वतंत्र व्हावेसे वाटू लागले. नेपोलियनद्वारे झालेल्या पोर्तुगालच्या राजाच्या पराभवामुळे आणि त्यापाठोपाठ राजा स्वतः ब्राझीलमध्ये स्थलांतरित झाल्याने, हा फरक अधिकच जाणवू लागला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर १९व्या शतकाच्या पूर्वार्धात, अनेक दक्षिण अमेरिकन देशांनी युरोपीय सत्तांपासून मुक्ती घोषित केली. परंतु या राजकीय स्वातंत्र्यानंतर सर्व प्रशासनव्यवस्था क्रिओलोंच्या हातात जाऊन, वसाहतवादी चौकट आणि समाजव्यवहारांच्या पद्धती तशाच राहिल्या. शोषकवर्ग बदलला; पण ‘मेस्टिझो’ आणि अन्य ‘कास्टां’ची परिस्थिती तशीच राहिली. दुसरे म्हणजे ‘कच्च्या मालाचा पुरवठादार’ ही दक्षिण अमेरिकेची ओळख, स्वातंत्र्यानंतरही तशीच राहिली. या सर्व परिस्थितीमुळे स्वातंत्र्यानंतरचा काळ, दक्षिण अमेरिकेसाठी मोठा धामधुमीचा ठरला आणि युरोपीय देशांवर आणि नव्याने उदयास आलेल्या अमेरिकन राष्ट्रावर आर्थिक अवलंबित्व कायम राहिले. अमेरिकेतील १९३०ची महामंदी आणि त्याच्या मागेपुढे झालेली दोन महायुद्धे यांनी, कच्च्या मालाच्या पुरवठादार दक्षिण अमेरिकेस मोठाच आर्थिक हादरा बसला.
स्वातंत्र्यानंतर एका छोट्या गटाच्या हातात राहिलेली अर्थव्यवस्था, औद्योगिकीकरणाच्या अभावाने मानवी श्रमाधारित शेतीसारख्या उद्योगांवर अवलंबित्व आणि दुसर्या महायुद्धा नंतर भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी रशिया अशी जगाची झालेली विभागणी, ही पार्श्वभूमी दक्षिण अमेरिकेच्या निर्वसाहतीकरण चिंतनास आहे. दीर्घकालीन राजकीयस्वातंत्र्य; परंतु आधी युरोप आणि नंतर अमेरिका यांच्याद्वारे आर्थिक पारतंत्र्य, स्वदेशातही मूठभर उच्चवर्गीयांचे सर्व व्यवस्थांवरील आधिपत्य यातूनच, दक्षिण अमेरिकन चिंतन हे डाव्या बाजूस झुकलेले आपल्याला आढळते. कॅस्ट्रो चे गव्हेरा, साल्वाडोर अलेंदे इत्यादि नेत्यांनी जो विचार युद्धोत्तर काळात राजकीय परिघात मांडायला सुरुवात केली, त्याचेच प्रतिबिंब दक्षिण अमेरिकेच्या निर्वसाहतीकरण विचारातही आहे. प्रत्यक्ष लढ्याचा अभाव असल्याने असेल; पण या भागातील चिंतन हे अधिक सैद्धांतिक स्वरूपाकडे झुकते. त्यामुळे निर्वसाहतीकरण या विषयाची सैद्धांतिक भूमिका, शैक्षणिक अवकाशात मांडण्याचा मान पेरूव्हियन प्राध्यापक अनिबाल कीहानो यांना दिला जातो. कीहानो यांनी सर्वप्रथम मानसिक आणि वैचारिक वसाहतवाद आणि निर्वसाहतीकरण या संकल्पना मांडल्या. वसाहतकार देश त्यांच्या विचारचौकटी वसाहतींवर लागू करून, त्यांची ज्ञानपरंपरा कशी नष्ट करत आणि संपूर्ण निर्वसाहतीकरणासाठी या ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन कसे आवश्यक आहे, याचे सिद्धांतन कीहानो आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.
कीहानो त्यांचा निर्वसाहतीकरणाचा सिद्धांत मांडताना ‘चिकित्सा’ सिद्धांताचा आधार घेतात; परंतु ते या सिद्धांताला वंश (ीरलश), कास्टा आणि वसाहतकार देशांचा उच्चवर्चस्ववाद यांची जोड देतात. थोडयात, वसाहतींच्या परिप्रेक्ष्यात सांस्कृतिक साम्यवादाचे उपयोजन, कीहानो यांचा निर्वसाहतीकरणाचा सिद्धांत मांडतो. सांस्कृतिक शोषितांची भूमिका मूलनिवासी संस्कृतींकडे येते आणि त्यांची भाषा, चित्र व शिल्पकला, गणित आणि एकंदरीत ज्ञानपरंपरा यांचा सन्मान आणि जोपासना यांची मागणी त्यातूनच येते. ब्राझिलियन विचारवंत फ्रेरे शिक्षणप्रक्रियेवरील वसाहतकालीन प्रभाव आणि त्यातून चालत आलेली स्थानिक संस्कृतीच्या दमनाची परंपरा याचे विवेचन करून, शिक्षणाच्या निर्वसाहतीकरणाचा विचार मांडतात.
निर्वसाहतीकरणाच्या या सिद्धांतनाचा सखोल परिचय, त्याचा भारतीय परिप्रेक्ष्यात आकलन करून घेण्यासाठी आवश्यक आहे. सांगोपांग मांडणीसाठी शैक्षणिकव्यवस्थेतील स्थिरता लाभल्याने हे सिद्धांतन दार्शनिकदृष्ट्या अधिक सखोल भासते; परंतु प्रत्यक्षात हे चिंतन सर्वच पूर्ववसाहतींना लागू पडते का? हे तपासून घ्यायला हवे. प्रत्येक राष्ट्राचे जसे वसाहतकाळातील अनुभव वेगळे आहेत, तसेच त्यापूर्वीच्या इतिहासातील प्रत्येक संस्कृतीचा प्रवासही वेगळा आहे. त्या प्राचीन सांस्कृतिक मूल्यांचे जतन होण्याचे प्रमाणही वेगळे आहे आणि त्या मूल्यांच्या कालसुसंगततेची चिकित्साही समान पद्धतीने करणे शय नाही. निर्वसाहतीकरणाचा मूळ विचार हा एकप्रकारे स्थानिकतेला जपणे हाच आहे. त्यामुळे त्याचे वैश्विक सिद्धांतन मान्य करणे, स्वतःमध्येच एक विरोधाभास ठरेल.
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून ‘खगोलशास्त्रा’त ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)