
नांदेडमध्ये सक्षम ताटे याचा झालेला खून, नंतर त्याची प्रेयसी आचल मामिलवारने त्याच्या मृतदेहासमोर स्वतःला कुंकू लावणे, सक्षमच्याच घरी राहण्याचा तिने घेतलेला निर्णय, त्यानंतर माझ्या आईबाबांना फाशी द्या असे तिचे म्हणणे, याबद्दल समाजमाध्यमांवर अखंड चर्चासत्र सुरू आहे. ९९.९९ टक्के लोकांनी आचलच्या वर्तणुकीला बेजबाबदार ठरवत, तिच्या पालकांबद्दल दुःख आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे समर्थनही केले आहे. मात्र त्याचवेळी आचलच्या वर्तणुकीबाबतीत भयंकर विरोधी मत व्यक्त केले आहे, असे का? काही लोक म्हणतात, आचलचे प्रेम होते तर तिने हे सगळे घडण्याची वाटच का पाहिली? यावर काही लोक म्हणतात की, सक्षम तुरुंगातून नुकताच सुटला होता. त्यामुळे तिला त्याच्याशी विवाह करता आला नसेल. काही लोक म्हणतात, तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीसोबत, पालकांनी आचलचा विवाह धूमधडाक्यात लावायला हवा होता का? काही लोक म्हणतात की, कितीही जवळची व्यक्ती मृत्यू पावली, तरी काळ मृत्यूचे दुःख विसरायला लावतो. आचल किती दिवस सक्षमच्या दुःखात राहणार? काही लोक म्हणतात, मुलीच्या काळजीपोटी त्यांनी कायदा हातात घेतला; तर काही लोक म्हणतात, स्वतःच्या मुलीला आवरायचे होते, दुसर्याच्या लेकराचा जीव का घेतला...? वगैर वगैरे.
यावर वाटते की, जातीयभेदामुळे किंवा इतरही कारणांमुळे प्रेमाच्या विरोधाआड आणखीन किती जीव बळी जाणार आहेत? हे प्रकरण मामिलवार आणि ताटे कुटुंब अन्य मार्गाने अजून चांगल्याप्रकारे हाताळू शकत होते. सक्षमचा खून करून, आचलच्या पालकांना काय मिळाले, आयुष्यभराची वाताहत आणि दुःख. आकर्षण, लैंगिक संबंध, सिनेमात प्रेमाच्या नावाने दाखवलेली बटबटीत अतार्किकता, यातून जे काही विचार निर्माण होतात, ते म्हणजे प्रेम असते का? ‘पहला प्यार’, ’प्यार हैं तो रुखीसुखी रोटी खाके जी लेंगे’, ‘जिऊंगी तुम्हारे साथ, मरुंगी तुम्हारे साथ’, ‘तुम मेरी नही हो सकती, तो किसी की नही’, हे सिनेमातले संवाद प्रत्यक्ष जीवनात किती काळ टिकतात? खरेतर खर्या जीवनात प्रेमाची चांदणी काही दिवस असते, तर जगण्यातल्या अस्तित्वाचा सूर्य कायम असतो. जगण्याच्या अस्तित्वाचा सूर्य शाश्वत आहे, बाकी सगळी ‘चार दिन की चांदणी’! तूर्तास आचलचे भविष्य काय असेल? हा प्रश्नही यामुळे निर्माण होत आहे.
आइए, आपका इंतजार था!
जरा तरी माणसाने सबुरी घ्यावी. होते ना मी बोलायला; पण नाही. मी टीव्ही चॅनेलवर दिसत होते, पत्रकार माझ्याशी बोलत होते, हे आता संपलं, आले ते परत. आता ते परत आले म्हटल्यावर माझा बाईट कोण घेणार,” असा प्रश्न ‘दिवा फडफडतो’फेम पेडणेकर आणि कट्टर हिंदुत्वद्वेष्ट्या अंधारे यांना पडला असेल का? कारण काही दिवसांपूर्वीच माध्यमांवर, या दोघीजणी राऊतांची कमी भासू नये, यासाठी हिरिरीने पुढे आल्या होत्या. या दोघींच्या मनात असे असेल का? की, ”तेव्हा आमचा काय तो थाट? काय ते बोलणे होते? तेव्हा मैदान मोकळे होते. आता आल्या-आल्या त्यांनी, शाह-फडणवीस-शिंदे नामाचा जप सुरू केला. मग, आम्ही काय करायचं मेलं?” तर दुसरीकडे राऊतांच्याही मनात सुरू असेल का? की, "मागे काही दिवसांपूर्वी तुरुंगात गेलो, तेव्हाही या दोघी संधी साधून मीडियाच्या पुढेपुढे करत होत्या. आता थोडा आजारी पडलो, तरीसुद्धा यांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला; पण माझ्यासारख्या ‘चु‘ या शब्दाने सुरू होणार्या शिव्या या काय देतील?” अर्थात, ते काय बोलतील हा कल्पनाविलासच आहे.
याअनुषंगाने सध्या अंधारे यांचे बोलणे ऐकले तर जाणवते की, आपण एकनिष्ठ, समाजशील, धार्मिक आहोत, हे दाखवण्यासाठी अंधारे यांचा आटापिटा चाललेला असतो. पण, वर्षानुवर्षे केलेला हिंदूंचा द्वेष, मत्सर अचानक मनातून निघून गेला? असे होणे शक्यच नाही. वारीत चपात्या लाटण्याचे नाटक करणे आणि मनात देवा-धर्माविषयी भक्तिभाव असणे, या दोन्हींमध्ये परक असतो. असो! मुद्दा असा की, संजय राऊत इज बॅक! उबाठाची धगधगती तोफ पुन्हा मैदानात वगैरे वगैरे शब्दांनी ‘उबाठा’समर्थक त्यांचे स्वागत करत आहेत. ‘राठा’ आणि ‘उबाठा’ हे दोघे भाऊही खूप आनंदित झाले, हे नक्की; पण त्यांच्यासोबत ‘कमळवाले’ही खूश झाले असतील. कारण लोक म्हणतात की, राहुल गांधी आहेत म्हणून भाजपला देशभरात जसा फायदा होतो, ते जसे भाजपचे ‘स्टार प्रचारक’ ठरतात; तसेच संजय राऊतसुद्धा काही कमी नाहीत. त्यामुळे त्यांच्या येण्याने राठा-उबाठा इतकेच, भाजपवालेही खूश झाले असतील. त्यांच्या मनातही सुरू असेल का? की, ‘आइए, आपका इंतजार था!’