मुंबई : (Pannalal Surana) ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा (९३) यांचे मंगळवारी दि. २ डिसेंबर रोजी नळदुर्ग येथील आपल्या निवासस्थानी निधन झाले. रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाल्यामुळे त्यांना सोलापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले, "सुराणा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचा वसा जपला. त्यांनी राजकीय क्षेत्रातही आदर्शवाद जोपासला. शेती, शेतकरी यांच्यासह पर्यावरण रक्षण, जलसंधारण यांच्यासाठी ते अखेरपर्यंत व्रतस्थपणे कार्यरत राहिले. नळदुर्ग येथील 'आपलं घर' बालगृह व शाळेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो अनाथ मुलांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणली. त्यांची निस्पृह आणि आदर्श अशी जीवनशैली समाजकारण - राजकारणातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांचे निधन महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारण क्षेत्राची हानी आहे. सुराणा यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते या सर्वांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पन्नालाल सुराणा यांच्याविषयी...
पन्नालाल सुराणा (Pannalal Surana) यांचा जन्म ९ जुलै १९३३ रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे झाला. बार्शीत शिक्षण घेत असतानाच ते राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले. पुढे तरुण वयात ते बिहारमधील सोखादेवरा येथील जयप्रकाश नारायण यांच्या सर्वोदय आश्रमात वास्तव्यास होते. विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात सक्रिय होते. समाज-राजकारण, शिक्षण, शेती आणि बेरोजगारी यांसारख्या विषयांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रवासाची सुरूवात झाली. पत्नी डॉ. वीणा यांच्यासह ते बराच काळ बिहारमध्येच राहत होते. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पुढे त्यांनी समाजवादी पक्षात सक्रिय काम पाहिले आणि नंतर जनता पक्षाचे प्रदेश सचिव म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.
आयुष्यभर समाजवादी विचारांची पताका गौरवाने मिरवणारे, अनेक लोक चळवळीत सहभाग घेणारे, सत्तेच्या पदासाठी कधीही आग्रह न धरणारे, निःस्वार्थी लोकनेता अशीच त्यांची ओळख होती. समाजवादी विचारांची ही धगधगती मशाल अखेर शांत झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करणाऱ्या सुराणा यांनी निधनानंतर देहदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे देहदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोलापूरसह संपूर्ण राज्यात शोक आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.