‘जनकल्याण समिती’चा दिव्यांग सक्षमीकरण प्रवास

    03-Dec-2025
Total Views |
 
Divyang
 
रा. स्व. संघ प्रेरणेने ‘जनकल्याण समिती’ (महाराष्ट्र प्रदेश) आणि संवेदना प्रकल्प यांनी महाराष्ट्रात उभारलेल्या दिव्यांग सक्षमीकरणाच्या व्यापक कार्याचा आढावा घेताना स्पष्ट जाणवते की, समाजातील सर्वांत संवेदनशील घटकांसाठी उभारलेली ही सेवा फक्त आरोग्य-शिक्षण-पुनर्वसनापुरती मर्यादित नसून आत्मसन्मान, स्वावलंबन आणि अधिकारांच्या संरक्षणाकडे नेणारा मानवी सक्षमीकरणाचा प्रवास आहे. ग्रामीण-शहरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत, बौद्धिक-शारीरिक-बहुविकलांग प्रवर्गापासून थॅलेसिमिया रुग्णांपर्यंत समितीचे कार्य हे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपयर्अंत पोहोचणार्‍या सर्वसमावेशक सेवेचे उदाहरण ठरते. आज जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’वतीने घेतलेला मागोवा.
 
हाराष्ट्रभर दिव्यांग सक्षमीकरणाची सर्वसमावेशक श्रृंखला उभारण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रेरित ‘जनकल्याण समिती’ने प्रत्यक्ष सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून प्रभावीपणे पुढे नेले आहे. राज्यातील ग्रामीण-शहरी सर्वच जिल्ह्यांमध्ये थेरपी, शिक्षण, पुनर्वसन, कौशल्यविकास, रोजगारक्षम प्रशिक्षण, कृत्रिम अवयव वितरण आणि योजनांसाठी मार्गदर्शनया सर्वांची एकत्रित व्यवस्था निर्माण करण्याचा समितीचा प्रयत्न दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमानात नवा सकारात्मक बदल घडवत आहे.
 
मुंबई उपनगर जिल्ह्यात २०२४ पासून सुरू झालेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामुळे (डीडीआरसी) महानगरातील हजारो दिव्यांगांना प्रथमच एका जागी सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत. फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, मानसोपचार, ऑयुपेशनल थेरपी, प्रमाणपत्र प्रक्रिया, साहाय्यक साधनांची मोजमाप तपासणी, तक्रार निवारण व शासकीय योजनांपर्यंत पोहोच अशा अनेक अत्यावश्यक सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणावर देण्याचा प्रयत्न सुरू आहे . अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेसमध्ये जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित भव्य शिबिरात मोटाराईज्ड ट्रायसायकल, अ‍ॅडव्हान्स व्हीलचेअर, स्मार्ट केन, श्रवणयंत्रे आणि विविध कृत्रिम अवयवांचे मोफत वितरण झाले. विशेषतः उपनगरातील झोपडवस्ती, अल्पभूधारक कुटुंबे, स्थलांतरित गट आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला.
 
याच ‘डीडीआरसी’तर्फे दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा लाभ एक हजारपेक्षा अधिक दिव्यांगांनी घेतला. याचवेळी ‘डीडीआरसी’च्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. https://ddrcmumbaidivyang.org. या माध्यमातून दिव्यांगांना ऑनलाईन नोंदणी करून स्वतःची माहिती टाकता येते, समस्या-अडचणी कळवता येतात आणि आवश्यक मदतीसाठी विनंती करता येते. ‘डीडीआरसी’मार्फत दिव्यांग प्रमाणपत्र, निरामय आरोग्य विमा योजना आणि विविध शासकीय लाभांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मदतीसाठी संपर्क : ७२६२-०३६७२६.
 
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात ‘संवेदना प्रकल्पा’द्वारे दिव्यांग पुनर्वसनाची मजबूत पायाभरणी झाली आहे. हरंगुळ (बु.) येथील संवेदना ‘सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र’ हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विकसित शैक्षणिक-उपचार केंद्र आहे. बौद्धिक दिव्यांग, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेली अडथळामुक्त इमारत, ८० क्षमतेची वर्गव्यवस्था, विशेष शिक्षक, क्रीडा-संगीत-नृत्य उपक्रम आणि दहावी परीक्षेसाठीच्या सुविधा पालकांना सातत्यपूर्ण आधार देतात.
प्रौढ दिव्यांगांसाठी नदी हत्तरगा (ता. निलंगा) येथील ‘घरोंदा केंद्र’ निवासी व व्यवसायाधारित प्रशिक्षण देते. शेती आधारित उत्पादन, फूलशेती, गोशाळा, कापड-शिवणकाम, पेपर कप उत्पादन या उपक्रमांतून रोजगारक्षम कौशल्ये विकसित केली जातात. ग्रामीण व भूकंपग्रस्त भागांसाठी वैद्यकीय शिबिरे, उपचार आणि साहाय्यक साधनांचे वितरणही सातत्याने चालू आहे.
लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने आतापर्यंत ३० हजारांहून अधिक दिव्यांगांना थेरपी, प्रमाणपत्र प्रक्रिया आणि योजनांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, मानसोपचार, नियमित तपासणी शिबिरे यामुळे येथे तातडीची आणि दीर्घकालीन मदत मिळते.
 
याच परिसरातील संवेदना ‘दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ भारतातील दिव्यांगांसाठीची पहिली ‘डीजीटी’ मान्यताप्राप्त ‘आयटीआय’ आहे. इलेट्रिशियन, इलेट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेसमेकिंग आणि कॉम्प्युटर ऑपरेटर ट्रेडमध्ये राज्यभरातील १३२ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. २०२४-२५ मध्ये १०० टक्के निकाल लागला आणि ‘हिंदुस्थान एअरोनॉटिस लिमिटेड’सह विविध उद्योगांमध्ये अप्रेंटिसशिप संधी मिळाल्याने रोजगारक्षमता वाढली आहे. २०२१ पासून राष्ट्रीय न्यासाने ‘जनकल्याण समिती’च्या संवेदना प्रकल्पास महाराष्ट्रातील स्टेट नोडल एजन्सीची जबाबदारी दिली. त्यामुळे बौद्धिक दिव्यांगांसाठी स्थानिक स्तर समित्यांचे काम अधिक प्रभावी झाले. लातूर, धाराशिव, बीड अशा जिल्ह्यांमध्ये प्रकरणांची तपासणी, सेवांचा पाठपुरावा आणि योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित नोंदवली जाते.
 
२०२० मध्ये लातूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि अलीमकोच्या सहकार्याने आयोजित भव्य शिबिरात १२ हजार, ८८८ दिव्यांगांची तपासणी आणि ८ हजार, ९७० पात्र लाभार्थ्यांना उच्च-तंत्र साहाय्यक साधनांचे वितरण झाले. तसेच दिव्यांग व्यक्तींचे ऑनलाईन सर्वेक्षण पोर्टल तयार करून योजनांपर्यंत पोहोच अधिक सोपी झाली. ग्रामीण भागातील पालकांसाठी आयोजित पाच दिवसांच्या निवासी प्रशिक्षणात स्पीचथेरपी, फिजिओथेरपी, लिनिकल सायकोलॉजी, न्यूरो सल्ला, प्रमाणपत्र प्रक्रिया, खाते उघडणे, दिव्यांग हक्क आणि योजना याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जाते.राष्ट्रीय संस्थांशी असलेल्या संलग्नतेमुळे सेवांचा दर्जा उंचावत आहे. समितीच्या रक्तपेढ्यांमार्फत थॅलेसिमिया रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो आणि पुढील दहा वर्षांत थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र हा समितीचा संकल्प आहे.
 
दिव्यांग पुनर्वसनाच्या वैज्ञानिक, संवेदनशील आणि समावेशक कार्यामुळे ‘जनकल्याण समिती’ने महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक विकासात एक दृढ, विश्वासार्ह आणि प्रेरणादायी आधारस्तंभ उभारला आहे.
मुंबई उपनगरातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी करण्यासाठी उपचार, प्रशिक्षण, साहाय्यक साधने आणि योजनांचे लाभ या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे आमचे कार्य सातत्याने सुरू आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती सक्षम होऊन समाजाच्या विकासात योगदान देऊ शकते, हा आमचा ठाम विश्वास आहे. समाजातील मान्यवर आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे उपक्रम अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे.
 
विवेक आचार्य
अध्यक्ष, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मुंबई उपनगर
 
 
-  सागर देवरे