बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ’दित्वाह’ नावाच्या चक्रीवादळाची सध्या प्रचंड चर्चा आहे. श्रीलंका, इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये या चक्रीवादळाने प्रचंड विध्वंस केला असून, यादरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलनात ९०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ‘डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर’च्या मते, आतापर्यंत तीन लाखांहून अधिक कुटुंबांचेही नुकसान यामध्ये झाले आहे. त्यामुळे ’दित्वाह’ चक्रीवादळ ही गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे. २००४ दरम्यान झालेल्या भयावह त्सुनामीमध्ये, ३१ हजार जणांचा मृत्यू झाला होता; त्यानंतरची ही सर्वात मोठी आपत्ती आहे. ‘दित्वाह’ या नावाचा अर्थ ‘खाडी’ असा होतो. हे नाव येमेन या देशाने सुचवले होते. यमनच्या ‘सोकोट्रा’ बेटावर असलेल्या ’दित्वाह खाडी’च्या नावावरून, या वादळाला नाव देण्यात आले आहे. ही खाडी तिच्या किनार्यावरील परिसंस्थेसाठी जगभर ओळखली जाते.
दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील भागात, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी, तसेच दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनार्यांवरही या चक्रीवादळामुळे मोठे दाबाचे क्षेत्र तयार झालेे. या दाबाचे केंद्र अवघ्या सहा तासांत, सुमारे तीन किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले. या चक्रीवादळाचे केंद्र उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी किनार्यापासून, सुमारे ३५ किमी अंतरावर होते. सध्या हे चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरी किनार्याजवळ पोहोचल्यानंतर कमकुवत झाले असून, हळूहळू निम्नदाबक्षेत्रात परिवर्तित होण्याची शयता आहे. यादरम्यान, सतर्कता म्हणून १०३ बचावनौकांची तैनाती करण्यात आली होतीच, तसेच बचावकार्यही अव्याहतपणे सुरु होते.
कोणत्याही संकटाच्या काळात भारत अनेकदा, संकटग्रस्त राष्ट्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. भारताच्या या भुमिकेनुसारच दि. २८ नोव्हेंबर रोजी ‘ऑपरेशन सागर बंधू’देखील सुरू करण्यात आले. हा भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाचाच एक भाग आहे. या मोहिमेंतर्गत भारतीय नौदलाचे विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि युद्धनौका ‘आयएनएस उदयगिरी’ श्रीलंकेच्या कोलंबो येथे दाखल झाली आहे. त्यानंतर दि. २९ नोव्हेंबर रोजी, भारतीय वायुदलाच्या ‘सी-१३० जे’ विमानाद्वारे भरताने श्रीलंकेला, सुमारे १२ टन जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवली. ‘दित्वाह’मुळे श्रीलंकेतील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला असून, या आपत्तीच्या काळात ‘स्टारलिंक’ने प्रभावित भागात मोफत इंटरनेट पुरवण्याची घोषणाही केली.
’दित्वाह’ चक्रीवादळाचा प्रभाव इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या दक्षिण-पूर्व आशियातील देशांवरही पडला असून, या देशांमध्येही मोठी हानी झाली आहे. यामध्ये ४६० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले अह्हे. इंडोनेशिया आणि थायलंडमधील मृत्यूंचा आकडा, हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक आहे. साधारण तीन हजार ५०० पोलीस कर्मचारी, शोधकार्य आणि मदतकार्यात गुंतले आहेत.
‘दित्वाह’सारखी परिस्थिती यापूर्वीही अनेकवेळा बंगालच्या उपसागरात निर्माण झाली आहे. बंगालचा उपसागर हा जगातील सर्वाधिक चक्रीवादळ-प्रवण भागांपैकी एक. येथे निर्माण होणारी उष्णकटिबंधीय वादळे बहुतेकदा दक्षिण भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार या प्रदेशांना प्रभावित करतात. २०२०चे ‘निवार’, २०१६चे ‘वरदा’, २०१८चे ‘गाजा’ ही चक्रीवादळे त्यांपैकी काही उदाहरणे. मग ‘दित्वाह’ इतके गंभीर का? तर या वादळामुळे भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड ह देश एकाचवेळी प्रभावित झाले. भूस्खलन, पूर, समुद्री भरती या तिन्हींचा संयुक्त परिणाम यादरम्यान दिसून आला. म्हणूनच ‘दित्वाहा’चा परिणाम अधिक व्यापक आहे.
त्यामुळे किनारी भागात राहाणार्यांनी काळजी घेणे आवश्यक झाले अहे. अशाप्रकारची चक्रीवादळे जवळ येत असल्यास सुरक्षितस्थळी हलण्याची तयारी ठेवावी; जोरदार वारे आणि पावसात घराबाहेर न पडणे; विद्युत खांब, झाडे किंवा पाण्यातील तारा यांच्या संपर्कापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या स्थलांतराच्या सूचनेला त्वरित सहकार्य करणे आणि अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीनुसार वागणे, हेच चक्रिवादळाच्या वेळी सुरक्षित राहण्याचे सर्वोत्तम मार्ग मानले जातात.