भारतीय संविधान - एक राष्ट्र कवच

03 Dec 2025 11:37:44
 
Constitution
 
‘सन्मित्र सेवा मंडळा’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त संविधानासदर्भात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मुलुंडच्या सु. ल. गद्रे सभागृह, ‘महाराष्ट्र सेवा संघा’मध्ये हा कार्यक्रम होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भरद आमदापुरे, फैज खान, राधाकृष्ण पिल्लई, अ‍ॅड. गार्गी चिखलीकर हे मान्यवर होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून चंद्रशेखर वझे आणि मी उपस्थित होतो. या कार्यक्रमासाठी ‘मुलुंड सार्वजनिक उत्सव विकास समिती’, ‘आई जगदंब प्रतिष्ठान’, ‘एकनिष्ठ प्रतिष्ठान’, ‘मराठा मंडळ’, ‘पाठीराखा प्रतिष्ठान’ या संस्था सहयोगी संस्था म्हणून सहभागी होत्या. या कार्यक्रमाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
माझ्यामध्ये असलेला दोष माझ्या बापाला आढळल्यानंतर त्यांनी मला घराबाहेर काढले; परंतु आज मी तुमच्यासमोर अशी अभिमानाने आणि आत्मविश्वासपूर्वक उभी आहे, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे,”असे भावपूर्ण उत्कट उद्गार ‘ट्रान्सजेंडर कम्युनिटी’च्या हक्कांसाठी संघर्ष करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. गार्गी चिखलीकर यांनी काढले. त्यांनी याचे श्रेय त्यांच्या गुरूंना आणि सामाजिक कार्यकर्ता केशव जोशी यांनाही दिले. मुलुंड येथे ‘सन्मित्र सेवा मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र सेवा संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष व भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. "किन्नर समाजाविषयी सर्वसामान्य समाजात असलेल्या गैरसमजांविषयी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून प्रबोधन होऊ शकते व त्यासाठी मला तुमच्यासमोर संवाद करता येत आहे,” असे समाधान अ‍ॅड. गार्गी चिखलीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
 
या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय मुस्लीम मंचा’चे राष्ट्रीय संयोजक फैज खान, तरुण तुर्क सामाजिक कार्यकर्ते भरत अमदापुरे आणि सनातन संस्कृतीचे अभ्यासक डॉ. राधाकृष्ण पिल्ले यांच्यासारख्या नामवंतांचे वैचारिक मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. ‘
‘वन्दे मातरम्’च्या उच्चाराने कोणत्याही मुसलमानांच्या भावनांना ठेच बसण्याचे कारण काय?” असा प्रश्न विचारत "मातृभूमीविषयीच्या उत्कट प्रेमाला व्यक्त करणे, हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून राष्ट्रभक्तीचा तो उत्स्फूर्त आविष्कार आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन फैजखान यांनी याप्रसंगी व्यक्त केले. "अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे शब्दप्रयोग समाजामध्ये विभाजन घडवू शकतात, हे आपण टाळले पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला. "मी अनेक इस्लामी राष्ट्रांमध्ये प्रवास केलेला आहे. तिथली प्रत्येक मुसलमान व्यक्ती ज्या देशांमध्ये राहते, त्या देशाशी इमान राखण्याचा प्रयत्न करत असते. आपण हिंदू समाजाबरोबर साहचर्याने राहू शकत नाही, या तत्त्वावरती पाकिस्तान निर्माण झाला, हे स्पष्ट असताना, भारतात राहिलेल्या उर्वरित मुस्लिमांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. आपले पूर्वज हे भारतीय संस्कृतीतलेच आहेत आणि म्हणून भारतीय मूल्ये आणि भारतीय संस्कृतीवरती भारतातील मुस्लिमांनी प्रेम केले पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले. भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमात किन्नर समाजाला सामावून घेतले, याबद्दल फैज खान यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.
 
"भारतीय संविधान हे उत्क्रांतीय आहे, ती क्रांती नाही व समाजाच्या कालसापेक्ष गरजांना भारतीय संविधानात सामावून घेतले जाते, हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे,” असा विचार भरत आमदापुरे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. "भारत जेव्हा स्वतंत्र झाला, त्यावेळी जगातील अनेक देश वसाहतवादातून मोकळे झाले, त्यांना स्वातंत्र्य मिळाले, परंतु गेल्या ७० वर्षांतील जागतिक घटनांचा जर आढावा घेतला, तर बहुतेक देशांमध्ये हिंसाचाराच्या मार्गाने सत्तापालट झालेला दिसून येईल किंवा त्या देशांमध्ये लष्कराने सत्तेचा ताबा घेतलेला दिसून येत आहे. भारतात मात्र १९५० साली जे भारतीय संविधान लागू झाले, ते संविधान आजही सक्षमपणे टिकून आहे. भारतीय संविधानाप्रमाणे आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आणि दर पाच वर्षांनी भारतामध्ये निवडणुका होत आहेत. अनेक निवडणुकांमध्ये सत्ताधारी बदलण्याचे काम भारतातील जनतेने केले; परंतु कोणताही सत्ताबदल होत असताना ती प्रक्रिया अत्यंत शांततेच्या पद्धतीने झाली आहे आणि हे होण्यामध्ये सक्षम भारतीय संविधानाचा तसा मोठा वाटा आहे.
 
तसाच भारतीय जनतेचादेखील आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान भारतीय जनतेने अत्यंत आपुलकीने स्वीकारलेले आहे. ‘क्रांती ही बंदुकीच्या नळीतून येते,’ या माओच्या तत्त्वज्ञानातून चीनमध्ये क्रांती झाली. क्रांतीतून चीनने जे संविधान स्वीकारले, त्या संविधानातील तथाकथित समतेच्या तत्त्वामुळे कोट्यवधी चिनी बांधवांची हत्या केली गेली. भारतीय संविधानातील उदात्त संस्कृती मूल्यामुळे भारताचे संघराज्य वैशिष्ट्य कायम राहिले. २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश, २२ महत्त्वाच्या भाषा, १ हजार, ६०० पेक्षा जास्त अधिक बोलीभाषा, शिवाय प्रत्येक राज्याची स्वतःच्या अस्मिता, वेशभूषा अशा सगळ्या वैविध्यांना सामावून घेणारे जगातील एकमेव भारतीय संविधान आहे. याच सर्व सामावेशकतेमुळे भारतीय लोकशाही टिकून आहे. धर्माच्या वेगळेपणावरून निर्माण झालेल्या पाकिस्तानाचे तुकडे होऊन बांगलादेशसारखा देश केवळ भाषिक अस्मितेवरून निर्माण झाला, हे लक्षात घेतले, तर भारतीय संविधानाचे वेगळेपण आपल्या लक्षात येईल,” असे प्रतिपादन भरत अमदापुरे यांनी केले.
 
"आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात आमदापुरे यांनी गेल्या ७० वर्षांत भारतीय संविधानासमोर आलेल्या विविध आव्हानांचादेखील परामर्श घेतला. संसदीय लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लोकसभेवरील निवडणुकीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरवले. अशा वेळी इंदिरा गांधी यांच्यामधील हुकूमशाही वृत्ती उफाळून आली आणि त्यांनी देशावरती १९७५ साली आणीबाणी लादली. या आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांच्या हजारो नेत्यांना इंदिरा गांधी यांनी तुरुंगात टाकले. या आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य त्यांनी काढून घेतले आणि स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी भारताच्या न्यायालयीन व्यवस्थेमध्येसुद्धा हस्तक्षेप केला. नैसर्गिकपणे होणार्‍या न्यायाधीश नियुक्तीच्या प्रक्रियेला त्यांनी डावलले आणि आपल्याला सोयीचे असणारे न्यायाधीश त्यांनी न्यायालयात नियुक्त केले केले. हा आणीबाणीचा काळ म्हणजे भारतीय लोकशाहीला कलंक होता.
 
याच कालखंडात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये इंदिरा गांधी यांनी ‘सेक्युलर’ आणि ‘समाजवाद’ या दोन शब्दांना घुसविले. संविधान बनवताना संविधानकर्त्यांनी या दोन शब्दांचा जाणीवपूर्वक उल्लेख या उद्देशिकेमध्ये केला नव्हता. परंतु, तथाकथित डाव्या विचारधार्‍यांच्या प्रभावाखाली आणीबाणीच्या काळा कालखंडामध्ये या दोन शब्दांचा आपल्या उद्देशिकेमध्ये जबरदस्तीने समावेश गेला आहे,” हे आमदापुरे यांनी श्रोत्यांच्या निदर्शनास आणून दिले. "आणीबाणीच्या काळात आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी भारतीय जनतेने प्रचंड संघर्ष केला, याचदरम्यान शेजारील बांगलादेशमध्ये रक्तलांछित क्रांती होऊन बांगलादेशचे पंतप्रधान शेख मुजिबूर रहमान यांची हत्या झाली, अशा सर्व एकत्रित घटनांचा मानसिक दबाव पंतप्रधान इंदिरा गांधींवरती आला आणि घाबरून त्यांनी १९७७ला आणीबाणी उठवली व सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. १९७७च्या या ऐतिहासिक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांचा व त्यांच्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व देशांमध्ये सर्वप्रथम काँग्रेसेतर अशा जनता पक्षाचे सरकार निवडून आले. भारतीय लोकशाहीच्या या महान विजयासाठी भारतीय संविधानातील भक्कम लोकशाही चौकटीचा आधार असल्यामुळेच ही किमया घडली आणि म्हणून आपण सर्वांनी भारतीय संविधानाविषयी आदर आणि अभिमान बाळगला पाहिजे,” असे आवाहन अमदापूर यांनी याप्रसंगी केले.
 
याच कार्यक्रमांमध्ये सनातन संस्कृतीचा अभ्यासक डॉ. राधाकृष्ण पिल्ले यांनी त्यांच्या वक्तव्यात "भारत हा देश लोकशाहीची जननी आहे, इथली हिंदू संस्कृती ही लोकशाही मूल्यांवरती उभी आहे, हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. प्रत्येक भारतीयाने भारतीय संविधानाचा अभ्यास करून आपल्या हक्कांसोबतच आपल्या कर्तव्यांविषयी जागृती आणली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी त्यांच्या भाषणात केले. "याच भारतीय संविधानाने सर्व सामान्य भारतीयांना आर्थिक विकास करण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे व याच संविधानामुळे देशातील सर्वसामान्य गरीब माणसाला शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे. भारतीय संविधानाच्या या दूरदृष्टी विचारांमुळेच २०४७ मध्ये भारत विश्वगुरू होणार आहेत, याचे संकेत भारतीय अर्थव्यवस्था देत आहे, असे सांगत जगाच्या कल्याणासाठी भारतीय संविधानाचे सुरक्षित राहणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. पिल्ले यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमात ‘समरसता साहित्य परिषदे’चे कोषाध्यक्ष सुनील ढेंगळे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला गेला. सामाजिक क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून लोक जागृती करणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रमुख योगिता साळवी, किन्नर समाजाच्या उत्थानासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते केशव जोशी, सामाजिक कार्यकर्ता स्मीता कवडे यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
 
योजना ठोकळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शलाका रहाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाची सांगता वैशाली बर्वे यांनी गायलेल्या संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने झाली.
‘सन्मित्र सेवा मंडळा’चे अध्यक्ष नरेंद्र बगाडे, उपाध्यक्ष मनोज खरे, कार्यवाह राहुल करंजीकर, ‘महाराष्ट्र सेवा संघा’चे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाप्रमुख राजेश चव्हाण, ‘राष्ट्रीय मुस्लीम मंचा’चे सुफी संत पेशकार खान, इरफान खान, ‘विकास शिक्षण समूहा’चे विनय राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 
- सुनील ढेंगळे
 
 
 
Powered By Sangraha 9.0