मुंबई : ( Marathi Literary Conference ) मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेल्या सातार्यामध्ये यंदाचे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. हे चार दिवसीय साहित्य संमेलन आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेले असताना, या साहित्य संमेलनातील वेगळेपण आता लोकांच्या दृष्टीस येत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात पार पडणारे हे पहिलेच ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ आहे. अशातच आता मराठी साहित्यविश्वाची वैभवगाथा वाचकांच्या हाती देणारी ‘अटकेपार’ ही स्मरणिका या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होणार असून, ही स्मरणिका दि. २० डिसेंबर रोजीपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती दै. ‘मुंबई तरुण भारत’ला मिळालेली आहे.
यासंदर्भात संमेलनाच्या स्मरणिका समितीचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना म्हणाले की, "९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्यात पार पडते आहे, ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. या संमेलनानिमित्ताने जी स्मरणिका आम्ही प्रकाशित करणार आहोत, ती एकूण तीन भागांमध्ये विभागलेली आहे. त्यातील पहिल्या भागात सातार्याचा इतिहास, पत्रकारितेचा इतिहास, पर्यटनाचा वारसा, कृषी पर्यटन, ग्रंथ महोत्सव आदी गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. स्मरणिकेच्या दुसर्या भागामध्ये मराठी भाषेला महत्प्रयासाने जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या अनुषंगाने ही संघर्षगाथा नोंदवली गेली आहे.” "स्मरणिकेच्या तसर्या भागामध्ये विविध परिसंवादाच्या माध्यमातून अनेक विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. बालसाहित्यापासून ते वाचनसंस्कृतीपर्यंत विविध विषयांवर मान्यवरांनी यामध्ये विचारमंथन मांडले आहे. ही स्मरणिका दि. २० डिसेंबर रोजीपर्यंत पूर्ण होणार असून, साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांची हस्ते ती प्रकाशित होणार आहे,” अशी माहिती मुकुंद फडके यांनी दिली.