नृत्यालंकार ‘वृषाली’

03 Dec 2025 10:43:49
Vrushali Dabke 
 
आपल्या नृत्याविष्कारातून सातासमुद्रापार भारतीय नृत्यसंस्कृती पोहोचवणार्‍या कथ्थक नृत्यांगना वृषाली दाबके यांच्याविषयी...
 
नटराजाच्या सेवेमध्ये जीवन अर्पण करणारे असंख्य असे महान कलावंत, भारताने जगाला दिले. कलेच्या प्रति असलेली निष्ठा, गुरूंप्रतिचा समर्पणभाव यामुळेच त्यांनी सादर केलेली कलाकृती केवळ वेगळ्या उंचीवरच पोहोचली नाही, तर अशा महान कलावंतांच्या केवळ दर्शनामुळेच अनेकांच्या जीवनामध्येही परिवर्तन घडून आले. पंडित बिरजू महाराज असो किंवा सीतारा देवी, ही भारतमातेची खरी आभूषणं. शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा लाभलेल्या आपल्या या भूमीमध्ये, त्यांनी आपल्या कार्यातून नवीन पायवाट निर्माण केली. भारतीय संस्कृती, भारतीय विचार सातासमुद्रापार नेला. रंगभूमीच्या अवकाशामध्ये आपली कला सादर करताना असंख्य नर्तकांनी, नृत्यांगनांनी आपल्या कलेतून पारलौकिक जगाची अनुभूती प्रेक्षकांना दिली. आजसुद्धा अशा अनेक कलाकारांची साधना सुरू आहे. या ध्येयनिष्ठ जीवनाच्या वाटेवर चालणार्‍या अशाच एका व्यक्तीचे नाव म्हणजे, डॉ. वृषाली दाबके!
 
२०२४-२५ सालच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा झाली व युवा गटामध्ये नृत्य विभागात वृषाली दाबके यांचे नाव जाहीर झाले. तमाम डोंबिवलीकरांसाठी व ठाणेकरांसाठी ही आनंदाची बाब होती. वृषाली यांनी आपल्या नृत्यसाधनेतून कलेचा अत्यंत वेगळा आणि मौलिक असा आविष्कार तर साकारलाच, तसेच त्यांनी नृत्यांगनांनाही घडवण्याचे कार्यही केले. त्यामुळे आज नृत्यसाधना करणार्‍या अनेक विद्यार्थिनी तयार होत आहेत. वृषाली यांच्या नृत्यप्रवासाची सुरुवात लहानपणापासूनच झाली. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांची आईसुद्धा नृत्य शिकत होती.
 
सुरुवातीचा काहीकाळ डोंबिवली येथे बेलसरे यांच्याकडे त्यांनी नृत्याचे धडे गिरवले. यानंतर डॉ. मंजिरी देव यांच्याकडे त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. या प्रवासातच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मंजिरी देव यांच्याकडे नृत्य शिकण्याच्या अनुभवाबद्दल वृषाली सांगतात की, "इथे आम्ही केवळ ‘कथ्थक’ शिकण्यासाठी येत नव्हतो. हे शिक्षण आमच्या जीवनाचं होतं. पायाला घुंगरू बांधण्यापासून ते कार्यक्रमाच्या व्यवस्थापनापर्यंत, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आमच्या गुरूंनी आम्हाला स्वावलंबी केलं. यावेळी शास्त्रीय नृत्यकलेशी आमचा परिचय तर झालाच. मात्र, त्याचबरोबर लोकनृत्य, उप शास्त्रीय अशा वेगवेगळ्या माध्यमांतूनही आमच्या नृत्याची जडणघडण होत गेली.”
 
एकीकडे नृत्यकलेची ओळख होत असतानाच, दुसर्‍या बाजूला रंगभूमीवरील सादरीकरणाच्या अनेक छटा त्यांनी अवगत केल्या. वृषाली यांच्या या प्रवासामध्ये, त्यांच्या आई-वडिलांचाही त्यांना भक्कम आधार होता. त्याचप्रमाणे शाळेनेसुद्धा वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला योग्य ठिकाणी योग्य वाव मिळत असे. वृषाली यांनी त्यांचा रियाजही न थांबता, न थकता सुरूच ठेवला होता. मात्र अशातच, आयुष्यामध्ये असे काही वादळी क्षण आले, त्यामुळे या प्रवासाला तात्पुरता विराम देणे त्यांना भाग पडले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच, दुसर्‍या वर्षाला मेंदूच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये काही महिन्यांसाठी भरती व्हावे लागले. मात्र, त्यांच्यातील कलावंत व अभ्यासक पराभव पत्करणारा नव्हता. या परिस्थितीमध्येही त्यांनी, आपले शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केले.
 
नंतर वाशीच्या ‘गांधर्व’ महाविद्यालयामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी पूर्णवेळ नृत्यसेवा करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना घडवताना व स्वतः रंगभूमीवर नृत्यकला सादर करताना, सातत्याने त्यांनी प्रयोगशीलता जपली. पूर्वसूरींच्या ज्ञानाचे संचित त्यांनी सोबत घेतले मात्र, त्याला नावीन्याची जोड द्यायला त्या विसरल्या नाहीत. तालमणी पंडित मुकुंदराज देव तथा डॉ. मंजिरी देव यांनी केलेल्या संस्कारांमुळे, त्यांचे शिक्षण सातत्याने सुरू राहिले. ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तून त्यांनी ‘कथ्थक’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेच, त्याचबरोबर ‘पीएचडी’ करण्याचाही निर्णय घेतला. त्यांची एक ‘पीएचडी’ पूर्ण झाली असून, ‘महाराष्ट्राची कीर्तनपरंपरा आणि कथ्थकची मंदिरपरंपरा’ यातील अनुबंधांचा, त्या दुसर्‍या ‘पीएचडी’साठी अभ्यास करीत आहेत.
 
डॉ. मंजिरी देव यांचा त्यांना सहवास लाभला आहे, मात्र, हा सहवास केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता, तो जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी ‘लय मंजिरी’ हे आगळेवेगळे पुस्तक लिहिले. ‘श्री मुद्रा कलानिकेतन’च्या माध्यमातून त्यांनी, विद्यार्थी घडवण्याचा विडा उचलला आहे. सुरुवातीला १०० विद्यार्थ्यांच्या सहवासात सुरू झालेला हा प्रवास, अनेकांना सुपरिचित आहे. मात्र, त्यांनी ज्यावेळेला बालीच्या भूमीवर पाऊल ठेवले, त्याक्षणी एक वेगळाच विक्रम त्यांनी रचला. नृत्याविष्काराच्या माध्यमातून त्यांनी ‘रामायणा’ची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली. विविध प्रकारचे संशोधन करून, अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी हा कलाविष्कार आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने साकारला. तमाम भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट ठरली. कलाक्षेत्रातील हेच सत्त्व आणि भारतीयत्व टिकवणार्‍या ‘संस्कार भारती’ या संघटनेशी त्या जोडल्या गेल्या असून, कोकण प्रांत मंत्रिपदाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. भारत सरकारच्या ‘कलाक्षेत्र फाऊंडेशन’शीसुद्धा त्या जोडल्या गेल्या आहेत. आपल्या या प्रवासाविषयी सांगताना, त्या सातत्याने त्यांच्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, ज्यांच्यामुळे त्या हा प्रवास करू शकल्या. वृषाली दाबके यांच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0