मुंबई : (Russia-Ukraine Peace Deal) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर झेलेन्स्की यांची फ्लॉरिडामध्ये झालेली प्रदीर्घ बैठक आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उभय नेत्यांनी युक्रेन शांती करारावर जवळपास ९० टक्के सहमती झाल्याचे संकेत दिले. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला तोडगा काढण्यासाठी ही चर्चा निर्णायक ठरू शकते, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र काही मूलभूत आणि कठीण मुद्द्यांवर अद्याप चर्चा बाकी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काय म्हणाले ट्रम्प?
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी आम्ही चांगले प्रयत्न करत आहोत. जवळपास सगळ्या विषयांवर माझी झेलेन्स्की यांच्याशी चर्चा झाली आहे. रशिया व युक्रेन दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने भरपूर पाऊलं टाकली आहेत. युद्ध थांबवण्याबाबत रशिया व युक्रेन हे दोन्ही देश पूर्वी कधीही नव्हते, तितके सकारात्मक आहेत. हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेले जगातील सर्वात मोठे युद्ध आहे. प्रत्येकाला हे युद्ध संपलेले पाहायचे आहे."
ट्रम्प यांच्या प्रस्तावावर ९० टक्के सहमत - झेलेन्स्की
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ऑक्टोबर महिन्यात ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यावेळी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ट्रम्प यांना फोन करून युद्ध थांबवण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले होते. युक्रेनच्या डोनबास प्रांतावरून रशिया व युक्रेनमध्ये सध्या वाद आहे. त्यावर तोडगा काढणे अवघड असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे ट्रम्प म्हणाले, "डोनबास बाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. पण, लवकरच तो प्रश्नही सोडवला जाईल. तो खूप अवघड विषय असला तरी लवकरच सोडवला जाईल." ट्रम्प यांनी बनवलेल्या शांती प्रस्तावावर ९० टक्के सहमत असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
या चर्चेचे स्वागत युरोपीय कमिशनच्या अध्यक्षा वोन डेर लेयेन यांनी केले आहे. या घडामोडींमुळे युक्रेन युद्ध समाप्तीच्या दिशेने आशा निर्माण झाली असून जागतिक शांतता, युरोपमधील स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.