वार्षिक स्नेहसंमेलन आणि रस्सीखेच...

29 Dec 2025 12:38:32

मैदानी खेळांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्रास दिसणारा खेळ म्हणजे रस्सीखेच! ‌‘टग ऑफ वॉर‌’ या इंग्रजी नावाने प्रसिद्ध झालेला हा खेळ, जागतिक स्पर्धांमध्येही तितक्याच उत्साहाने खेळला जातो. या खेळाचा इतिहास, त्याचा भारतातील प्रवास, जागतिक प्रवास, नियम यांच्या आधारे घेतलेला मागोवा...

डिसेंबर महिना हा वर्षांताचा महिना. वर्षानुवर्षे हा डिसेंबर महिना शालेय तसेच महाविद्यालयीन जगताला कायमस्वरुपी आठवणीत राहतील, अशा घटना देऊन जातो. त्या घटनांमधील एक म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन! यामध्ये शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सवाचादेखील अंतर्भाव असतो. डिसेंबर महिना म्हणजे अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा काळ. नाट्य, गायन, संगीत अशा अनेक कलागुणांबरोबरच, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा नैपुण्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा हा काळ. शाळेतील वर्गावर्गांमध्ये विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करून, शाळेतील चुणचुणीत विद्यार्थ्यांमधून शाळाबाह्य जगाला देण्यासाठी आगामी क्रीडापटू घडवण्याची सुवर्णसंधी शिक्षकांना त्याच काळात मिळत असते. भविष्यात स्वतःबरोबरच आपल्या पालकांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करणारे विद्याथ, या वार्षिक स्नेहसंमेलनात होणाऱ्या विविध खेळांच्या स्पर्धांपासूनच त्यांच्या क्रीडा जीवनाची सुरुवात करताना दिसतात. बुद्धिबळासारखे बैठे खेळ, स्लो सायकलिंग, पोत्यांच्या उड्या, तीन पायांची शर्यत, लंगडीसारखे खेळ असोत, अथवा रस्सीखेच; अशा एक ना अनेक स्पर्धा प्रत्येकाने शालेय जीवनापासून नक्कीच अनुभवल्या असतील.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या काही आठवडे आधीपासूनच वर्गांमध्ये रंगीत तालीम आणि चर्चा सुरू होतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मैत्री व एकोपा वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये संघभावनेचे बीजारोपण करायचा उत्तम काळ, हा शालेय जीवनाचा काळच असतो. खेळाडू आणि कलाकारांना त्यांची सुरुवात करण्यासाठी, वार्षिक स्नेहसंमेलन हे एक महत्त्वाचे माध्यम ठरते. पालकांनाही याच कार्यंक्रमांच्या माध्यमातून, आपल्या पाल्यांमधील सुप्त कौशल्यांचे दर्शन होते. अशा गुणी विद्यार्थ्यांना शिक्षक आणि पालक यांचे प्रोत्साहनही लाभते. यातूनच भविष्यातील कलाकार, खेळाडू आकार घेतात. आकर्षक सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढते, म्हणून शिक्षक काही विद्यार्थ्यांवर स्नेहसंमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही सोपवतात. त्याचवेळी त्याला मार्गदर्शनही करतात आणि मग मोठा झाल्यावर तोच प्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून नावारूपासही येतो.

ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांनी शाळेच्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली असताना, ‌‘स्नेहसंमेलन‌’ नव्हे, तर ‌‘स्नेहमिलन‌’ अशी उपमा दिल्याचे माझ्या वाचनात आले होते. वर्षभर शाळेतील साचेबद्ध कामे, त्यातून येणारी कटुता, गैरसमज विसरण्याचा आणि शिक्षक, विद्याथ या नात्यांमधील अंतर कमी करण्याचा हा दिवस असल्याचेही, त्यांनी त्यावेळी नमूद केले होते.

शाळेतील वार्षिक क्रीडा महोत्सवात वर्गावर्गांमध्ये क्रिकेटचे सामने हमखास रंगतात. तसेच विविध खेळांच्या विजेत्या वर्गाला, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फिरती ढाल दिली जाते. तर विजेत्या संघातील विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रेही दिली जातात. ज्या विद्यार्थ्याचे हस्ताक्षर सुवाच्य असते, त्याला त्या प्रशस्तिपत्रांवर विजेत्यांची नावे लिहिण्याची जबाबदारी सोपवली जाते. हो आणि त्याच संमेलनात सगळ्यांनी अल्पोपाहार केल्याची चवही, अनेकांना आठवत असेल. अनेकांना त्या अल्पोपाहाराला आपआपले ताट आणि पाण्याचं भांडे घरून नेल्याचंही आठवत असेल.

अशा या शाळेतील क्रीडा महोत्सवात रस्सीखेच खेळाची स्पर्धा, विद्यार्थ्यांमधे प्रसिद्ध असलेली दिसते. आपल्या वर्गातील त्यातल्या त्यात शरीराने सुदृढ असलेल्या मुलांवर मग विजयाची जबाबदारी सोपवण्यात येते. आपल्या अंगी असलेल्या बळाचा सुयोग्य वापर, त्यांना या क्रीडाप्रकारात करता येतो. मुलीमुलींचा संघ, मुलामुलांचा संघ स्पर्धेआधी आपल्या शक्तीची चाचणी घेण्यासाठी, शिक्षकांकडून अधिकृत वेळ मिळवून सराव करतात. शाळाप्रमुख, क्रीडा महोत्सव प्रमुख, विद्याथ प्रतिनिधी असे सगळे एक बैठक घेतात. यामध्ये स्नेहसंमेलनातील वार्षिक क्रीडा महोत्सवाची रुपरेशा, त्यात समावेश करायचे क्रीडाप्रकार, क्रीडाज्योत तसेच क्रीडाध्वज कोण हाती घेणार अशा अनेक गोष्टींवर सांगोपांग चर्चा केली जाते. त्यानंतच त्यावर अंतिम निर्णय घेतले जातात.

आज आपल्याकडे फक्त वार्षिक क्रीडा महोत्सवातील रस्सीखेचमध्ये सहभाग घेण्याव्यतिरिक्त, रस्सीखेच क्रीडाप्रकारात रस घेणारेही अनेकजण असतील. अशा रस्सीखेचप्रेमींना आपले ते दिवस परत आठवतही असतील. आज रस्सीखेचसारखा क्रीडाप्रकार शालेय स्तरावर अडकलेला असला, तरी एके काळी हा ऑलिम्पिक क्रीडाप्रकार म्हणून नावाजलेला होता. रस्सीखेच हा खेळ अजून शालेय क्रीडास्पर्धेबरोबर,काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आढळतो, याचीच अनेकांना कल्पना नसते. आपण आता या रस्सीखेचची आधिक माहिती करून घेऊ.

बहुतेक खेळांमध्ये जिंकण्यासाठी पुढे जाणे आवश्यक असते, परंतु, एक खेळ असा असतो की ज्यामध्ये तुम्हाला मागे हटावे लागते, होय आणि तो खेळ म्हणजे रस्सीखेच. हा असा एक खेळ आहे, जिथे तुम्ही मागे हटूनच जिंकता! यात कोणी एक हिरो नसतो; रस्सीखेचच्या एका संघात असलेले सर्व आठही संघसदस्य हिरो असतात. समन्वय, सहकार्य, तग धरण्याची क्षमता, सामूहिक शक्ती आणि युक्ती हे रस्सीखेच या खेळासाठी आवश्यक गुण. या खेळात वैयक्तिक आणि सामूहिक दृढनिश्चयाची भरपूर प्रमाणात आवश्यकता असते.

रस्सीखेच किंवा ज्याला इंग्रजीत ‌‘टग ऑफ वॉर‌’ म्हणून ओळखले जाते, या खेळात दोन प्रतिस्पध संघ आपापली ताकद आजमावण्याच्या उद्देशाने, एका जाड दोरखंडाच्या सहकार्याने प्रतिस्पर्ध्याला आपल्या हद्दीत ओढण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक संघातील शेवटचा गडी बहुधा सर्वांत वजनदार असतो, त्याला ‌‘अँकरमन‌’ म्हणतात. (अँकर म्हणजे बोटीचा नांगर, तो जमिनीत रुतविला की बोट हलू शकत नाही. यावरून ही संज्ञा आली आहे). हा खेळ मैदानाप्रमाणेच इनडोअर हॉलमध्ये देखील खेळला जातो.

रस्सीखेच या क्रीडाप्रकाराचा उगम प्राचीन असावा. चीनमध्ये सुगीच्या दिवसांत विशालकाय दगडी मूत अथवा मोठमोठे दगड ओढण्याचे काम गुलामांकडून करवून घेतले जाई. तसेच कधीकधी खलाशांना शिडे चढविण्यासाठी दोर खेचावे लागत. भारतामध्येही भारी अवजड तोफा दोरखंडाने ओढण्याचे काम, फार पूव चालत असे. यांसारख्या कृतींमध्येच या खेळाचा उगम शोधता येईल. तसेच पुरातत्त्व विभागाच्या संशोधनानुसार आपल्याला आढळेल की, 12व्या ते 13व्या शतकात पूर्व किनारपट्टीवर असलेल्या आजच्या ओडिशातील कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या पश्चिम बाजूकडील एका दगडी शिल्पात, ‌’टग ऑफ वॉर‌’ म्हणजेच रस्सीखेच हा खेळ स्पष्टपणे दाखवण्यात आला आहे. याचप्रमाणे दोरखंडासाठी वापरला जाणारा मजबूत तागाचा धागा, अनेकदा रस्सीखेचसाठी वापरला जाई. एवढेच नव्हे, तर अतिशय पातळ आणि लवचिक हिरव्या बांबूच्या साठ्यांचा वापरही रस्सीखेच खेळासाठी अनेक प्रसंगी केला जातो.

इंग्लंडमध्ये 1958 साली ‌‘टग ऑफ वॉर‌’च्या संघटनेची स्थापन झाली. 1971 पर्यंत 220 संस्था या संघटनेत सामील झाल्या होत्या. 1969 पासून रस्सीखेच खेळाच्या स्पर्धेत चार वजनगट आहेत. काही ठिकाणी 640 किलो व 720 किलो हे दोनच वजनगट गृहित धरले जातात. रस्सीखेच स्पर्धांची जागतिक स्तरावर नियंत्रण करणारी संघटना ‌‘इंटरनॅशनल टग ऑफ वॉर फेडरेशन‌’ ही ऑक्सफर्ड, सरे येथे आहे. अशी पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या रस्सीखेच या क्रीडाप्रकाराबद्दल पुढाकार घेत, भारतीय सैन्यदलाच्या काही आधिकाऱ्यांनी गाझियाबाद येथे सन 1958 मध्ये ‌’भारतीय टग ऑफ वॉर संघटने‌’ची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर 1978मध्ये आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून त्याला मान्यताही मिळाली. त्यानंतर 1999मध्ये ‌’भारतीय टग ऑफ वॉर महासंघ‌’ म्हणून सरकारकडून आधिकृत मान्यता या संघटनेस मिळाली.

ऑलिम्पिक आणि रस्सीखेच : पॅरिस 1900 मध्ये रस्सीखेचने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आणि अँटवर्पच्या 1920 मधील स्पर्धेपर्यंत एक महत्ताचे अंग म्हणून हा खेळ स्पर्धेत होता. आपल्या आपल्या देशाची ताकद सर्व जगाला दाखवण्याची संधी म्हणून, ‌‘टग ऑफ वॉर‌’कडे पाहिले जाई. 1900च्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये स्वीडन आणि डेन्मार्कच्या मिश्र संघाने सुवर्णपदक जिंकले, तर फ्रान्सने रौप्यपदक जिंकले. तथापि, ऑलिम्पिकचे जसजसे आधुनिकीकरण होत गेले, तसतसे 1920 मध्ये खेळांची संख्या कमी करण्याच्या बहाण्याने रस्सीखेचला स्पर्धेतून काढून टाकण्यात आले. रस्सीखेच खेळाच्या उत्साही खेळांडूंसाठी ते एक नुकसानच ठरले.

1908च्या खेळांमधील अमेरिकन ‌‘टग ऑफ वॉर‌’ संघात डिस्कस, शॉट पुट आणि हॅमर थ्रो या स्पर्धांमधील खेळाडूंचा, समावेश केला गेला. त्यांनी पदके तेवढी जिंकली नाहीत. 1900 ते 1920 पर्यंतच्या प्रत्येक उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये, ‌‘टग ऑफ वॉर‌’ हा खेळ खेळला जात असे. सुरुवातीला या स्पर्धेत क्लबच्या नावाने अनेक गटांनी यामध्ये भाग घेतला. एका देशाला स्पर्धेत एकापेक्षा जास्त क्लब पाठवण्यास परवानगी असल्याने, एका देशाला अनेक पदके मिळवणे शक्य होई. 1904 मध्ये अमेरिकेने तिन्ही पदके जिंकली आणि 1908 मध्ये ब्रिटिश संघांनी. स्वीडनदेखील दोन पदके जिंकणाऱ्या अव्वल देशांमध्ये, एक मिश्र संघाचा सदस्यहीहोता. ऑलिम्पिक खेळाच्या त्या काळात, ‌‘टग ऑफ वॉर‌’ हा ॲथलेटिक्स कार्यक्रमाचा भाग मानला जाई; आता मात्र रस्सीखेच आणि ॲथलेटिक्स हे खेळ वेगळे मानले जातात. 1920च्या खेळांनंतर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळ आणि सहभागींची संख्या नियमन करण्यासाठी, ऑलिम्पिक कार्यक्रम सुलभ करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच 1920च्या पुढील वर्षांत, रस्सीखेच आणि इतर अनेक खेळ ऑलिम्पिक कार्यक्रमातून काढून टाकण्यात आले. 1900 मध्ये सहा सदस्य, 1904 मध्ये पाच सदस्य आणि 1908, 1912 आणि 1920 मध्ये आठ सदस्यांचा संघ ऑलिम्पिक स्पर्धेत ‌‘टग ऑफ वॉर‌’मध्ये होता.

आज ऑलिम्पिकमध्ये रस्सीखेच सहभागी होत नसले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरांवर ‌‘टग ऑफ वॉर‌’ खेळला जात आहे. ऑलिम्पिकच्या तोडीस तोड असलेल्या ‌‘ द वर्ल्ड गेम्स‌’मध्ये, ‌‘टग ऑफ वॉर‌’ खेळाचा सहभाग दरवष होतो. ‌‘द वर्ल्ड गेम्स‌’ची 12वी आवृत्ती दि. 7 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडली. यजमान चीनच्या ‌‘पीपल्स रिपब्लिक‌’मधील मेगासिटी चेंगडू येथे झालेल्या ‌‘वर्ल्ड गेम्स 2025‌’ कार्यक्रमात, 34 खेळ, 60 विषय आणि 256 पदकस्पर्धा होत्या. या स्पर्धेतील धनुर्विद्या, बिलीयर्डस, रॅकेटबॉल, रोलर स्पोर्ट्स, वुशु अशा क्रीडाप्रकारांत भारतानेही सहभाग घेतला परंतु, भारत रस्सीखेचमध्ये उतरला नव्हता. त्याचबरोबर जागतिक ‌‘टग ऑफ वॉर‌’ अजिंक्यपदस्पर्धेमध्ये, किमान 20 वेगवेगळ्या देशांतील सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी होतात.

तर असा वार्षिक स्नेहसंमेलन ते आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये परिचित असलेला ‌‘टग ऑफ वॉर‌’ अर्थात रस्सीखेच क्रीडाप्रेमींना प्रेरणा देत आला आहे आणि अखंड देत राहील, हे नक्की. तर, ती रस्सी ऑलिम्पिकमध्येही परत एकदा खेचताना दिसावी ही सगळ्यांची सदिच्छा व्यक्त करत, आपण आतापुरती ती गुंडाळून ठेवू.

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704

Powered By Sangraha 9.0