राम मंदिर अयोध्येचे, केंद्र विश्वचैतन्याचे

28 Dec 2025 16:10:51

 
राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर दि. २५ नोव्हेंबर रोजी, विवाह पंचमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व स्वामी गोविंददेव गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, भव्य धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या कळसावर हा ध्वज फडकावून, मंदिर पूर्णत्वाचा प्रतीकात्मक सोहळा साजरा करण्यात आला. भगव्या रंगाच्या, त्रिकोणी आकाराच्या, टिकाऊ आणि विशेष साहित्यापासून बनविलेल्या, कोविदार वृक्ष, सूर्य आणि ॐ चिन्ह कोरलेल्या या धर्मध्वजाची स्थापना म्हणजे, रामराज्याच्या आदर्शांचे व प्रेरणांचे प्रतीक होते.

२२ महिन्यांपूर्वी दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अभिजित मुहूर्तावर, राममंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि अनेक वर्षांची प्रतीक्षादेखील संपली. रामललाच्या मूर्तीला पवित्र स्नान घालून, वैदिक मंत्रांसह गर्भगृहात स्थापित केले गेले. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व अन्य महनीय वक्त्यांनी रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनासाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. त्या संघर्षाचा ५०० वर्षांचा धगधगता इतिहास व विविध घडामोडी यांची तपशीलवार माहिती देणारे पुस्तक म्हणजे, प्रकाश बापट लिखित ‘राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे’ हे होय.

राममंदिराचे बांधकाम सुरू झाल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी, सप्टेंबर २०२२ मध्ये डोंबिवली-ठाणे येथील चार कार्यकर्त्यांनी अयोध्येला भेट दिली. तेथून परतल्यावर प्रकाश बापट यांनी रामजन्मभूमी आंदोलन, त्याचा इतिहास, विविध टप्पे आणि मंदिरनिर्माणाचे कार्य यांबाबत फेसबूकवर, ‘पर्यटन नव्हे तीर्थाटन’ या नावाने लेखमाला प्रकाशित केली. या लेखमालेचे ग्रंथरूप म्हणजेच हे पुस्तक!

पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये लेखकाने वर्ष १५२८-२९ मध्ये, मुघल सेनापती मीर बांकी याने केलेला राममंदिराचा विद्ध्वंस इथपासून रामजन्मभूमीमुक्तीसाठी झालेल्या लढाया, आंदोलने यांचा ऊहापोह केला आहे. अनेक महत्त्वाच्या घटना तपशीलवार मांडल्यामुळे, ५०० वर्षांचा संपूर्ण इतिहासच वाचकांसमोर उभा राहतो. यासोबतच, अयोध्येच्या प्राचीन व पौराणिक इतिहासाचीही माहिती दिली आहे. पवित्र सप्तनगरींमधील अयोध्येचे अग्रस्थान,

वसिष्ठ संहितेमधील उल्लेख, अथर्ववेद तसेच वाल्मिकी रामायणातील अयोध्येची माहिती वाचून, अयोध्येचे सांस्कृतिक व पौराणिक महत्त्वही अधोरेखित होते.

वर्ष १९८० दरम्यान ‘विश्व हिंदू परिषदे’च्या माध्यमातून, रामजन्मभूमी आंदोलन समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू झाले आणि खर्‍या अर्थाने आंदोलनाला चालना मिळाली. संत-महंतांचा यामधील सहभाग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघप्रेरित संस्था-संघटनांच्या माध्यमातून भारतमाता यात्रा, राम-जानकी रथयात्रा, गंगामाता यात्रा, रामशीलापूजन, रामज्योत यात्रा अशा उपक्रमांद्वारे, संपूर्ण समाजच आंदोलनाशी कसा जोडला गेला याची माहिती मिळते.

वर्ष १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा आणि तेव्हापासून, भारतीय राजकारणात झालेली सामाजिक, राजकीय घुसळण आपल्याला वाचायला मिळते. यासोबतच, बाबरी ढाँच्यावर भगवा ध्वज फडकावून संपन्न झालेली कारसेवा, मुलायम सरकारने कारसेवकांवर केलेले अनन्वित अत्याचार/गोळीबार याचा थरार वाचून मन विषण्ण होते. विशेषतः दि. ३० ऑक्टोबर १९९० या दिवशीच्या दिनक्रमाचे, नकाशासह रोचक वर्णन पुस्तकात केले आहे. पुस्तकात दि. डिसेंबर १९९२ रोजीच्या ऐतिहासिक घटनेचाही तपशीलवार उल्लेख केला आहे. गीताजयंतीच्या मुहूर्तावर ठरवलेली कारसेवा करण्यासाठी जमलेले लाखो कारसेवक, त्यांच्यासमोर होणारी नेत्यांची भाषणे, ‘अभी नही तो कभी नही’, ‘याचना नही अब रण होगा, संग्राम बडा भीषण होगा’ आणि ‘एक धक्का और दो, बाबरी ढाँचा तोड दो’ अशा घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि शेवटी, काही तासांमध्ये जमीनदोस्त झालेला बाबरी ढाँचा याचे वर्णन वाचताना, अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात.

वर उल्लेख केलेल्या चार कार्यकर्त्यांपैकी प्रदीप पराडकर व लेखक प्रकाश बापट हे दोघेही, १९९०१९९२ अशा दोन्ही आंदोलनांमध्ये सक्रिय होते आणि १९९० मध्ये त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. (अन्य दोघेजण म्हणजे, डोंबिवलीतील शैलेश दिवेकर आणि ठाणे येथील शिरीष गोगटे) प्रदीप पराडकर आणि अशा अन्य कार्यकर्त्यांचे स्वतंत्र प्रकरणांमध्ये लिहिलेले चित्तथरारक अनुभव, अतिशय वाचनीय आहेत. पुस्तकामध्ये वर्ष १९९४ ते २०१९ दरम्यान घडलेल्या न्यायालयीन प्रक्रियेचीही तपशीलवार माहिती असून, ‘शिया वक्फ बोर्डा’चे तत्कालीन अध्यक्ष वसीम रिझवी आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर यांनी वाद मिटविण्यासाठी केलेल्या (ज्याची समाजाला फारशी माहिती नाही) प्रयत्नांचाही यामध्ये उल्लेख आहे.

पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाचे नायक या प्रकरणात प्रमुख नेते, यासाठी आपले आयुष्य समर्पित केलेले ज्येष्ठ कार्यकर्ते, संत-महंत अशा निवडक २५ महोदयांचा छायाचित्रांसह करून दिलेला थोडक्यात परिचय व त्यांचे योगदान. आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे, आंदोलनाचे ’आर्किटेक्ट’ म्हणून ओळख असलेले अशोक सिंघल, अटलजी यांचा कृतज्ञतापूर्वक केलेला उल्लेख महत्त्वाचा ठरतो.

मंदिरनिर्माणाचे, बांधकामाचे आर्किटेक्ट चंद्रकांत सोमपूरा यांचा, तसेच भारतातील विविध मंदिर निर्माण शैलींचा छायाचित्रांसह करून दिलेला परिचय यांमुळे, पुस्तकाची वाचनीयता वाढली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मंदिरनिर्माणाच्या कार्यात अहोरात्र झटणारे ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रकल्प समन्वयक जगदीश आफळे व त्यांच्या सुविद्य पत्नी माधुरी यांचा व त्यांच्या कार्याचा, योगदानाचा परिचयही एका प्रकरणात आवर्जून करण्यात आला आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहेच, परंतु पुस्तकाचे वाचनमूल्य वाढले आहे, ते सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे आणि पूजनीय स्वामी गोविंददेव गिरी यांनी लिहिलेल्या शुभसंदेशांमुळे. या तिघांच्याही संदेशांमधून भारतीय समाजपुरुषाची मानसिकताच व्यक्त झाली असून, मंदिरनिर्माण ते राष्ट्रनिर्माण याचे दिशादर्शनही झाले आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी लिहिलेली समर्पक व विवेचक प्रस्तावना, खरोखरच पूर्ण वाचण्यासारखी आहे. भारताचे सांस्कृतिक वैभव, श्रद्धास्थाने यांची झालेली विटंबना आणि परकीय आक्रमकांनी उभारलेली प्रतीके नष्ट करून राष्ट्राबद्दलचा गौरव वाटेल आणि वाढेल, अशा परिवर्तनाची अपेक्षा त्यांनी निवडक शब्दांमध्ये मांडली आहे.

या अयोध्याभेटीदरम्यान ‘आंदोलनाचा चालता-बोलता शब्दकोश’ अशी ख्याती असलेल्या व ५० वर्षांपासून संघप्रचारक व सध्या ‘राममंदिर तीर्थक्षेत्र न्यासा’चे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या, ऋषितुल्य चंपतराय यांच्या अविस्मरणीय भेटीचा उल्लेखही एका प्रकरणात केला आहे. (अशोकजी शेवटच्या दिवसांमध्ये रुग्णालयात असतानाचा एक अतिशय हळवा प्रसंग, यावेळी चंपतराय यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळाला. पण तो प्रसंग पुस्तकामध्येच वाचणे अधिक सयुक्तिक होईल.) तसेच, अयोध्येच्या नवनिर्माणाचा बृहद् आराखडा व अयोध्येला जागतिक कीर्तीची आध्यात्मिक पर्यटन नगरी बनविण्यासाठी होत असलेल्या, अनेक विकासकामांचा उल्लेखही मुळापासून वाचण्यायोग्य आहे.

पुस्तकाचे प्रकाशन ’सुविचार आणि सुसंस्कार यांचा प्रसार, हाच आमचा विचार’ असे ब्रीदवाक्य ठरवून, मागील ४० वर्षांपासून व्यवसाय करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप महाजन यांच्या ‘मोरया प्रकाशन’ने केले असून, डोंबिवली, पुणे, नाशिक, ठाणे आणि पनवेल अशा पाच ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे लोकार्पण झाले आहे.

३३ वर्षांपूर्वी घडलेल्या या यशस्वी लढ्याचा देदीप्यमान इतिहास, आजच्या पिढीला मार्गदर्शक आहेच, शिवाय येणार्‍या पिढ्यांसाठीही प्रेरणादायक ठरणारा आहे. या पुस्तकामधून राममंदिराच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, एकता आणि राष्ट्रीय अस्मिता कशी प्रकट होते, याचेच समग्र दर्शन होते. तसेच, हे पुस्तक राममंदिर आंदोलन भारतातील विविध जाती, धर्म आणि प्रांतांना जोडणारा एक भावनिक व सांस्कृतिक धागा कसे बनले, हेही दर्शविते. यानिमित्ताने राममंदिर आंदोलन हे स्वा. सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या खंडानंतर इतिहासातील सातवे सोनेरी पान ठरावे! राममंदिरनिर्माणातून राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा प्रारंभ झाला असून, यापुढे राष्ट्रनिर्माण हाच श्वास-ध्यास आणि राष्ट्रहित सर्वोपरी अशा विचारांच्या समाजाच्या सामूहिक शक्तीच्या माध्यमातून भारत गौरवशाली बनेल व सुवर्णयुग अनुभवेल, हे निश्चित!

पुस्तकाचे नाव : राम मंदिर अयोध्येचे, केंद्र विश्वचैतन्याचे

पुस्तकाचे लेखक : प्रकाश बापट

पृष्ठसंख्या : १४०

मूल्य : १५० रुपये

आवृत्ती : पहिली

प्रकाशक : मोरया प्रकाशन


- प्रदीप परडकर


pasting

 

Powered By Sangraha 9.0