मुंबई : (MGNREGA) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) नामांतरावरून काँग्रेसने केलेले आरोप केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ठामपणे फेटाळले आहेत. मनरेगा ही योजना निवडणूक फायद्यासाठी नव्हे, तर ग्रामीण विकास आणि कामगारांच्या हक्कांसाठी राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस सरकारच्या काळात ही योजना भ्रष्टाचाराचा कळस बनली होती आणि निधीत सातत्याने कपात झाली, असा आरोपही त्यांनी केला.
चौहान यांनी सांगितले की, कामगारांना पुरेसे काम मिळावे याकरिता सध्याच्या अर्थसंकल्पात मनरेगा अंतर्गत १ लाख ५१ हजार कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मोदी सरकारने आतापर्यंत या योजनेवर ८ लाख ५३ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तसंच, विकसित भारत–जी राम जी योजनेत गावस्तरावर निर्णय घेण्यावर भर देण्यात आला असून रोजगाराची हमी १०० वरून १२५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.