आपल्या लेखणीतून पानिपतचा रणसंग्राम डोळ्यांसमोर उभा करणार्या विश्वास पाटील यांनी, कोट्यवधी वाचकांच्या मनामध्ये घर केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग असो किंवा अण्णाभाऊ साठेंची दर्दभरी दास्तान; विश्वास पाटील यांनी वेगवेगळ्या विषयांमधून मराठी साहित्यविश्वाचे दालन समृद्ध केले. नव्या वर्षामध्ये छत्रपतींची राजधानी अशी ओळख असलेल्या सातार्यात, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शतकपूर्तीकडे सुरू असलेली वाटचाल लक्षात घेता, येणार्या काळात साहित्यरसिकांना, वाचकांना या संमेलनातून काय मिळणार? अध्यक्षपदाचा स्वीकार केल्यानंतर कोणत्या नवीन गोष्टी वाचकांना अनुभवायला मिळणार आहेत आदी गोष्टींबद्दल. दै. ‘मुंबई तरुण भारत’शी त्यांनी साधलेला हा संवाद...
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना, आपल्या साहित्यप्रवासाकडे मागे वळून बघताना काय वाटतं?
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची मला संधी लाभली, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, असं मला वाटतं. आजपर्यंत मी जे काही थोडेफार लिखाण केलं, त्याला जी लोकमान्यता मिळाली हे त्याचचं द्योतक आहे. मायमराठीतील दिग्गज लेखकांनी ज्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले, तिथे आपल्याला स्थान मिळणं निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून काहींनी नाराजीचा सूर आळवला आहे. संमेलनाचे स्वरूप दरवर्षीप्रमाणेच असल्याची टीकाही झाली, तेव्हा याकडे आपण कसे बघता?
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लेखकांना, कवींना, आपल्या या संमेलनासाठी आपण निमंत्रण दिले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा वेगवेगळ्या प्रांतातून, मराठी साहित्याचा प्रवाह आपल्याला बघायला मिळतो. सगळ्यांना साहित्य संमेलनामध्ये स्थान मिळावं, म्हणून परिसंवादामध्ये आम्ही नवीन नावं घेतली आहेत. मागच्या दोन ते तीन वर्षांपासून जी नावं आहेत, त्यांच्याऐवजी नवीन लोकांना आपण व्यासपीठ देणार आहोत. 1888 साली ज्यावेळेला पहिल्यांदा साहित्य संमेलन रानडे यांच्या नेतृत्वात पार पडले, त्यावेळेला 50च्या आसपास लोक उपस्थित होते. नंतर ‘वाढता वाढता वाढे’ या न्यायाने आज आपण अशा टप्प्यावर पोहोचलेलो आहोत, जिथे संमेलनांना लोकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. त्यामुळे निश्चितच संमेलनामध्ये वेगळेपणा आहे.
पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरीय साहित्य संमेलने पार पडली, आपण अनेक संमेलनांना उपस्थित होतात. आपला काय अनुभव होता?
मला असं वाटतं की, अजूनही ग्रामीण भागातून येणार्या नवीन लेखकांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही पोकळी भरून निघाली. आपल्याकडची वृत्तपत्रं असतील किंवा इतर माध्यमं असतील, हे नव्या साहित्याला कितपत जागा देतात? एखादी अभिनेत्री गरोदर राहिली तर तिच्या बातम्या तीन-तीन, चार-चार दिवस चालतात. परंतु, दुसर्या बाजूला आपण एखाद्या नव्या लेखकाच्या साहित्यकृतीचे स्वागत करतो का? याचा विचार आपण केला पाहिजे. मराठी भाषेला साप्ताहिकांची, पाक्षिकांची एक समृद्ध परंपरा लाभली होती. आज ही साप्ताहिकं, मासिकं आहेत कुठे? वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण साहित्याचा प्रचार-प्रसार कसा करू शकतो? याचा विचार होणेही गरजेचे आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून, आगामी वर्षभर काय वेगळे उपक्रम राबवण्याचा संकल्प आपण केला आहे?
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद केवळ काही दिवसांसाठी न भूषवता, माय मराठीच्या हितासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. मला असं वाटतं की, तालुका पातळीवर असेल किंवा जिल्हा पातळीवर, ‘मराठी भाषा भवन’ बांधले गेले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळा जशा ऊन, वारा, पाऊस सारंकाही सहन करत मुलांना सावली द्यायच्या, तशाचप्रकारे हे बहुउद्देशीय भाषा भवन मराठीच्या हितासाठी, मराठीच्या प्रेमापोटी काम करेल.
यंदाच्या संमेलनाचे स्थळही अनेक अर्थांनी खास आहे. सातारा ही शिवछत्रपतींची राजधानी, शाहू महाराजांचा वारसा लाभलेले ऐतिहासिक शहर. यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कानेटकर अशी कित्येक साहित्यिकांची ही पंढरी. त्यामुळे प्रीतिसंगमापासून ते साहित्यसंगमापर्यंतचा वारसा या जिल्ह्याला लाभला. त्याकडे कसं बघता?
खरंतर माझ्या नोकरीची सुरुवातच सातार्यामध्ये झाली. पाचगणीमध्ये मी काहीकाळ शिकलो. त्याच काळामध्ये भरपूर पुस्तकांचं वाचन ही मी केलं. मराठी साहित्याचं जे समृद्ध दालन आहे, त्या विश्वाशी मी जोडला गेलो. आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर यांचे अनेक ग्रंथ मी वाचले. सातार्यासोबत माझ्या अनेक रम्य आठवणी जोडल्या गेल्या आहेत. इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेली ही नगरी असल्यानेच, साहित्य संमेलन तेथे पार पडत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या एकूण समाजजीवनात, साहित्यविश्वामध्ये काय परिवर्तन घडले? आपले निरीक्षण काय आहे?
खरं सांगायचं तर, मला फारसं काही परिवर्तन दिसत नाही. केवळ केंद्राकडून अमुक इतके कोटी रुपये मिळणार, यावरतीच चर्चा सुरू आहेत. मात्र, समाज म्हणून तुम्ही तुमच्या भाषेसाठी काय करता, याला जास्त महत्त्व आहे. आज आपल्याकडच्या मराठी शाळा बंद पडत आहेत, आपली मराठी पुस्तकं सगळीकडे मिळतात का? अशा अनेक गोष्टींवरती आपण विचार करणं गरजेचं आहे.
मराठीची ‘अभिजातता’ टिकवून ठेवणे म्हणजे काय?
‘अभिजातता’ टिकून ठेवणे म्हणजे नेमकं काय? याचा विचार समाजातील विचारवंतांनी, शासनात काम करणार्या लोकांनी, सगळ्यांनी एकत्र मिळून केला पाहिजे. मराठीच्या आधीच्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यांची आताची स्थिती काय आहे आणि मराठीची स्थिती काय आहे? याचा तौलनिक अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ घोषणाबाजी करणे, हुरळून जाणे यामधून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा, भाषेच्या वृद्धीसाठी सर्वांगाने काम होणे गरजेचे आहे.
मागच्या वर्षभरात आपल्याकडे मराठी-हिंदी वादाच्या अनेक घटना घडल्या, एक साहित्यिक म्हणून समाजातील या संघर्षाकडे आपण कसे बघता?
यावर मी साहित्य संमेलनामध्येच बोलेन.
भाषेवरून राजकारण करणारी माणसं भाषेसाठी नेमकं काय करायचं, हे सांगताना दिसत नाहीत. भाषा नेमकी समृद्ध कशामुळे होते? ती टिकवायची म्हणजे नेमकं काय करायचं?
मला असं वाटतं की, मराठी भाषा टिकवण्याचं काम हे समाजातील सर्व घटकांनी, माध्यमांनी करायचं काम आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला याबद्दल विचारलं पाहिजे, ज्यावेळेला एखादं कुटुंब चित्रपटगृहामध्ये जातं, त्यावेळेला पॉपकॉर्न घेण्यासाठी हजार-दीड हजार रुपये सहज खर्च करताना दिसते. पण, तेच पुस्तकाच्या दुकानांमध्ये 300 रुपयांचे पुस्तक मात्र त्याला महाग वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की, घरामध्ये भाषा टिकली; तर ती देशामध्ये टिकणार आहे. समाजाने टिकवली तरच भाषा जगते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
एका बाजूला ‘पानिपत’सारखी महाकादंबरी आपण लिहिली. त्यानंतर ‘महानायक’, ‘लस्ट फॉर लालबाग’, ‘दुडिया’, ‘अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान’, अशा असंख्य वेगवेगळ्या साहित्यकृती वाचकांच्या भेटीला आल्या. एकाच वेळेला इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण करणं आणि तेही लोकप्रिय होणारं, यामागच्या यशाचं गमक काय?
मला असं वाटतं की हे जे यश मला मिळालं आहे, ते या आराधनेमुळे मिळालं. साहित्याचे संस्कार झाल्यामुळे आज लिहिता आले. पुस्तकांच्या या जगातूनच मी घडत गेलो.
पुण्याच्या पुस्तक महोत्सवात, आपली ‘अस्मानभरारी’ ही शिवरायांना समर्पित तिसरी कादंबरी प्रकाशित झाली. येणार्या काळात लिखाणासाठी कुठला विषय खुणावतो?
खरंतर अद्याप मी ‘अस्मानभरारी’मधूनच बाहेर पडलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून झालेल्या सुटकेवर, नव्याने प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. वाचकांनी अत्यंत उत्साहामध्ये या कादंबरीचं स्वागत केलं आहे. अद्याप तरी नव्या लिखाणाचं प्रयोजन नाही.
माणसाच्या आयुष्यामध्ये आणि समाजजीवनामध्ये साहित्याचे प्रयोजन नेमकं काय असतं, आपल्याला काय वाटतं?
माणूस आणि जनावरामध्ये मुख्य फरक हाच असतो की, माणूस हा सुसंस्कृत प्राणी आहे. त्यालासुद्धा तहानभूक आदी गोष्टी आहेतच मात्र, या सार्याच्या पलीकडेसुद्धा त्याचं आयुष्य आहे. जिथे सुसंस्कार आहेत, तिथेच साहित्य आहे. माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी मोठं ध्येय असतं, याची जाणीव साहित्याच्या माध्यमातूनच त्याला होते. त्यामुळे साहित्य या गोष्टीला मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे.