_202512282013139961_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
नाटक म्हटलं की त्यात भाषा ही आलीच, भाषा म्हटलं की शब्दही आले. शब्द आले की, त्यांचे उच्चार आले. स्वच्छ, सुंदर आणि सात्विकरित्या वाक्य म्हटल्यास, त्याचा परिणाम प्रेक्षकांवर प्रकर्षाने होतो. मराठी नाटकात मुलांना शब्दोच्चार करणे कठीण जात असल्याने, त्यांच्याकडून विशेष मेहनत करून घ्यावी लागते. नाट्यामधील भाषणातून व्यक्त होणं, हा अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा भाग. कृती, हालचाली आणि भावनांच्या साहाय्याने कथा पुढे सरकत असली, तरी या सर्वांना एकत्र बांधून त्यांना सखोल अर्थ देण्याचं काम भाषाच करते. संवादप्रक्रियेत भाषणाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते आणि याच ठिकाणी रंगीत तालीम मुलांना प्रभावीपणे स्वतःला व्यक्त करण्यास मदत करते. भाषणामध्ये उच्चारलेले शब्द, ध्वनियुक्त शब्द आणि भावनांनी परिपूर्ण ध्वनी यांचा समावेश होतो. नाट्यात बोलले जाणारे शब्द ‘संवाद’ किंवा ’डायलॉग’ म्हणून ओळखले जातात. कथानकासह संवादांचा संग्रह म्हणजे पटकथा. ही लेखक लिहितो, दिग्दर्शक दिग्दर्शित करतो आणि कलाकार सादर करतो.
नाटकामध्ये विविध पात्रांच्या साहाय्याने कथा प्रभावीपणे सादर केली जाते. नाटक हे कल्पनाविलासावरच आधारित असतं, ते समाजाचा आरसा आहे. त्यामध्ये उच्च मनोरंजनमूल्ये, कल्पनाशक्ती उंचावण्याची क्षमता आणि मांडल्या जाणार्या विषयावर चिंतन करण्याची संधी असते. या सर्वांसाठी समज आवश्यक असते आणि त्यासाठी भाषण महत्त्वाची भूमिका बजावतं. नाट्यात शब्द स्पष्ट व मोठ्या आवाजात बोललं जाणं अपेक्षित असतं. मुलांवर होणारा परिणाम त्यांची क्षमता व शिकण्याच्या तयारीवर अवलंबून असतो. हा परिणाम अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असण्याबरोबरच, प्रत्येक मुलामध्ये वेगळा असतो. त्यामुळे मुलांमध्ये भाषेबद्दल रस निर्माण होतो, भाषेचे विविध स्वाद त्यांना कळू लागतात आणि त्यांचा शब्दसंग्रह आणि आत्मविश्वास वाढतो. स्वरांमुळे मुलांना समजतं की, एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे बोलल्यावर, विशिष्ट शब्दांवर दिलेला जोर वेगवेगळे अर्थ निर्माण करू शकतो. प्रत्येक पात्राची बोलण्याची एक स्वतंत्र शैली असते, ज्यामुळे संवाद अधिक रंजक होण्याबरोबरच, वैविध्यपूर्णही होतात. मुलं एकमेकांकडून शिकतात; तसेच आपण साकारत नसलेल्या पात्रांचेही अनुकरण करतात.
चांगल्या भाषणाची अभिव्यक्ती साधण्यासाठी नाट्य तालमीदरम्यान पुढील टप्पे वापरले जातात :
एक म्हणजे महाकवी कालिदास रचित ‘देवानामिदमामनन्ति’ या संस्कृत श्लोकाचं पठण,
देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं ऋतुं चाक्षुषं।
रूद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा।
त्रैगुण्योभ्दवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते।
नाट्यं भिन्नरूचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्॥
सुरुवातीच्या काही दिवसांत मुलांना हा श्लोक फक्त म्हणायला सांगितला जातो. यामागचा उद्देश असा की, शब्द शिकण्यासाठी त्यांचा अर्थ समजणं आवश्यक नाही, हे त्यांना जाणवावं. त्यामुळे चांगलं बोलण्यासाठी चांगलं ऐकणंही आवश्यक आहे, हे मुलांना समजतं.
मराठी स्वर व व्यंजनांची ओळख : कोणतीही भाषा बोलण्यासाठी, त्या भाषेतील स्वर व व्यंजनांचे ज्ञान आवश्यक आहे. प्रत्येक अक्षराच्या ध्वनीचं स्वरूप समजावून सांगितलं जातं आणि विद्यार्थ्यांना स्पष्ट उच्चार करण्यासही शिकवले जातं. जबडा, घसा, जीभ, एपिग्लॉटिस, दात आणि ओठ यांचा योग्य वापर करून उच्चार कसा करायचा, याचं प्रशिक्षण दिलं जातं. नाट्यखेळाच्या स्वरूपात हे शिकवले जात असल्याने शिकणं आनंददायी होतं.
स्पष्ट भाषणासाठी चार सुवर्णनियमांचं पठण
नियम 1: आधी कल्पना करा, मग बोला
संवाद हा बहुतेक वेळा सहकलाकाराच्या संवादाला किंवा कृतीला दिलेली प्रतिक्रिया असतो. या प्रेरणेची जाणीव नसेल, तर संवाद अपूर्ण ठरतो. विद्यार्थ्यांना बोलण्याआधी काय सांगायचं आहे, ते डोळ्यांसमोर आणायला व सहकलाकाराशी नेत्रसंपर्क साधायला सांगितलं जातं. पाहणं, आत्मसात करणं, विश्वास ठेवणं, विचार करणं, प्रक्रिया करणं आणि मग बोलणं यांचं महत्त्व शिकवलं जातं.
नियम 2: उत्तम श्वास, हा उत्तम
आवाजाचा आत्मा आहे
चांगल्या भाषणासाठी श्वसन अत्यंत महत्त्वाचं : आपण श्वास सोडतानाच बोलू शकतो. संवाद सुरू करण्यापूर्वी खोल श्वास घेणं, दोन वाक्यांमध्ये श्वास घेणं अशा तंत्रांचं प्रशिक्षण दिलं जातं. वर्गाच्या सुरुवातीला ‘ॐ’चा जप वेगवेगळ्या आवाजात व वेगवेगळ्या मनःस्थितीत करून घेतला जातो, त्यामुळे स्वरातील फरक समजतो.
नियम 3: वाक्याच्या शेवटपर्यंत स्पष्टता आवश्यक आहे
अनेकदा विद्यार्थी विविध कारणांमुळे, वाक्याच्या शेवटच्या शब्दाला आवाज कमी करतात किंवा स्पष्टपणे शेवटचा शब्द उच्चारत नाहीत. हा नियम वर्गाच्या सुरुवातीचा एक विधी म्हणून म्हटला जातो. संवाद पूर्णपणे ऐकू येणं कसं महत्त्वाचं असतं आणि त्यातून आत्मविश्वास कसा प्रकट होतो, हे विद्यार्थ्यांना समजावलं जातं.
नियम 4: मोठा आवाज म्हणजे ओरडणे नव्हे,
तर विस्ताराने बोलणं होय
मुलं ऐकू येण्यासाठी ओरडतात, यामुळे स्वरयंत्रावर ताण येतो. या नियमातून आवाज वाढवणं नव्हे, तर शब्दांवर योग्य जोर देणं व शब्दांमधील अंतर वाढवणं असल्याचे समजवले जाते. संवाद हळूहळू आणि स्पष्ट होण्यासाठीचा सराव करून घेतला जातो.
पात्र समजून घेणं आणि त्यानुसार आवाजात बदल करणं : पात्र उभारताना त्याचे कधी, का, काय आणि कसं याचं आकलन आवश्यक असतं. पात्राचा स्वभाव, वर्तन, संस्कृती, रूप व अनुभव लक्षात घेऊनच आवाज व स्वरछटा ठरवली जाते.
नाटकाच्या भाषेतील नवे शब्द व बारकाव्यांची ओळख : भाषा संवादामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ती त्या भौगोलिक प्रदेशातील संस्कृती आणि परंपरांसह येते. पटकथेमधील संवादांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषेतील बारकावे शिकवले जातात. यामध्ये शब्द आणि वाक्प्रचारांची ओळख करून देण्याबरोबरच, सरावही करून घेतला जातो. याशिवाय, हे शब्द फक्त ओळख करून देण्यापुरते मर्यादित न ठेवता, विद्यार्थी जे बोलत आहेत, त्यावर विश्वास ठेवून ते आत्मविश्वासाने व्यक्त करतील, असं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे ज्ञानार्जनाबरोबरच, मुलांचा शब्दसंग्रहसुद्धा समृद्ध होतो.
प्रभावी संवादासाठी इंटोनेशनचा वापर
एकाच वाक्यात वेगवेगळ्या शब्दांवर जोर दिल्यास अर्थ कसा बदलतो, हे विद्यार्थ्यांना उदाहरणांद्वारे समजतं.
पटकथेचं मोठ्याने वाचन
सुरुवातीला पटकथावाचन न करता, कृतीवर भर दिला जातो. संवाद पक्के झाल्यानंतरच विद्यार्थी स्वतः मोठ्याने पटकथा वाचू लागतात आणि आत्मविश्वास वाढतो.
विविध प्रकारच्या तालमी व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समजून घेणं
प्रेक्षकांसमोर सादरीकरण, तालमीतील सादरीकरण आणि आरशासमोर/रेकॉर्डिंग करून सादरीकरण अशा तिन्ही प्रकारांचा अनुभव दिला जातो. प्रयोगशीलतेतून सुधारणा साधली जाते.
लहान वयात नाट्यशिक्षण महत्त्वाचं आहे. नाट्यतालीम म्हणजे प्रयोगशीलतेची प्रक्रिया आहे. नाट्य म्हणजे जे आहे ते नव्हे, तर जे होऊ शकतं ते. सुरक्षित वातावरणात शक्यता तपासण्याची संधी नाटक देतं. परिणाम मोजता येत नसला, तरी तो अनुभवता व पाहता येतो. मुलांमध्ये भाषणाच्या अभिव्यक्तीत सकारात्मक बदल दिसून येतो. शिक्षक व पटकथा यांचीही महत्त्वाची भूमिका असते. शिक्षकाकडे प्रक्रियेचं नियंत्रण असावं आणि निवडलेली पटकथा मुलांसाठी रंजक असावी, म्हणजे परिणाम अजून प्रकर्षाने जाणवतो.
विविध शब्दांवर जोर अर्थ
आई मला भूक लागली - आई शब्दावर जोर दिल्याने, आईला उद्देशून हे वाक्य बोललं गेल्याचे समजते.
आई मला भूक लागली - मला शब्दावर जोर देऊन, मला भूक लागली असून, बाकी कोणाला नाही असे अधोरेखित होते.
आई मला भूक लागली - भूक शब्दावर जोर दिल्याने, मला अजून काही झालेलं नसून, भूक लागली असल्याचे स्पष्ट होते.
आई मला भूक लागली - लागली शब्दावर जोर दिल्याने मला आता भूक लागल्याचे अधोरेखित होते.
- रानी राधिका देशपांडे
raneeonstage@gmail.com