मुंबई : ( Global Maitri Festival ) मैत्री आणि प्रेमभाव यांच्या बळावरच ‘एक भारत, हम भारत’ हे राष्ट्रीय स्वप्न साकार होऊ शकते, असे प्रतिपादन मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक मैत्रेय दादाश्री यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली घाटकोपर येथील पोलिस परेड ग्राउंडवर मैत्री महोत्सव ग्लोबल मैत्री फेस्टिवल उत्साहात पार पडला.२७ डिसेंबर हा दिवस मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक मैत्रेय दादाश्री यांचा वाढदिवस असून, हा दिवस ग्लोबल मैत्री फाउंडेशनअंतर्गत समाजातील सर्व घटकांसोबत साजरा केला जातो. या निमित्ताने दिव्य साधना, होम-हवन आणि मानसिक शांततेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दादा वेदक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुंबई महानगर अध्यक्ष सुरेश भगेरिया आणि धर्म जागरण प्रमुख शरद ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी एड. मोहन जयकर यांनी स्वागत भाषण केले. त्यांनी मैत्रीबोध परिवाराची मूल्यव्यवस्था, उद्दिष्टे आणि दीर्घकालीन सामाजिक धोरण यांचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला.
या महोत्सवात अभिनेते मकरंद देशपांडे आणि आदिती पोहरणकर यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पर्यावरण संवर्धनावर भाष्य करताना पर्यावरणच मानवजातीचे तारण करत असल्याचे मत मांडले आणि त्याच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सजग राहावे, असे आवाहन केले. यावेळी अभिनेत्री स्मिता जयकर, पत्रकार राजीव खांडेकर, पद्मश्री चैत्राम पवार, डॉक्टर प्रीती रेड्डी, अभिनेते आदिनाथ कोठारे, भाजप प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल, अभिनेते किरण कुमार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मैत्रीबोध परिवाराचे निखिलेश सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्लोबल मैत्री फेस्टिवल २०२५ मध्ये देश-विदेशातून आलेले साधक, स्वयंसेवक, विचारवंत, मान्यवर तसेच कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी, मानसिक कल्याणासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून या महोत्सवाने आपली ओळख ठामपणे अधोरेखित केली. ग्लोबल मैत्री फेस्टिवलच्या ‘एक भारत, हम भारत’ या संकल्पनेचे प्रभावी दर्शन घडवताना भारतातील सर्व राज्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी नृत्यसादरीकरणे करण्यात आली. विविध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
पुढे आपल्या उद्बोधनात मैत्रेय दादाश्री यांनी प्रेम, मैत्रीभाव आणि सकारात्मकतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रेमाने आणि मैत्रीभावाने जीवनात सर्व काही साध्य करता येते, असे त्यांचे मत व्यक्त झाले. स्वतःशी आधी मैत्री केल्याशिवाय सामाजिक पातळीवर खरा मैत्रीभाव निर्माण होऊ शकत नाही, असा विचार त्यांनी मांडला. प्रेम, क्षमा आणि स्वभाव परिवर्तन हाच मैत्रीबोधचा खरा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मैत्रीबोध परिवारातून जागृत होणारा मैत्रीभाव ही स्वतःपासून सुरू केलेली साधना असून ती आज जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचा अनुभव त्यांनी मांडला.
समाज आणि राष्ट्रसेवेसाठी एकत्र येऊन काम करणे हीच खरी कीर्ती असल्याचे त्यांनी नमूद केले. जीवनात स्पष्ट ध्येय आणि योग्य दिशा नसेल तर जीवन निरर्थक ठरते, असा विचार त्यांनी मांडला. वसुधैव कुटुंबकम हा भारताने जगाला दिलेला विचार असून, संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानण्याच्या भावनेतूनच मैत्रीबोध परिवार ‘एक भारत, हम भारत’ या उद्दिष्टासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत हा सर्वांना एकत्र बांधणारा देश असून तो कधीही कुणाच्या विरोधात विचार करणारा नाही, असे त्यांचे मत आहे. हा विचार काहींनी विसरल्याने समाजात संभ्रम निर्माण होत असून, तो दूर करण्याची जबाबदारी मैत्रीबोध परिवार स्वीकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नकारात्मकता आणि नैराश्याने ग्रस्त समाजाला सकारात्मकतेकडे नेण्याचे कार्य ग्लोबल मैत्री फेस्टिवलच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मैत्री आणि प्रेमभावातच संपूर्ण विश्वात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मैत्रीबोध परिवाराचे कार्य दीर्घकालीन साधनेचे असून पुढील दोनशे वर्षांचा विचार करून ही चळवळ उभी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पुढील पाच ते सहा वर्षांत समाजासाठी अधिक जोमाने कार्य करून समाजाला नैराश्यातून बाहेर काढणे आणि सक्षम बनवणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
धर्म म्हणजे आचरण आणि साधना असून, धर्मासोबत जगणे हाच खरा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःला कोणताही आध्यात्मिक गुरु किंवा देवत्व न मानता, नैराश्यग्रस्त समाजाशी मैत्रीभावाने आणि प्रेमाने संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मैत्रीबोध परिवाराच्या उपक्रमांबाबत अधिक माहितीसाठी ८९२९ ७०७ २२२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल तसेच
www.maitribodh.org या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली.