नवी दिल्ली : (Aravalli Controversy) अरवली पर्वतरांगेच्या नुकत्याच करण्यात आलेल्या नव्या व्याख्येमुळे निर्माण झालेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेतली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या प्रकरणाची सोमवारी दि. २९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
सध्याच्या व्याख्येनुसार अरवली पर्वतरांगेमध्ये स्थानिक पातळीपासून किमान १०० मीटर उंचीवरील जमिनीचा समावेश करण्यात आला आहे. या फेरव्याख्येमुळे खाणकाम आणि बांधकामांना वैधता मिळून पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञ आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. अरवली पर्वतरांग उत्तर भारताच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असून भूजल, हवामान आणि जैवविविधतेवर तिचा मोठा प्रभाव आहे.
हा खटला सरन्यायाधीशांच्या सुट्टीकालीन न्यायालयाच्या कामकाजात पाचव्या क्रमांकावर सूचीबद्ध करण्यात आला आहे. या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले असून, केंद्र व संबंधित राज्य सरकारांना याप्रकरणी नवीन निर्देश जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.