_202512282031377461_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : (Amit Shah criticised Rahul Gandhi) "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून जाऊ नये, कारण आगामी काळात बंगाल आणि तामिळनाडूमध्येही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना थेट टोला लगावला. अहमदाबाद महानगरपालिकेच्या ३३० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शाह यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीबाबतही मोठे भाष्य केले. देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शाह म्हणाले की, "२०२९ मध्ये भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्तेत येईल. भाजपची तत्त्वे आणि जनतेशी असलेले नाते इतके घट्ट आहे की, देशाचा विकास रथ कोणीही रोखू शकणार नाही."
अमित शाह यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या विरोध करण्याच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. राम मंदिर उभारणी असो किंवा पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसने प्रत्येक वेळी विरोधच केला. काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयालाही काँग्रेसने कडाडून विरोध केला. समान नागरी कायदा आणि बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याच्या मोहिमेतही काँग्रेसने आडकाठी आणली, असेही अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, "जनता ज्या गोष्टींचे समर्थन करते, नेमके त्याच गोष्टींना राहुल गांधी आणि काँग्रेस विरोध करतात. ज्या नेत्याला त्यांचा स्वतःचा पक्ष नीट समजू शकला नाही, त्यांना समजवण्याची क्षमता माझ्यात नाही. अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना जनतेची मते कशी मिळतील?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.