'एआय' : एक प्रवास आणि भविष्याचा वेध

28 Dec 2025 17:28:56


Artificial Intelligence




गेल्या काही महिन्यांपासून जयंतराव, त्यांचा नातू आदित्य आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’ या विषयावर, एक प्रदीर्घ चर्चेची मालिका पूर्ण केली. ही चर्चा केवळ तांत्रिक नव्हती, तर ती ‘एआय’च्या सामाजिक, आर्थिक आणि नैतिक पैलूंकडे पाहणारा एक नवा दृष्टिकोन देणारी ठरली. या लेखात आपण या संपूर्ण मालिकेचा सारांश, मुख्य मुद्द्यांवरील चर्चा आणि आगामी संवादांची दिशा यांचा घेतलेला आढावा...

 

. ‘एआय’चा उगम आणि तांत्रिक पाया

मालिकेची सुरुवात ‘एआय’च्या इतिहासाने झाली. ‘एआय’ म्हणजे केवळ आजचे ‘चॅटजीपीटी’ नसून, याचा पाया १९५६च्या ‘डाटमथ कॉन्फरन्स’मध्ये जॉन मॅकार्थी यांनी घातला होता. तिथून सुरू झालेला हा प्रवास, सुरुवातीला केवळ गणिती आकडेमोडीपुरता मर्यादित होता. मात्र, गेल्या दोन दशकांत ‘डेटा’ची उपलब्धता आणि संगणकीय शक्ती वाढल्यामुळे, ‘मशीन लर्निंग’ आणि ‘डीप लर्निंग’चा जन्म झाला.

या प्रवासातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे ‘जनरेटिव्ह एआय’. पूर्वीचा ‘एआय’ फक्त माहितीचे विश्लेषण करायचा; पण आताचा ‘एआय’ मजकूर लिहिणे, चित्र काढणे (‘मीडजर्नी’ सारखी साधने) आणि व्हिडिओ तयार करणे यांसारखी सर्जनशील कामे करू लागला आहे.

. ‘एआय’चे विविध क्षेत्रांतील उपयोग : मानवी जीवनाचा कायापालट

चर्चेदरम्यान आदित्यने विविध क्षेत्रांतील ‘एआय’चे महत्त्व पटवून दिले, ज्याचे सार खालीलप्रमाणे आहे :

शिक्षण : ‘एआय’ शिक्षकाची जागा घेणार नाही, तर तो ‘वैयक्तिक मार्गदर्शक’ म्हणून काम करेल. विद्यार्थ्याच्या गतीनुसार त्याला शिकवणारी यंत्रणा आता उभी राहात आहे.

आरोग्यसेवा : भारतात डॉक्टरांची कमतरता असताना, ‘एआय’ एक सक्षम ‘सहायक’ ठरू शकतो. रोगनिदान करणे, क्ष-किरण अहवाल वाचणे आणि शस्त्रक्रियेत अचूकता आणणे यात ‘एआय’चा मोलाचा वाटा आहे.

शेती : हवामानाचा अचूक अंदाज, पिकांवरील रोगांची ओळख (प्लांटिक्स एन) आणि बाजारभावाचे विश्लेषण यामुळे, ‘डिजिटल कृषी क्रांती’ शक्य असल्याचे गणपतरावांबरोबरच्या चर्चेतून समोर आले.

न्यायव्यवस्था आणि संरक्षण : प्रलंबित खटल्यांच्या संदर्भात मदत करणे, आणि सीमेवर ‘अदृश्य कवच’ म्हणून ड्रोन व ‘एआय’ आधारित युद्ध प्रणालीद्वारे देशाचे रक्षण करणे, हे ‘एआय’चे सामर्थ्य आपण पाहिले.

. ‘एआय’चे अर्थशास्त्र आणि नवी साधने

एआय’ केवळ विज्ञानाचा भाग नाही, तर तो जगातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक झाला आहे. ‘एनव्हीडिया’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे ‘चक्रव्यूह’ आपण पाहिले. जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेली ‘एनव्हीडिया’ ‘एआय’ला लागणार्‍या चिप्स (जीपीयू) बनवते, तर मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमध्ये गुंतवणूक करते. तसेच, अरविंद श्रीनिवासन या भारतीय तरुणाने स्थापन केलेली ‘पर्पलेक्सिटी एआय’ ही कंपनी आता, माहिती शोधण्याच्या पद्धतीत कशी क्रांती करत आहे, यावरही चर्चा झाली.

नव्या तंत्रज्ञानामध्ये ‘एजंटिक एआय’ हा महत्त्वाचा बदल आहे. हा ‘एआय’ फक्त प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर तुमच्या वतीने तिकिटे बुक करणे किंवा ऑफिसची कामे पूर्ण करणे अशी प्रत्यक्ष कृतीही करतो, हे आपण बघितले.

. ‘एआय’चे नियमन आणि नियंत्रण (‘एआय’ गव्हर्नन्स)

आपल्या चर्चेतील एक कळीचा मुद्दा म्हणजे ‘एआय’चे नियंत्रण. जयंतरावांनी विचारल्याप्रमाणे, ब्रेकशिवायची गाडी घातक ठरू शकते. यावर आपण सविस्तर चर्चा केली.

जागतिक कायदे : युरोपियन युनियनचा ‘ईयू एआय अ‍ॅक्ट-२०२४हा जगातील पहिला व्यापक कायदा ठरला आहे, ज्याने जोखमीनुसार ‘एआय’चे वर्गीकरण केले आहे.

भारताची भूमिका : भारतासमोर २२ अधिकृत भाषा आणि मोठी ग्रामीण-शहरी दरी असल्याने, येथे ‘जबाबदार एआय’ असणे गरजेचे आहे.

नैतिकता आणि पारदर्शकता : ‘एआय’ने घेतलेल्या निर्णयांचे स्पष्टीकरण मिळावे आणि आपली गोपनीयता जपली जावी, यासाठी कठोर नियमावलीची आवश्यकता आपण अधोरेखित केली.

. आव्हाने, मर्यादा आणि नैतिकता

एआय’चे काही गंभीर धोके समोर आले आहेत. ही नाण्याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची होती.

बौद्धिक र्‍हास : ‘एआय’वर जास्त अवलंबून राहिल्याने, मानवाची चिकित्सक विचारशक्ती कमी होण्याचा धोका आहे.

एआय’ला होणारे भ्रम : ‘एआय’ अनेकदा अत्यंत आत्मविश्वासाने चुकीची माहिती देतो, जे कायदेशीर आणि वैद्यकीय क्षेत्रात घातक ठरू शकते.

पर्यावरण : ‘एआय’ मॉडेल्सना लागणारी प्रचंड वीज आणि सर्व्हर थंड करण्यासाठी लागणारे पाणी, यामुळे पर्यावरणावर ताण येतोय. म्हणूनच, ‘हरित एआय’ ही काळाची गरज बनली आहे.

डीपफेक आणि गोपनीयता : खोटे व्हिडिओ आणि माहितीच्या गोपनीयतेचा अभाव, ही सामाजिक सुरक्षेपुढील मोठी आव्हाने आहेत.

. ‘एआय’ वापरण्याची कला : प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग

एआय’ला आपण कसा प्रश्न विचारतो? यावरच त्याचे उत्तर अवलंबून असते. योग्य भूमिका, संदर्भ आणि मर्यादा दिल्यास, ‘एआय’ अधिक चांगल्याप्रकारे आपल्याला मदत करू शकतो, हे आपण मालिकेच्या उत्तरार्धात पाहिले.

भविष्यातील दिशा : आगामी चर्चेचा वेध

मालिकेचा हा टप्पा संपला असला, तरी ‘एआय’ची प्रगती थांबलेली नाही. पुढील चर्चांमध्ये आपण खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा वेध घेणार आहोत :

. ‘एजीआय’ (आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स)कडे वाटचाल :

आतापर्यंत आपण जे पाहिले, ते ‘नॅरो एआय’ होते; जो एका विशिष्ट कामात निष्णात असतो. पण, भविष्यातील चर्चांचा केंद्रबिंदू ‘एजीआय’ हा असेल. ’एजीआय’ म्हणजे असा ‘एआय’, जो मानवाप्रमाणे कोणत्याही बौद्धिक कामात सक्षम असेल. तो स्वतःहून शिकू शकेल, तर्क करू शकेल आणि कदाचित स्वतःची जाणीवही विकसित करण्याचा प्रयत्न करेल. हा टप्पा मानवजातीसाठी वरदान ठरेल की शाप, याचा सखोल ऊहापोह आपल्याला करायचा आहे.

. ‘एआय’ आणि मानवाचे सहअस्तित्व :

एआय’ माणसाला विस्थापित करेल की, माणसाची कार्यक्षमता वाढवेल? भविष्यातील चर्चांमध्ये आपण ‘अग्युमेंटेड इंटेलिजन्स’वर लक्ष केंद्रित करू, जिथे मानवी सर्जनशीलता आणि ‘एआय’ची गती यांचा संगम कसा साधता येईल, याची आपण चर्चा करू.

. स्थानिक ‘एआय’ आणि गोपनीयता :

प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट किंवा क्लाऊडवर अवलंबून न राहता, आपल्या स्वतःच्या उपकरणावर (मोबाईल/लॅपटॉप) चालणारा ‘एआय’ कसा असेल? यामुळे डेटा सुरक्षितता कशी वाढेल? यावरही पुढे संवाद होतील.

. जागतिक आणि भारतीय ‘एआय’ नियमन :

युरोपियन युनियनच्या ‘एआय’ कायद्याप्रमाणे भारतात कोणते कायदे येतील? ‘रिस्पॉन्सिबल एआय’ (जबाबदार एआय) ही संकल्पना प्रत्यक्षात कशी येईल आणि सर्वसामान्यांचे अधिकार कसे जपले जातील, हे आगामी चर्चेचे मुख्य विषय असतील.

. ‘एआय’ आणि भारतीय भाषा :

भारतातील भाषिक विविधता लक्षात घेता, मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये ‘एआय’ कसा पोहोचेल आणि ग्रामीण भागातील ‘डिजिटल दरी’ कशी कमी होईल, याचाही वेध आपण घेणार आहोत.

निष्कर्ष

जयंतराव आणि आदित्यच्या या १८ भागांच्या मालिकेचा मुख्य निष्कर्ष हाच आहे की, ‘एआय’ हे एक साधन आहे, साध्य नाही. ‘एआय’ हे वीज किंवा आगीसारखे आहे. जर ते नीट वापरले, तर प्रगतीचा मार्ग सुकर करेल मात्र, ‘एजीआय’सारख्या प्रगत तंत्रज्ञानाकडे वळताना, आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. भविष्यातील चर्चा या केवळ तंत्रज्ञानाच्या कौतुकासाठी नसून, एक सुजाण आणि जबाबदार ’एआय समाज’ घडवण्यासाठी असतील.

एआय’ची ही गोष्ट अजून संपलेली नाही, ती तर नुकतीच सुरू झाली आहे. आपण फक्त तिचे वाचक न राहता ‘जबाबदार सहभागी’ बनणे, हीच काळाची गरज आहे.



डॉ. कुलदीप देशपांडे

(लेखक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अ‍ॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रांतील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्‍या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)


Powered By Sangraha 9.0