आघाडीची वाट

27 Dec 2025 10:46:13
Thackere
 
पुण्यात महानगरपालिका निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याची चिन्हे आहेत. इच्छुकांनीही अगदी जय्यत तयारी सुरू केली आहे. राजकीय युतीत आता पुण्यात ‘उबाठा + मनसे’ असे समीकरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे, मागील कार्यकाळात भाजपच्या सहकार्याने निवडून आलेले आताच्या उद्धव बाळासाहेब शिवसेनेचा एकही नगरसेवक त्यांच्या पक्षाकडे शिल्लक राहिलेला नाही. कारण, सर्वांनीच पक्षांतर केले आहे. ज्या शरद पवारांच्या कुबड्यांवर उबाठाने भाजपला दिलेला जनादेश धुडकावून राज्यात सत्तेचा मलिदा लाटला, त्या उबाठाला येथे कोणीही विचारत नाही. एवढेच काय तर या पक्षातील लोकांना किती पुणेकर ओळखतात, त्याबद्दलही शंका वाटावी, अशी परिस्थिती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुण्यात अस्तित्वच नसल्याने आता उमेदवारांची शोधाशोध करण्याची वेळ आली.
 
अजित पवार व शरद पवार गट एकत्र आले, तर यांच्या आघाडीत असलेला तिसरा पक्ष काँग्रेसला सोबत घ्यायला तयार नाही. उबाठाप्रमाणे मनसेची स्थितीही पुण्यात फारशी मजबूत नाही. त्यामुळे पुण्यात नेतृत्वहीन असलेले हे दोन पक्ष काय दिवे लावतील, हे उघड आहे. अशा विझत चाललेल्या ‘मशाली’ला पुणेरी मतदार कशी साथ देतो, हे पाहणे मनोरंजक ठरेल. तसेही हे लोक निवडून आल्यावरदेखील जनतेचे भले करण्याऐवजी स्वतःचेच उखळ पांढरे करतात, हा अनुभवदेखील पुणेकरांच्या गाठीशी असल्याने एकेकाळी ‘ठाकरे’ नावाची हुकूमत असलेल्या या दोघांची पुणेकर यंदा परीक्षा घेणार आहेत. त्यात हे ठाकरे बंधू यशस्वी होणार का, हे संक्रांतीनंतरच कळेल. असे असले तरी आजचा राजकारणाचा पोत बघता, अनाकलनीय असे निकालदेखील लागू शकतात, हे नाकारुन चालणार नाही. महानगरात या दोन्ही ठाकरेंच्या पक्षाने कोणतीही प्रगती, विकासाची कामे केलेली नाहीत. त्यामुळे ज्या प्रभागात ठाकरेंचे उमेदवार रिंगणात असतील, ते एकतर त्यांचा प्रतिस्पर्धी दुबळा असेल; तरच निवडून येतील. अन्य काही करिश्मा, चमत्कारिक वगैरे होईल, अशी तूर्तास शाश्वती नाही. एकूणच, पुण्यात ठाकरी बाणा काय रंग दाखवितो, ते पाहणे म्हणजे नुसते मनोरंजन. कारण, आघाडीची वाट लागली आहेच. एकूणच काय, तर राजकारणाचा खेळखंडोबा करणार्‍यांनी जनतेच्या अपेक्षांची वाट लावली. आता त्यांची वाट लावायला मतदारही तयार आहे.
 
काँग्रेसचा थाट
 
पुण्यात काँग्रेसची अवस्था सर्वार्थाने बिकट. एकीकडे अजित पवार गटासोबत जायचे नाही, असे निरोप येथील उरल्यासुरल्या नेत्यांना आले, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जावे की नाही, ही संभ्रमावस्था कायम आहे. देशातील अतिशय जुन्या आणि तळागाळात पोहोचलेल्या पक्षाची आज पुण्यातील ही केविलवाणी अवस्था. तरीही, त्यांचा थाट कायम आहे. तसेच उबाठाकडून जागावाटपाच्या बोलणीसाठी स्थानिक नेताच नसल्याने काँग्रेससमोरही आघाडी म्हणून लढायचे कसे, हा प्रश्नदेखील आहेच. त्यात आघाड्यांचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. कोणत्याही प्रमुख पक्षांनी अद्याप आपली रणनीती स्पष्ट केली नाही. उमेदवार यादी केव्हाही जाहीर होऊ शकते. मात्र, अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याने बंडखोरी, प्रभागात उमेदवारांची गर्दी असे चित्र पाहायला मिळू शकते. दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस, तिकडे दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष आणि महायुती असे चित्र सध्या तरी दिसत असले; तरी अनेक लहान पक्ष, स्थानिक आघाडी आणि अपक्षांचा रिंगणातील प्रवेश बहुतांश प्रभागात मोठ्या पक्षांची गणिते बिघडवू शकतो.
 
असे असले तरी महायुतीला विरोध करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे या निवडणुकीत कसे आव्हान उभे करतात, त्यांचे खरोखरच तेवढे सामर्थ्य आहे का? हे सगळे चित्र आगामी काळात दिसणार आहे. विशेष म्हणजे, या विरोधकांजवळ कोणताही चेहरा नाही. त्यांचे नेते पुण्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तरीही, आगामी काळात या सर्व प्रमुख राजकीय पक्षांची परीक्षा मतदार घेतील. त्याला सामोरे जाण्याची सगळी तयारी हे पक्ष करीत आहेत. यात अभ्यास फक्त महायुतीने केला आहे. तथापि, कॉपीबहाद्दरदेखील खूप आहेत. त्यामुळे हा पुणे महानगरपालिका रणसंग्राम निश्चितच उत्कंठावर्धक असेल, यात संदेह नाही. पुणेकर मतदार चातुर्याने मतदान करतो, असा आजवरचा इतिहास आहे. इतक्या कालावधीनंतर महापालिका निवडणूक होत असल्याने मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या.पुलाखालूनही बरेच पाणी वाहून गेले आहे. मतदारांनाही त्याची पूर्ण कल्पना आहे, हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे.
 
 - अतुल तांदळीकर
 
 
Powered By Sangraha 9.0