ठाणे : ( Namo Bharat, Namo Thane ) ठाण्यातील तीन हात नाका परिसरात भाजपच्या वतीने नमो भारत,नमो ठाणे असे बॅनर लावण्यात आले आहेते. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ पहायला मिळत आहे ठाण्यामध्ये 131 नगरसेवक उमेदवार म्हणून भाजप, शिवसेना युतीमधून आपला अर्ज भरणार आहेत. परंतु अद्यापही महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्मुला ठरत नसल्यामुळे महायुतीत ठाण्यात भाजप 40 ते 45 जागावर ठाम असल्याचे कळत आहे. परंतु असा प्रस्ताव भाजपने शिवसेना शिंदे गटासमोर ठेवलेला असल्याने अद्यापही शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत जागा वाटप संदर्भात घोषणा झाली नाही, यामुळे भाजपच्या वतीने एकला चलो ची भूमिका बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
जागा वाटपा करिता मॅरेथॉन बैठका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झाल्या त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या भाजप, शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार असेल यांच्या बैठक या देखील झाल्या परंतु भाजपा ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 40 ते 45 जागांच्या मागणीवर ठाम असल्याने शिवसेना अद्याप तरी जागावाट्याचा फॉर्मुला समोर ठेवत नाही आहे, सोमवारपासून सर्व पक्षाच्या वतीने उमेदवारांचा अर्ज भरण्याची जोरदार तयारी सुरू होणार आहे, परंतु भाजप आणि शिवसेना महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप तरी ठरत नाही. यामुळे ठाण्यामध्ये नमो भारत, नमो ठाणे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले बॅनर सर्वत्र लावलेले पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जागा वाटप संदर्भात वरिष्ठ पातळीवर देखील बैठका सुरू आहेत तर एका बाजूला कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघात सभा सुरू आहेत या सभेमध्ये कोणतेही भाजपचा नेता दिसत नसून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सभा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा : ईपीएफओत मोठ्या सुधारणा! निष्क्रीय खात्यांतील पैसे मोकळे होणार
जागा वाटपाचा फॉर्मुला ठरत नसल्याने भाजपाने देखील एकला चलोची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सोमवारपासून मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू होणार आहे तसेच मोठमोठ्या रॅली देखील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहेत. परंतु एकीकडे ठाकरे बंधूंची युती होऊन जागावाटप सुरू झाले आहे तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष ठाणे जिल्ह्यातील काही महानगरपालिकेत एकत्र निवडणुका लढणार असल्याचे कळत आहे तर काही ठिकाणी काँग्रेसने देखील एकला चलोची भूमिका घेतली आहे. पण सत्ताधारी भाजप , शिवसेना पक्षाची महायुती असल्याने महानगरपालिका निवडणुकीत महायुती मधूनच निवडणूक लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयोजित केलेल्या डोंबिवली येथील सभांमध्ये ते मतदारांना आवाहन करत होते की महायुती मधूनच आपला उमेदवार निवडून येणार आहे.
परंतु जागा वाटपाचा अद्यापही फॉर्मुला ठरला नसल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये महायुतीमध्ये निवडणूक लढणार की, स्वतंत्र निवडणूक लढणार हा एक मोठा ट्रेड निर्माण झालेला आहे. याच्यावर लवकरच पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याची शक्यता आहे, अन्यथा मतदानाला काही दिवस राहिल्या असल्यामुळे उमेदवाराला प्रचार करायला खूप कमी दिवस मिळतील, यामुळे भाजप आणि शिवसेनेला जागा वाटप संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे. शनिवार पर्यंत शिवसेना शिंदे गटाला जागा वाटपा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचा अल्टिमेटम भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिला होता. यामध्ये शनिवारी ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाणे असे बॅनर भाजपच्या वतीने झळकत असल्याने भाजप शिवसेना पक्षांमध्ये युती होणार की नाही, याबाबत हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.