‘मयूर’ : धैर्याची वाटचाल

27 Dec 2025 10:34:47
Mayur Jadhav
 
आव्हानांत संधी शोधत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावरील प्रवासच यशाचा मार्ग सुकर करतो. मयूर आनंदा जाधव यांची वाटचाल म्हणजे अशाच सकारात्मकतेतून घडलेल्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी...
 
आजच्या जलदगती, स्पर्धात्मक आणि अनिश्चित आर्थिकयुगात टिकून राहणे सोपे नाही. संधी आहेत; पण संघर्षही मोठा आहे. अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी स्वप्न, सातत्य, संयम आणि खचून न जाण्याची मानसिकता आवश्यक असते. मयूर आनंदा जाधव यांची कथा याच मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे.
 
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मयूर जाधव यांची जडणघडण कष्ट, शिस्त आणि जबाबदारीच्या मूल्यांवर झाली. लहानपणापासूनच जीवनात वास्तववादी दृष्टिकोन ठेवण्याची सवय होती. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्शस्थानी ठेवून नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर जबाबदारी असते, ही शिकवण त्यांनी मनात घट्ट बसवली. मयूर लहान असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. मात्र, वडिलांचे आदर्श, शिकवण आणि प्रामाणिकपणाचा वारसा मयूर यांनी आपल्या जीवनात रुजवला. संकटांमध्ये मार्ग काढण्याची सवय, कष्टातून उभे राहण्याची ताकद आणि प्रामाणिकपणाशी तडजोड न करण्याचे बळ त्यांनी आपल्या वडिलांकडून मिळवले.
 
शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली. मात्र, शिक्षण पूर्ण करतानाच त्यांना स्पष्ट झाले की, सुरक्षित नोकरीच्या मार्गाऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे अधिक योग्य ठरेल. लोकांना उपयोगी पडणारी सेवा निर्माण करणे, समाजातील विश्वास मिळवणे आणि आत्मनिर्भर बनणे हे त्यांचे ध्येय होते. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी ‘मयूर टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ची स्थापना करून प्रवाससेवा व्यवसायाची सुरुवात केली. कोणतेही मोठे भांडवल नसताना घरातूनच त्यांनी आपले कामकाज सुरू केले. सुरुवातीला आर्थिक मर्यादा, विश्वासाचा अभाव आणि स्पर्धा यांचा सामना करावा लागला. पण, त्यांनी कधी हार मानली नाही. प्रत्येक दिवस हा नवीन आव्हान घेऊन येत असे, तरी ते आत्मविश्वासाने आणि चिकाटीने त्या अडचणींवर मात करत राहिले.
 
प्रवाससेवा ही केवळ वाहन चालवणे नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची, वेळेच्या काटेकोरपणाची आणि सेवाभावाची जबाबदारी स्वीकारणे असते. मयूर जाधव यांनी सुरुवातीपासून हे मूल्य आत्मसात केले. प्रत्येक प्रवास हा आरामदायी, सुरक्षित आणि समाधानकारक व्हावा, यासाठी त्यांनी स्वतः लक्ष दिले. प्रवाशांच्या मागण्या, अपेक्षा आणि अभिप्राय यांचे त्यांनी नेहमीच गांभीर्याने विश्लेषण केले. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास हळूहळू वाढत गेला.
 
मायदेशी आणि परदेशी प्रवास अनुभवातून त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या. मुंबई ते पणजी, मुंबई ते उज्जैन व इंदोर, मुंबई ते अयोध्या, मुंबई ते वडोदरा, तसेच मुंबई ते बंगळुरू अशा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी त्यांची सेवा लोकांच्या विश्वासाची निशाणी बनली. धार्मिक यात्रा, कौटुंबिक प्रवास, व्यावसायिक कारणे किंवा पर्यटन, प्रत्येक प्रवासासाठी सुरक्षितता, वेळेचे पालन आणि स्वच्छता यांचा विशेष उल्लेख होतो. प्रवाशांशी सौजन्यपूर्ण संवाद, त्यांची सोय आणि सुविधा यावर त्यांनी प्रामाणिकपणे भर दिला.
आजही मयूर आनंदा जाधव खचून न जाता संघर्ष करत आहेत. बदलती परिस्थिती, वाढती स्पर्धा, आर्थिक चढउतार, वाहनांची देखभाल आणि ग्राहकांच्या अपेक्षा यांचा सतत सामना करावा लागतो. आलेल्या प्रत्येक अडचणीला ते संधी मानतात, स्वतःमध्ये सुधारणा करतात आणि सेवेत गुणवत्ता राखतात. उदाहरणार्थ, प्रवाशांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे ही त्यांची खासियत आहे. अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत काम करत, प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी योजना आखणे, ही त्यांची सातत्याची परंपरा आहे.
 
मयूर जाधव यांचा दृष्टिकोन फक्त व्यवसायावर मर्यादित नाही. ‘मयूर टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून त्यांनी मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सर्वात विश्वासू, सोयीस्कर आणि लोकाभिमुख प्रवाससेवा पुरवणारी संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसेच रोजगारनिर्मिती, तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे, तसेच प्रवास क्षेत्रात दर्जेदार मूल्यांची परंपरा निर्माण करणे, हा त्यांचा सामाजिक दृष्टिकोन आहे. त्यांच्या कार्यातील वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक प्रवासाला आपुलकीचा स्पर्श देणे, प्रवाशांच्या अनुभवाला महत्त्व देणे, समस्यांचे त्वरित निराकरण करणे आणि प्रत्येक प्रवासाला स्मरणीय बनवणे, ही त्यांची ओळख. या दृष्टिकोनामुळे त्यांची संस्था केवळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी नाही, तर सामाजिकदृष्ट्या विश्वासार्हदेखील ठरली आहे.
त्यांची कथा संघर्ष, सातत्य आणि प्रामाणिकपणाची आहे. त्यांनी अजूनही स्वतःला पूर्ण झालेले मानलेले नाही. शिकणे, झगडणे आणि पुढे जाणे, हीच त्यांची ओळख आहे. आज ते जिथे आहेत, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी संयम, कष्ट आणि आत्मविश्वास यांना कधीही सोडले नाही.
 
मयूर आनंदा जाधव यांचा प्रवास ही केवळ व्यवसायाची कथा नाही, तर प्रेरणादायी संघर्षाची, सामाजिक विश्वासाची आणि सेवाभावनेची ओळख आहे. त्यांच्या यशामागे असलेले कष्ट, चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिकपणा हे गुण अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतात. अशा या मयूर जाधव यांच्या जीवनकथेतून स्पष्ट होते की, स्वप्नांना दिशा देणे, कठीण प्रसंगांमध्ये धैर्य राखणे, सातत्याने सुधारणा करणे आणि सेवाभावनेत प्रामाणिक राहणे, हेच खरे यशाचे मानक आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
 
- सागर देवरे
 
 
Powered By Sangraha 9.0