‘ग्राफिन’चे सिमेंट झाले, विष हे अमृत झाले!

27 Dec 2025 10:17:54
Graphene
 
माझे एक ज्येष्ठ स्नेही आहेत. विविध प्रकारच्या गंधांचा म्हणजे वासांचा अभ्यास करणे, हा त्यांचा छंद. त्यांचे असे म्हणणे आहे की, सुगंध किंवा दुर्गंध या संकल्पना सापेक्ष आहेत. एखाद्याला जो सुगंध वाटेल, तो दुसर्‍याला दुर्गंध वाटू शकतो किंवा जेव्हा एखादा दुर्गंध अति-तीव्र बनतो, तेव्हा त्याचे रूपांतर सुगंधात होऊ शकते. व्हेल माशाची उलटी किंवा ओकारीपासून ‘अँबरग्रीस’ नावाचा पदार्थ बनतो. त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. कारण, अँबरग्रीसपासून अनेक परफ्यूम्स बनवले जातात. मग, विष व अमृत यासुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का? जाणून घेऊया...
 
युगचक्राच्या प्रारंभाला केव्हातरी देव-दानवांनी समुद्रमंथन केले. त्यांनी मेरू पर्वताची रवी बनवली. शेषनागाची दोरी केली. या मंथनातून अमृतही निघाले आणि ‘हलाहल’ नावाचे भयानक विषही निघाले. अमृतासाठी देव-दानवांचे भांडण लागले. पण, हलाहलाचे काय करायचे? त्याच्या नुसत्या दाहाने सृष्टी करपून जाऊ लागली. तेव्हा भगवान शंकर पुढे आले, त्यांनी ते भयंकर हलाहल विष पिऊन टाकले. शिवाला ‘कर्पूरगौर’ म्हणजे कापरासारखा शुभ्र गोर्‍या रंगाचा मानतात. त्या विषाच्या दाहाने शिवाचा कर्पूरगौर कंठ निळा झाला. शिव ‘नीलकंठ’ झाला. पण, साक्षात शिवालासुद्धा तो दाह असह्य झाला. मग, नारदांच्या सल्ल्याने त्याने ‘राम’ हा मंत्र जपला, तेव्हा तो दाह शांत झाला.
 
आता दशरथी प्रभू रामचंद्र तर तेव्हा जन्मालाही आलेले नव्हते. मग, हा राम कुठला? तर तो ‘राँ’ या एक अक्षरी बीजाचा मंत्र होता. आपल्याकडच्या मंत्रशास्त्रात आणि योगशास्त्रात असे अनेक बीजमंत्र आहेत. उदा. ‘गँ’ हा गणपतीबाप्पाचा बीजमंत्र आपल्या खूपच परिचयाचा आहे. अशा मंत्रांमध्ये विषाचे अमृत करण्याचे सामर्थ्य आहे. अशा असंख्य विद्या आणि शास्त्रे आमच्या ॠषिमुनींनी सिद्ध करून ठेवलेली आहेत. आजही ती जाणणारी माणसे संख्येने थोडी असली, तरी आहेत.
 
तुम्ही ‘योगीकथामृत’ हे अद्भुत आत्मचरित्र वाचले आहे का? मुकुंदलाल घोष म्हणजेच संन्यास घेतल्यावरचे परमहंस योगानंद यांनी लिहिलेली ही आत्मकथा म्हणजे एक रोमांचक, चित्रचक्षुचमत्कारिक असा वाचनानुभव आहे. स्वामी योगानंद हे बरद्वान इथल्या स्वामी विशुद्धानंद उर्फ गंधबाबा यांना भेटले होते. गंधबाबा समोरचा माणूस म्हणेल तो सुगंध किंवा म्हणेल ती वस्तू नुसत्या इच्छेने निर्माण करीत असत. योगानंदांना (त्यावेळचे मुकुंदलाल) त्यांनी गुलाब आणि चमेलीचे सुगंध निर्माण करून दाखवले; तर त्यांचे मित्र अलकनंद यांच्या इच्छेखातर समोर ठेवलेल्या चपात्यांची मोसंबी करून दाखवली. अलकनंदांनी भीतभीतच ती मोसंबी खाल्ली; पण ती स्वादिष्ट लागली.
 
स्वामी योगानंद या चमत्कारांचे शास्त्रीय विश्लेषण करताना म्हणतात की, कोणतीही वस्तू ही असंख्य सूक्ष्म अणूंची बनलेली असते. या अणूचे पुन्हा प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इत्यादी सूक्ष्म भाग आहेत. या सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंच्या रचनेतील फरकामुळे आपल्याला प्रत्येक वस्तू वेगळी दिसते, कळते, जाणवते. परंतु, प्रयोगशाळेत दिसणार्‍या या सूक्ष्मातिसूक्ष्म भागांपेक्षाही सूक्ष्म असा भाग म्हणजे त्या वस्तूच्या अणूतील प्राणशक्ती. योगानंद या प्राणशक्तीला ‘लाईफट्रॉन’ असा शब्द वापरतात. हे ‘लाईफट्रॉन’ पाच प्रकारचे असतात. गंधबाबा किंवा त्यांच्यासारखे सिद्धपुरुष आपल्या योगसामर्थ्याने कोणत्याही वस्तूच्या या ‘लाईफट्रॉन’च्या स्पंदनांमध्ये बदल घडवून तिचे बाह्यरूपही बदलू शकतात.
 
नवनाथांच्या कथांमध्ये एक गोष्ट आहे. एकदा सह्याद्री पर्वताच्या परिसरात तीर्थयात्रा करीत असताना गुरू मच्छिंद्रनाथांना वाटले की, इथे अमुक एक मोठा यज्ञ केला पाहिजे. त्यांनी पट्टशिष्य गोरक्षनाथांना तशी आज्ञा केली. गोरक्षांनी कमंडलुतले पाणी हातात घेतले नि ‘जय अलख निरंजन’ म्हणून समोरच्या डोंगरावर शिंपडले. संपूर्ण डोंगर सोन्याचा झाला. त्या सोन्याचा वापर करून मच्छिंद्रांचा यज्ञ पूर्ण झाला. लाखो लोकांना अन्नदान करण्यात आले. सगळे तृप्त झाल्यावर गोरक्षांनी पुन्हा डोंगरावर अभिमंत्रित पाणी शिंपडले. डोंगर पूर्ववत दगडामातीचा झाला. गुरू-शिष्य पुढच्या प्रवासाला निघून गेले. (मी ट्रेकिंगला वगैरे गेलो की, हा डोंगर सापडतो का ते पहात असतो. तुम्हीही शोधा) असो. तर भारतीय सिद्धयोग्यांच्या या योगसिद्धी सामर्थ्याचा सामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन समस्यांसाठी तसा उपयोग काहीच नाही.
 
एका नामवंत मराठी लेखकाने एक स्वानुभव लिहिला आहे. बर्‍याच वर्षांनंतर लेखक स्वतःच्या गावी गेला. गावाच्या सुरुवातीलाच त्याच्या एका बालमित्राचे घर होते. मूळ घर साधे मातीचे होते. पण, आता लेखक पाहतो तर मित्राने मातीच्या घराच्या ठिकाणी सिमेंटचे स्लॅबचे आधुनिक घर बांधले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. लेखक घरात शिरला. जुन्या मित्रांची कडकडून गळाभेट झाली. गप्पा, चहापाणी झाले. नव्या घराबद्दल बोलताना मित्र म्हणाला, "सगळ्या शहरी सुखसोयी करून घेतल्या खर्‍या; पण एक मिनिट पंख्याशिवाय राहावत नाही. मातीच्या घरात बाहेर कितीही उन्हाळा असला, तरी आत गारवा वाटायचा. शिमिटाच्या घरात दिवसा काय, रात्रीसुद्धा भयंकर उकडते.”
 
आपल्याकडेच नव्हे, तर सर्व जगभर घरबांधणी ही विटा, लाकूड, चुना, रेती, वाळू, माती यांच्यापासूनच होत असे. प्राचीन काळी एकदा ग्रीक लोकांनी ज्वालामुखीमधली राख वापरून पाहिली. त्या राख, खडी, माती यांच्या एकत्रीकरणाला त्यांनी शब्द वापरला ‘सिमेंटम्’. त्यावरूनच आधुनिक बांधकाम साहित्याचे ‘सिमेंट’ हे नाव प्रचलित झाले. हा नवा पदार्थ तसा एकोणिसाव्या शतकातच प्रथम ब्रिटनमध्ये आणि नंतर अमेरिकेत उत्पादित होऊ लागला. भारतातसुद्धा १९१४ साली पोरबंदर या ठिकाणी पहिला सिमेंट कारखाना निघाला. पण, भारतीय काय किंवा कुठल्याच गवंडी लोकांना घर बांधायला हा पदार्थ अजिबात पसंत पडला नाही. पूल, धरणे, कारखाने वगैरे मोठमोठ्या बांधकामात मात्र सिमेंटचा उपयोग वाढू लागला.
 
मग, १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि सिमेंटची खरी उपयुक्तता लोकांना कळली. एकदा हा पदार्थ भिजला की, तो इतका कठीण बनतो की, त्याच्यावर बॉम्ब पडला, तरी तो तुटत-फुटत नाही. हे लक्षात येताच, युद्धसाहित्यामध्ये सिमेंटचा तडाखेबंद वापर सुरू झाला. युद्धात युरोपातले सगळेच देश आणि त्यांची महत्त्वाची शहरे जवळपास पूर्ण उद्ध्वस्त झाली. युद्धानंतर त्यांची पुनर्बांधणी करायला सिमेंट हा तुलनेने स्वस्त आणि कारखान्यांमधून यंत्रांद्वारे ‘मास प्रॉडक्शन’ होऊ शकणारा पदार्थ हाताशी आला. मग काय? जगभर सर्वत्र गृहबांधणीची जुनी पद्धत मागे पडून दणादण सिमेंटची घरे बांधली जाऊ लागली.
आता ८५ वर्षांनंतर त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत.
 
सिमेंट उत्पादन होत असताना आणि वापरल्यावरही त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत असते. त्यामुळे वातावरणातली उष्णता वाढते. ही कार्बनप्रेरित उष्णता आता इतकी टोकाला जाऊन पोचली आहे की, उत्तर ध्रुवावरचे हिमनग वितळू लागले आहेत. संपूर्ण मानवजात पर्यावरण विनाशाच्या अंतिम टप्प्यावर उभी आहे. मग, यावर उपाय काय? माणसाने पुन्हा मातीची घरे बांधून त्यांत राहावे का? कार्बन उत्सर्जन करणार्‍या मोटारी टाकून बैलगाड्या नि घोडागाड्या वापराव्यात का? नाही. कालचक्र उलटे फिरवता येणार नाही.
 
आधुनिक विज्ञान याच्या उत्तरादाखल ‘ग्राफिन’ या एका नव्याच पदार्थाकडे बोट दाखवत आहे. मुळात ‘ग्राफिन’ हा पदार्थ ‘ग्राफाईट’ या मूलद्रव्यापासून बनवण्यात आला. पण, आता ‘फ्लश ग्राफिन प्रोसेस’ या प्रक्रियेद्वारे हा पदार्थ कोणत्याही टाकाऊ वस्तूंपासून बनवण्याचा शोध लागला आहे. म्हणजे बघा, री-सायकल न होऊ शकणारे प्लास्टिक पदार्थांच्या कचर्‍याचे डोंगर, इलेक्ट्रॉनिक कचर्‍याचे डोंगर, वापरून टाकून दिलेले वाहनांचे रबरी टायर या सगळ्यांचा उपयोग करून ‘ग्राफिन’ बनवता येईल. याबाबतीत वैज्ञानिकांनी अधोरेखित केलेली एक गोष्ट आपल्याला भुवया उंचावायला लावणारी आहे. त्यांच्या पाहणीनुसार, जगभरातले सर्व शहरी लोक खाण्यासाठी बनवलेल्या अन्नपदार्थांपैकी किमान ३० ते ४० टक्के अन्नपदार्थ शिळे झाले किंवा खराब झाले, म्हणून चक्क फेकून देतात. हा काही प्रमाणात माजोरीपणा आहे नि काही प्रमाणात नाईलाज आहे. गावात शिळे किंवा उष्टे -खरकटे अन्न गुरेढोरे, कु त्री-मांजरी तरी खातात. शहरात अनेकदा ते नाईलाजाने टाकूनच द्यावे लागते. अशा अन्नापासूनसुद्धा ‘ग्राफिन’ बनू शकेल. आणि हा ‘ग्राफिन’ पदार्थ सिमेंट किंवा अन्य कोणत्याही कार्बन उत्सर्गी पदार्थातून कार्बनचा उत्सर्ग होण्याचे प्रमाणच कमी करून टाकेल.
 
मात्र, हे करताना तो त्या पदार्थाचे बाह्यरूप बदलणार नाही. चपात्यांची मोसंबी झाली किंवा दगडाचे प्रथम सोने आणि परत दगड बनले, तसे न होता सिमेंट हे सिमेंटच राहील. मात्र, त्यातून होणारा कार्बन उत्सर्ग कमी होईल. कदाचित, अजिबात होणार नाही.
विषाचे अमृत होते, अमृताचे विष होते. माणूस घाम शिंपडून मातीतून मोती पिकवतो. कधीकधी माणसाची पुढची पिढी माजोरीपणाने पुन्हा त्या मोत्यांची माती करते. आता ‘ग्राफिन’ कशातूनही काहीही निर्माण करेल आणि पर्यावरणही बिघडू देणार नाही. विज्ञान आणि अध्यात्म आणखी जवळ येत चाललेत.
 
 
Powered By Sangraha 9.0