मुंबई : ( Mumbai Suburban Rail Expansion ) मुंबई आणि उपनगरांतील रेल्वे प्रवासात आमूलाग्र बदल घडवून आणणारे तब्बल ₹१८,३६४.९४ कोटींचे विविध रेल्वे प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. या प्रकल्पांमुळे उपनगरी लोकल सेवेची क्षमता, वेळेची शिस्त आणि प्रवाशांचा अनुभव लक्षणीयरीत्या सुधारण्याचा उद्देश आहे.
मुंबईची उपनगरी रेल्वे व्यवस्था ही सीएसएमटी ते कर्जत–खोपोली व कसारा (मुख्य मार्ग), सीएसएमटी ते पनवेल/बांद्रा (हार्बर मार्ग), ठाणे ते पनवेल (ट्रान्स हार्बर) तसेच नेरुळ/बेलापूर ते उरण (पोर्ट लाईन) अशी विस्तृत आहे. अलीकडेच नेरुळ–बेलापूर–उरण मार्गावर १० अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, तर्घर आणि गावण ही दोन नवी स्थानकेही प्रवाशांच्या सेवेत आली आहेत. मात्र प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पायाभूत सुविधा वाढवणे अपरिहार्य झाले आहे.
मुंबई व उपनगरांत एकूण ४००.५३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गांवर हे प्रकल्प राबवले जात असून, त्यात नव्या मार्गांचे बांधकाम, विद्यमान मार्गांचा विस्तार आणि सेवा-सुधारणांचा समावेश आहे. यामध्ये मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्हींचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत.
हेही वाचा : एसटी महामंडळाकडून महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; प्रमुख बसस्थानकावर महिला रक्षकांची नेमणूक
मध्य रेल्वे अंतर्गत सीएसएमटी–कुर्ला ५वी व ६वी लाईन, पनवेल–कर्जत उपनगरी कॉरिडॉर, कल्याण–आसनगाव चौथी लाईन, कल्याण–बदलापूर तिसरी व चौथी लाईन, कल्याण–कसारा तिसरी लाईन, ऐरोली–कळवा उन्नत मार्ग, निळजे–कोपर डबल कॉर्ड लाईन, बदलापूर–कर्जत तिसरी व चौथी लाईन तसेच आसनगाव–कसारा चौथी लाईन यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे गर्दी कमी होणे, उशीर टळणे आणि प्रवाशांसाठी अधिक लोकल फेऱ्या उपलब्ध होणे अपेक्षित आहे. काही प्रकल्पांमुळे मालवाहतूक वाढून इंधन बचत आणि कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल–बोरिवली सहावी लाईन, गोरेगाव–बोरिवली हार्बर मार्ग विस्तार, बोरिवली–विरार पाचवी व सहावी लाईन, विरार–डहाणू तिसरी व चौथी लाईन आणि नायगाव–जुईचंद्र डबल कॉर्ड लाईन हे प्रकल्प सुरू आहेत. या कामांमुळे पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी, जादा लोकल सेवा आणि अधिक सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार आहे. मुंबईसारख्या महानगरासाठी हे प्रकल्प केवळ वाहतूक सुधारणा नसून, भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी अत्यावश्यक पाऊल ठरणार आहेत.