Janhvi Kapoor : बांगलादेशातील हिंदू तरुण दीपू चंद्र दासच्या मॉब लिंचिंगवर जान्हवी कपूरचा संताप, म्हणाली हा नरसंहार आहे

26 Dec 2025 18:12:33
Hindu youth mob lynching
 
मुंबई : (Janhvi Kapoor) बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीने दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंगचा उल्लेख करत या घटनेला नरसंहार असे संबोधले आहे. अभिनेत्रीने लोकांना या विषयावर माहिती गोळा करण्याचे, प्रश्न उपस्थित करण्याचे आणि सांप्रदायिक भेदभावाविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
 
अभिनेत्री जान्हवी कपूर काय म्हणाली?
 
“बांगलादेशात जे घडत आहे ते अत्यंत अमानवी आहे. ही सरळसरळ कत्तल असून ही एकमेव घटना नाही. हा नरसंहार आहे. जर तुम्हाला या अमानुष मॉब लिंचिंगबद्दल माहिती नसेल, तर आधी त्याबद्दल वाचा, व्हिडिओ पाहा आणि प्रश्न विचारा. हे सगळं पाहूनही जर तुमच्या मनात राग निर्माण होत नसेल, तर हीच ती ढोंगी वृत्ती आहे जी आपल्याला काही कळण्याआधीच नष्ट करेल. आपण जगाच्या दुसऱ्या टोकावर घडणाऱ्या घटनांवर हळहळ व्यक्त करत राहतो, पण आपल्या आजूबाजूला आपल्याच भाऊ-बहिणींना जिवंत जाळले जात असताना आपण गप्प राहतो.”
 
पुढे जान्हवी म्हणाली, “जातीय भेदभाव आणि टोकाचा कट्टरपणा आपण बळी असो वा गुन्हेगार या प्रत्येक स्वरूपाचा निषेध झाला पाहिजे. अन्यथा आपण आपली माणुसकीच विसरू. आपण एखाद्या अदृश्य रेषेच्या दोन बाजूंवर आहोत असा भ्रम बाळगणारी प्यादे आहोत. हे ओळखा. स्वतःला ज्ञानाने सजग करा, जेणेकरून या सामुदायिक संघर्षात सतत गमावल्या जाणाऱ्या आणि दहशतीखाली जगणाऱ्या निरपराध जीवांसाठी तुम्ही ठामपणे उभे राहू शकाल.”
 
 
नेमकं प्रकरण काय होतं?
 
बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास हा कापड कारखान्यात काम करणारा हिंदू मजूर होता. ढाका येथे हिंसाचार उफाळल्यानंतर परिसरात ईशनिंदेच्या अफवा पसरल्या. त्यानंतर एका जमावाने हिंदूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. दीपू कारखान्यात काम करत असल्याचे समजताच जमावाने त्याला घेरले. त्याला अमानुष मारहाण करण्यात आली, फरपटत नेण्यात आले आणि हत्या करून त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून पेटवण्यात आला. स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, त्याचा मृतदेह झाडाला बांधून जाळण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे.

Powered By Sangraha 9.0