भारतीय लष्कराकडून सोशल मीडिया वापराच्या नियमांमध्ये मोठा बदल! केवळ ‘पॅसिव्ह पार्टिसिपेशन’ राहणार अनिवार्य

26 Dec 2025 12:20:16
 
Indian Army Social Media Policy
 
मुंबई : (Indian Army Social Media Policy) भारतीय लष्कराने आपल्या सैनिकांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लष्करी कर्मचाऱ्यांना आता ‘इन्स्टाग्राम’ वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही मुभा अत्यंत कडक अटींसह असून केवळ ‘व्ह्यू-ओन्ली’ म्हणजेच फक्त मजकूर पाहण्यापुरती मर्यादित असेल. लष्कराच्या मुख्यालयाने मिलिटरी इंटेलिजन्स विभागातर्फे हे आदेश जारी केले असून त्यांची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने सुरू झाली आहे. (Indian Army Social Media Policy)

युट्युब, एक्स (ट्विटर), कोरा, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर कोणतेही संदेश किंवा प्रतिक्रिया टाकू नयेत, असे स्पष्ट आदेश भारतीय लष्कराने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.या समाजमाध्यमांवरील घडामोडींची फक्त माहिती घ्यावी, कोणतीही पोस्ट किंवा टिप्पणी करू नये, असे लष्कराने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्काइप, व्हॉटसअप, टेलिग्राम, सिग्नल या ॲप्सद्वारे फक्त गुप्त नसलेल्या माहितीचीच देवाणघेवाण करावी, असेही लष्कराने स्पष्ट केले आहे. लिंक्डइन या व्यासपीठावर केवळ व्यावसायिक माहिती आणि नोकरीसंदर्भातील तपशील देण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Indian Army Social Media Policy)

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, सायबर सुरक्षितता आणि माहिती गळती रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
केवळ ‘पॅसिव्ह पार्टिसिपेशन’ राहणार अनिवार्य

लष्कराने स्पष्ट केले आहे की, सैनिक आणि अधिकारी माहिती मिळवण्यासाठी किंवा जागरूक राहण्यासाठी इन्स्टाग्रामवरील आशय पाहू शकतात. मात्र, याला लष्कराने ‘पॅसिव्ह पार्टिसिपेशन’ असे नाव दिले आहे.याचा अर्थ असा की, जवानांना व्यासपीठावर केवळ प्रेक्षक म्हणून राहता येईल. कोणत्याही प्रकारचे सक्रिय सहकार्य किंवा संवाद लष्कराने पूर्णपणे निषिद्ध मानले आहेत. (Indian Army Social Media Policy)

‘या’ गोष्टींवर असणार बंदी:

१. पोस्टिंग आणि शेअरिंग: लष्करी कर्मचारी स्वतःचे फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करू शकणार नाहीत.

२. प्रतिक्रिया देणे: कोणत्याही पोस्टवर कमेंट करणे, लाईक करणे किंवा त्यावर आपली मते व्यक्त करण्यास सक्त मनाई आहे.
३. मेसेजिंग: कोणालाही मेसेज पाठवणे किंवा चॅटिंग करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाईल.

४. गोपनीयता: लष्करी कर्मचारी आपली ओळख किंवा युनिटशी संबंधित कोणतीही माहिती तिथे उघड करणार नाहीत, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीवर सोपवण्यात आली आहे.



Powered By Sangraha 9.0