मुंबई : (Donald Trump) अमेरिकेने नायजेरियाच्या वायव्य भागामध्ये कट्टरतावादी संघटना 'इस्लामिक स्टेट'च्या (आयएस) तळावर हवाई हल्ला केला असून, यात अनेक अतिरेकी ठार झाल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. या हल्ल्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिले होते. नायजेरियाच्या विनंतीवरून हे हल्ले करण्यात आले असून, दहशतवादविरोधी कारवाईत दिलेल्या सहकार्यासाठी अमेरिकेने नायजेरियाचे आभार मानले आहेत. अमेरिकेने या हवाई हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गुरुवारी रात्री ट्रुथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, "माझ्या निर्देशानुसार, वायव्य नायजेरियात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरुद्ध एक 'शक्तिशाली आणि घातक हल्ला' केला, जे मुख्यतः निष्पाप ख्रिश्चनांना लक्ष्य करून त्यांच्या निर्घृण हत्या करत होते. मी या दहशतवाद्यांना आधीच इशारा दिला होता की जर त्यांनी ख्रिश्चनांची कत्तल थांबवली नाही तर त्यांना परिणाम भोगावे लागतील आणि आज रात्री नेमके तेच घडले." तसेच "माझ्या नेतृत्वाखाली आपल्या देशात कट्टर इस्लामी दहशतवादाला फोफावू दिले जाणार नाही." असा कडक इशाराही ट्रम्प (Donald Trump) यांनी दिला आहे.
कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले गेले आणि हा हल्ला नेमका कधी झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नोव्हेंबरमध्ये ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकी सैन्याला नायजेरियामधील इस्लामी कट्टरतावादी समूहांवर कारवाईसाठी तयारीचे आदेश दिले होते. या कारवाईमुळे परिसरातील सुरक्षा स्थिती बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Donald Trump)