कोणताही उद्योग-व्यवसाय हा केवळ आर्थिक भांडवलावर नाही, तर कार्यक्षम मनुष्यबळावरही तितकाच अवलंबून असतो. परंतु, दुर्दैवाने बहुतांश संस्थांमध्ये ‘ह्युमन रिसोर्स-एचआर मॅनेजर’ असले तरी त्यांची कार्यपद्धती ही कर्मचार्यांचे पगार, हजेरी, प्रशिक्षण इथपर्यंतच मर्यादित दिसते. पण, या सगळ्याबरोबरच खराखुरा मानवीय पैलूदेखील व्यवस्थापनात तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या बजावत असतो. त्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
सद्यस्थितीत व्यावसायिक क्षेत्रात सर्वसाधारणपणे भर दिला जातो, तो तंत्रज्ञान विकास, नवीन कार्यपद्धतींसाठी आधुनिक तंत्राचा वापर करून स्पर्धेत केवळ टिकूनच न राहता, स्पर्धेवर मात करून अधिकाधिक व्यवसाय-विस्तार व वाढता फायदा मिळविण्यावर. या प्रयत्नांतून आपल्या उद्योग व उद्योजकांनी रोबोटपासून युनिकॉर्नपर्यंतची विविध उद्दिष्टे तर साध्य केली. मात्र, या यशाचा टप्पा गाठताना आपण या प्रयत्नांशी निगडित व महत्त्वाच्या अशा मानवीय पैलूंचा कसा आणि कितपत विचार केला, हा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित झाला आहे.
वाढत्या व्यावसायिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर एक प्रभावी उपाय म्हणून अद्ययावत तंत्रज्ञान व विकसित संगणकीय कार्यपद्धती यावर आधारित उद्योग-व्यवसाय प्रक्रियेवर भर देतानाच, अनेक ठिकाणी कंपनी आणि कामकाजावर भर देताना, कर्मचारी या तेवढ्याच महत्त्वाच्या बिंदूवर प्रसंगी दुर्लक्ष होते का? हा महत्त्वपूर्ण प्रश्न यानिमित्ताने उद्योग-व्यवसाय क्षेत्रात निर्माण होतो. त्यातही व्यावसायिकांसंदर्भात मानवीय मुद्दा म्हणून कर्मचार्यांना हाताळताना अथवा त्यांच्याशी संबंधित छोट्या-मोठ्या मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेताना भावनात्मक पैलू बाजूला सारला जाण्याची उदाहरणे बहुसंख्य ठिकाणी घडत असतात. परिणामी, उद्योग-व्यवसाय व त्यातील प्रगतीसाठी कर्मचार्यांशी भावनिक पद्धतीने व परिस्थितीनुरूप वागण्याची पद्धत व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांकडून दुर्लक्षिली जात आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात व व्यवस्थापन कार्यपद्धतीच्या संदर्भात व्यवस्थापकीय संकल्पनेला अधिक प्रभावी व उपयुक्त सिद्ध करण्यासाठी व्यवस्थापकीय शिस्तीला कर्मचार्यांचे सामंजस्य व उभयतांमध्ये समान भावना असणे, प्रत्येक उद्योग-व्यवसायाच्या यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक असते. उद्योग-व्यवसाय चक्रातील तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया, संबंधित कार्यपद्धती, आर्थिक पाठबळ, व्यावसायिक वाढ, उत्पादन व सेवा यांचा दर्जा व व्यवसायाची गुणवत्ता या सर्व व प्रमुख कार्य-टप्प्यांमध्ये कर्मचारी हा एक समान मुद्दा असतोच असतो.
कंपनीच्या दृष्टीने कर्मचार्यांच्या संदर्भातील व व्यावहारिकच नव्हे, प्रत्यक्षात विविध बाबी स्वाभाविकपणे अनुभवायला येतात. यामध्ये प्रामुख्याने कंपनीमध्ये कर्मचार्यांची निवड, कामावर रुजू होणे, प्रत्यक्ष कामकाज, कामाचे वार्षिक नियोजन व अवलोकन, संबंधित कर्मचार्याच्या कामाचा दर्जा व त्याचे होणारे व्यावहारिक-व्यावसायिक परिणाम, कर्मचार्याच्या व्यक्तिगत क्षमतेचे कार्यक्षमतेत होणारे रूपांतर, व्यक्तीच्या कामाच्या परिणामांनुरूप त्यांची होणारी पदोन्नती व पगारवाढ, कंपनीतर्फे दिले जाणारे शिक्षण-प्रशिक्षण व कर्मचार्यांच्या विकासात्मक स्वरूपात केले जाणारे प्रयत्न इ. चा समावेश असतो. ही प्रक्रिया कर्मचारी संबंधित आस्थापनेत कामावर असताना व त्यांच्या सेवाकाळात निरंतर चालू असते. म्हणूनच, विशेषतः एचआर-व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून याला ‘कर्मचार्याचे सेवाचक्र’ - ‘एम्प्लॉयी लाईफ सायकल’ असे म्हटले जाते. यातील विविध टप्प्यांवर कंपनी आणि कर्मचार्यांनी काय प्रयत्न केले व त्यांचा काय परिणाम झाला, याचा वेळोवेळी व नियोजनबद्ध पद्धतीने विचार करणे, परस्पर फायदेशीर ठरू शकते.
याचाच एक भाग म्हणून कर्मचार्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे नियोजन व व्यवस्थापन हे मुद्देसुद्धा महत्त्वाचे ठरतात. मुळातच कर्मचारी व त्यांच्याशी संबंधित विविध मुद्दे हे जिव्हाळ्याचे व प्रसंगी ज्वलंत ठरू शकतात. या बाबीची उद्योग क्षेत्रात बरेचदा अनुभव येतो. यातूनच कंपनी-कर्मचार्यांचे परस्पर दुराग्रह, शिस्तपालन, अपेक्षांची पूर्तता, नाराजी वा असंतोष व काहीवेळा कर्मचारी संघटनांची सक्रियता दिसून येते. या आणि अशाप्रकारच्या स्थिती-परिस्थितीचा अंदाज, मागोवा घेणे, त्यावर संवाद साधून उपाययोजना करणे, मुख्य व जिव्हाळ्याच्या मुद्द्यांचे निराकरण करणे, परस्पर संबंधांना सकारात्मकतेची जोड देणे इ. प्रकारची उपाययोजना कर्मचार्यांसाठी उपयुक्त व कंपनीसाठी फायदेशीर ठरते.
कंपनी-व्यवस्थापनात शिस्तपालन हा मुद्दा सर्वच स्तरांवर व विविध प्रकारे महत्त्वाचा ठरतो. या प्रयत्नांचा आधार केवळ अधिकार-भय वा पदभार न राखता, संवादावर आधारित शिस्त ठेवणे व्यवस्थापन कार्यपद्धतीत महत्त्वाचे ठरते. भीतीपोटी आलेली वा असणारी शिस्त व्यक्तीच्या भीतीप्रमाणेच अल्पकालीन ठरते. त्याचे प्रसंगी विपरीत परिणाम होतात. वरिष्ठ-कनिष्ठांमधील दैनंदिन कामाशी निगडित व आवश्यक असणारे संबंध बिघडू शकतात. याचा उलट परिणाम व्यक्ती व संस्था या उभयतांवर होत जातो. त्यावर कंपनी-कर्मचारी उभयतांनी परस्पर जबाबदारी ओळखून ती निरंतर पार पाडणे, यांसारख्या मुद्द्यावर व्यावहारिक उपचार करणे आवश्यक असते.
यादरम्यान, कंपनी-कर्मचारी व व्यवस्थापन-व्यवस्थापक यांच्यातील नेतृत्वगुणांचा बरेचदा कस लागतो, तर कधी परीक्षा पण होते. विशेषतः ज्या उद्योग-आस्थापनांमध्ये कामगार संघटना सक्रियपणे कार्यरत असते, त्याठिकाणी याचा प्रत्यय अधिक प्रकर्षाने येतो. या नेतृत्वाला प्रसंगानुरूप जबाबदारीची साथ देणे व उभयपक्षी आपापली जबाबदारी परस्परपूरक व उद्योगाच्या व्यापक हितासाठी विचारपूर्वक वापरणे महत्त्वाचे ठरते. यासाठी प्रामुख्याने प्रयत्नपूर्वक, प्रामाणिकपणे व दीर्घकालीन प्रयत्न मात्र आवश्यक आहेत. व्यवस्थापनांतर्गत हा मुद्दा म्हणूनच संवेदनशीलच नव्हे, तर महत्त्वपूर्ण ठरतो.
कामाच्या ठिकाणी व कामावर काम करताना व्यक्तिगत स्तरावर कंपनी-कर्मचारी या उद्योग-व्यवसायातील महत्त्वपूर्ण व व्यक्तिगत व्यवहारांवर आधारित स्वरूपाचे काम करताना परस्पर भावनांची दखल घेत, विविध मुद्द्यांवर परस्पर जाणिवांसह काम करणे, सर्व संबंधितांसाठी महत्त्वाचे ठरते.
व्यावसायिकसंदर्भात परस्पर व्यवहारांच्या भावनात्मक साथीची नितांत व वाढती गरज व्यवस्थापन क्षेत्रात नव्यानेच अधोरेखित करण्यात आली असून, त्यादृष्टीने पुढील मुद्दे महत्त्वाचे व कंपनी-कर्मचारी या उभयतांसाठी उपयुक्त असल्याने नमूद केले आहेत.
परस्पर भावनांची जाणीव : व्यावसायिक व व्यवस्थापनपर संदर्भात होणारे विचार-व्यवहारांमधील मानवीय भावनांचा पडताळा घेणे.
व्यक्तिगत भावनांची दखल : परस्पर संपर्क, संवाद, निर्णय व त्यामागील संबंधित घटकांच्या-व्यक्तींच्या भावना व त्यांची पार्श्वभूमीवर जाणून घेणे.
अडचणी समजून घेणे : कंपनी, कंपनीचे कामकाजच नव्हे, तर त्यासंदर्भातील परस्पर अडचणी समजून घेऊन त्यावर यथावत तोडगा काढणे.
कंपनीची काळजी घेण्यासाठी कार्यक्षम कर्मचार्यांना राखून ठेवणे : कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेवर कंपनी-व्यवस्थापनाची कार्यक्षमता अवलंबून असते. त्यामुळे कंपनीसंदर्भात सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे कंपनीमध्ये कर्मचारी तर महत्त्वाचे असतातच. मात्र, कार्यक्षम कर्मचारी अधिक महत्त्वाचे असतात, हे तत्त्व व्यवस्थापन व व्यवस्थापकांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवावे.
नेतृत्व आणि प्रभावी निर्णय क्षमता : व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापकांनी कर्मचार्यांचे वरिष्ठ म्हणून आपली नेतृत्व-निर्णयाची भूमिका पार पाडताना सातत्याने भावनाधीन होऊन निर्णय न घेता, भावनाशील बनून निर्णय घ्यावे. असे निर्णय प्रभावी ठरतात. यासंदर्भात थोडयात व महत्त्वाचे म्हणजे, व्यवस्थापन प्रक्रियेत व्यवस्थापक व कर्मचार्यांनी परस्परांना गरजेनुरूप आवश्यक असणारा ‘पासवर्ड’ समजण्याची मानसिकता कायमची ‘डिलीट’ करणेच उभयतांसाठी आवश्यक आहे.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)