महिमा पौष मासाचा

    25-Dec-2025
Total Views |
Paush Month
 
भारतीय पंचांगानुसार प्रत्येक महिन्याचे एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये कोणते कार्य कोणत्या महिन्यात करावे अथवा करू नये, याचे स्पष्ट संकेतही आहेत. पौष महिना त्यापैकीच एक. शास्त्रानुसार वर्ज्य कार्यांची माहिती असताना, कालौघात या महिन्याला ‘अशुभ’ मानण्याची प्रथा रूढ झाली. त्यामुळे हा महिना कोणत्या कार्यांसाठी वर्ज्य आहे आणि कोणती कार्ये आवर्जून याच महिन्यात करावी, यासह पौष महिन्याच्या महात्म्याचा घेतलेला आढावा...
 
भारतीय कालगणनेनुसार पौष हा दहावा महिना. या महिन्याचे नाव ‘पुष्य’ नक्षत्रावरून पडले आहे; कारण या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रात असतो. पुष्य नक्षत्राला ‘नक्षत्रराज’ म्हटले जाते, जे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. हिंदू संस्कृतीत प्रत्येक महिन्याचे स्वतःचे एक आध्यात्मिक महत्त्व असते आणि पौष महिना हा प्रामुख्याने, सूर्योपासनेचा काळ मानला जातो. या काळात निसर्गात कडाक्याची थंडी असते; दिवस लहान आणि रात्री मोठ्या असतात. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून या महिन्यात सूर्य धनु राशीतून, मकर राशीत प्रवेश करता. ज्याला ‘मकर संक्रांत’ असे म्हटले जाते. हा काळ उत्तरायणाचा प्रारंभ काळ असल्याने, मानवी शरीरातील ऊर्जा आणि निसर्गातील चैतन्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या संस्कृतीत पौष महिन्याला ‘शून्य मास’ म्हटले जात असले, तरी अध्यात्म आणि आरोग्याच्या दृष्टीने हा महिना ‘शून्य’ नसून अत्यंत ‘पूर्ण’ आहे.
 
पौष महिना धार्मिकदृष्ट्या ‘निषिद्ध’ किंवा ‘शून्य मास’ मानला जाण्यामागे, काही शास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे आहेत. प्रामुख्याने या महिन्यात सूर्य ‘धनु’ राशीत असतो, त्यामुळे याला ‘धनुर्मास’ असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य गुरू राशीत (धनु किंवा मीन) असतो, तेव्हा त्याचे तेज काहीसे विरळ होते आणि अशा काळात विवाहासारखी मंगल कार्ये, मुंज किंवा वास्तूशांती यांसारखे मोठे संस्कार टाळले जातात. याचे मुख्य कारण असे की, हिंदू धर्मात गृहस्थाश्रमातील शुभ कार्यांसाठी बृहस्पती (गुरू) आणि शुक्र यांचे बळ आवश्यक असते. पौष महिन्यात सूर्य आणि गुरूच्या स्थितीमुळे हे बळ कमी असते, असे मानले जाते. मात्र, याचा अर्थ असा मुळीच नाही की, हा महिना अशुभ आहे. उलट, हा महिना वैयक्तिक साधना, तपश्चर्या, दानधर्म आणि ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. ज्या गोष्टी संसाराशी जोडलेल्या आहेत त्या वर्ज्य केल्या गेल्या आहेत, पण ज्या गोष्टी मोक्षाशी किंवा आत्मोन्नतीशी जोडलेल्या आहेत, त्यांना या महिन्यात प्राधान्य दिले जाते.
 
महाराष्ट्राच्या संस्कृतीत पौष महिन्यातील सणांची सुरुवात भोगीने होते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा हा सण, निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करून बाजरीची भाकरी, लोणी आणि सर्व प्रकारच्या शेंगाभाज्या (घेवडा, वाटाणा, गाजर, हरभरा) यांची लेकुरवाळी भाजी केली जाते. या अन्नामध्ये उष्णता देण्याचे गुणधर्म असतात, जे हिवाळ्यातील थंडीशी लढण्यासाठी शरीराला सज्ज करतात. यानंतर येतो, तो भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण ’मकर संक्रांत.’ जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हापासून सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो. यालाच ‘उत्तरायण’ म्हणतात. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस मानला जातो, जो अत्यंत शुभ असतो. महाराष्ट्रात या दिवशी तिळाला विशेष महत्त्व दिले जाते. ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ हा संदेश केवळ सामाजिक सौहार्दाचा नसून, आरोग्यशास्त्राचाही आहे. थंडीत कोरड्या झालेल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी, तिळातील तेल आणि गुळातील लोह अत्यंत फायदेशीर ठरते. मकर संक्रांतीनंतर येणारा ‘किंक्रांत’ हा दिवसही महाराष्ट्रात पाळला जातो.
 
पौराणिक कथेनुसार, संक्रांती देवीने ‘किंक्रासुर’ नावाच्या दैत्याचा वध केला होता, म्हणून हा विजय साजरा केला जातो. या दिवसांमध्ये सुवासिनी स्त्रिया हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. विशेषतः पौष महिन्यात वाण लुटण्याची परंपरा आहे. गृहिणी मातीच्या सुगडात शेतातील नवीन धान्य (उदा. ऊस, बोरं, हरभरे) भरून, ते देवाला अर्पण करतात आणि सुवासिनींना वाण देतात. हे दान केवळ वस्तूंचे नसून, निसर्गातील नवीन अन्नाचा आदर करण्याचे प्रतीक आहे. तसेच पौष महिन्यात रथसप्तमीच्या आधी येणारी पुत्रदा एकादशी आणि शाकंभरी पौर्णिमा, हेदेखील महत्त्वाचे उत्सव आहेत. शाकंभरी नवरात्रात देवीची विविध पालेभाज्यांनी पूजा केली जाते, जे निसर्गाच्या सुफलामतेचे दर्शन घडवते.
 
धार्मिक दृष्टिकोनातून पौष महिन्यात कोणती कार्ये करावीत आणि कोणती टाळावीत, याचे स्पष्ट संकेत शास्त्रात दिले आहेत. या महिन्यात वर्ज्य असलेली कार्ये म्हणजे विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाचा शुभारंभ किंवा कोणत्याही नवीन मोठ्या वास्तूची खरेदी. ही कार्ये काम्य कर्मात मोडतात, म्हणजेच ज्यातून वैयक्तिक सुखाची अपेक्षा असते. याउलट, करण्यायोग्य धार्मिक कार्ये म्हणजे विष्णू आणि सूर्याची उपासना. पौष महिन्यात दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणे, आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करणे आणि गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात केलेले दान, विशेषतः अन्नदान, वस्त्रदान आणि तीळदान हे अनंत पटीने फळ देणारे असते. असे मानले जाते की, पौष महिन्यात जे लोक गरजू लोकांना ब्लँकेट किंवा गरम कपडे दान करतात, त्यांना ईश्वरी कृपा प्राप्त होते.
 
पौष महिन्याचे आणखी एक महत्त्वाचे पैलू म्हणजे पितृकार्य. हा महिना दक्षिणायनाचा शेवटचा काळ असल्याने, पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध किंवा तर्पणविधी करणे योग्य मानले जाते. अनेक लोक या महिन्यात तीर्थयात्रा करतात. प्रयागराज येथे होणारा माघ मेळा, वास्तविक पौष महिन्यापासूनच सुरू होतो. याकाळात त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचे मोठे फळ मिळते. विज्ञानाच्या दृष्टीनेही या काळात सकाळी लवकर उठून स्नान करणे आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसणे, यामुळे ‘ड’-जीवनसत्त्वाची प्राप्ती होते आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे धार्मिक संस्कारांच्या आड आपल्या ऋषिमुनींनी आरोग्याचे मोठे विज्ञान दडवून ठेवले आहे.
 
या महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा हे स्त्रीशक्तीच्या पोषणकर्त्या रूपाचे प्रतीक आहे. जेव्हा पृथ्वीवर दुष्काळ पडला होता, तेव्हा देवीने आपल्या शरीरातून विविध भाज्या आणि धान्य उत्पन्न करून सृष्टीचे रक्षण केले, अशी कथा आहे. या काळात महाराष्ट्रातील अनेक कुलदेवतांच्या जत्रा आणि पालख्या निघतात. कोल्हापूरची अंबाबाई किंवा तुळजापूरची भवानीमाता यांना विविध भाज्यांचा नैवेद्य (शाकंभरी नैवेद्य) दाखवला जातो. हा उत्सव आपल्याला अन्नाचे महत्त्व सांगतो. निसर्गाने जे दिले आहे, त्याचे रक्षण करणे आणि ते कृतज्ञतेने स्वीकारणे हीच खरी धार्मिकता या महिन्यात शिकवली जाते.
 
थोडक्यात सांगायचे तर, पौष महिना हा ‘शून्य’ किंवा ‘अशुभ’ नसून, तो अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःची ऊर्जा संचयित करण्याचा महिना आहे. संसारातील धामधूम थोडी थांबवून, ईश्वराची आराधना करण्यासाठी दिलेली ही एक संधी आहे. विवाहासारखी कार्ये थांबवून मानवाला आपल्या आरोग्याकडे आणि आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देता यावे, हाच यामागील मूळ उद्देश आहे. मकर संक्रांतीचा सण आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे आणि थंडीकडून उबदारपणाकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे पौष महिन्यातील नियमांचे पालन करून, निसर्गातील बदलांचा आदर करत केलेली भक्ती मानवाला मनःशांती आणि उत्तम आरोग्य प्रदान करते.
 
या महिन्यात आपण जरी बाह्य प्रगतीची (विवाह, वास्तू) कामे करत नसलो, तरी आंतरिक प्रगतीसाठी हा काळ सुवर्णसंधी आहे. ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ हा मंत्र आपल्याला समाजाशी जोडतो, तर सूर्योपासना आपल्याला विश्वाच्या ऊर्जेशी जोडते. अशा प्रकारे, पौष महिना हा भारतीय संस्कृतीतील संयम, त्याग, भक्ती आणि आरोग्याचा एक अद्भुत संगम आहे.
 
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज
(लेखक अध्यात्मिक साधक असून, प्रत्येक मानवाच्या अंतर्गत दडलेल्या चैतन्याला प्रकट करण्यासाठी मार्गदर्शन करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.)