मुंबई : ( Navanath Ban ) उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत मुस्लिम मतांसाठी लांगुलचालन केले. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि खुर्ची पटकावली. त्यांच्या या कृत्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मतदारांचा आशीर्वाद मिळाला. मुस्लीम मते मिळवण्यासाठी उबाठा गटाची ‘मुस्लिम लीग’ झाली आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिली आहे.
नवनाथ बन म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय केले? संजय राऊत हे मराठी माणसासाठी तुरुंगात गेले की, पत्राचाळ घोटाळ्यामुळे? त्यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी केलेले एक तरी काम दाखवले तर मी त्यांना हजार रुपये देईल. त्यांनी मराठी माणसांची घरे लुटली, भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. ज्या बीडीडी चाळीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी किफायतशीर किंमतीत मराठी माणसाला घरे दिली, त्याच बीडीडी चाळीतील घरांची किंमत ठाकरे सरकारमध्ये तब्बल ५० लाख इतकी ठेवली होती. याऊलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या १०० कामांची माहिती मी देतो. मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, रस्ते, पायाभूत सुविधा, घरे ही आणि असंख्य कामे देवेंद्रजींनी केली आहेत,” असे ते म्हणाले.
“पत्रकारांनी जेव्हा राज ठाकरे यांना जागावाटपाची आकडेवारी सांगा असे विचारले तेव्हा संजय राऊत यांचा चेहरा बघण्यासारखा होता. संजय राऊत कुठल्या स्वातंत्र्य लढ्यात होते? मराठी माणसाला लुटल्याने तुम्ही तुरुंगात गेलात. वंदे मातरम् म्हटल्यावर आपल्याला काही हिरवी मते मिळणार नाहीत हे माहिती असल्याने संजय राऊतांना वंदे मातरम् म्हणायची लाज वाटते. त्यांनी व्यासपीठावर संपूर्ण वंदे मातरम् गीत म्हणून दाखवावे,” असे आव्हानही त्यांनी दिले.
हेही वाचा : आता फक्त ५ रुपयांत मिळणार जेवण! दिल्ली सरकारची 'अटल कँन्टीन' योजना होणार लवकरच सुरू
पिंजरा चित्रपटातील मास्तरसारखी राऊतांची अवस्था
“पिंजरा चित्रपटात जशी मास्तरची परिस्थिती झाली तशीच अवस्था संजय राऊत आणि उबाठा गटाची झाली. हातात तुणतुणे घेऊन तुम्हाला हिरव्या मतांसाठी काँग्रेसच्या दारात उभे रहावे लागत आहे. पण यामुळे काहीही फरक पडणार नसून मुंबईतील मराठी माणूस भाजप आणि महायुतीच्या पाठीमागे उभा आहे,” असेही ते म्हणाले.
भाजपाने कधीही भाषिक वाद निर्माण केला नाही
“ठाकरे बंधूंची युती ही पराभवाच्या भीतीतून निर्माण झालेली युती आहे. निवडणुका आल्या की, मराठी माणूस, मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचा बागुलबुवा निर्माण करण्याचे काम मनसे आणि उबाठा गट करतात. भाषिक, प्रांतीय वाद निर्माण करण्याची परंपरा ही उबाठा गट आणि मनसेची आहे. मनसेनेच अमराठी माणसांना मारहाण केली. भाषेच्या नावावर, प्रांतवादाच्या नावावर सर्वसामान्य मुंबईकरांना मारले. भाजपाने कधीही मराठी-अमराठी वाद निर्माण केला नाही,” असेही नवनाथ बन यांनी स्पष्ट केले.