आता मिळणार ६ लाखांचे कर्ज फक्त तीन टक्के व्याजदरात ! १ जानेवारी २०२६ पासून मुख्यमंत्री स्वरोजगार योजना होणार लागू

    24-Dec-2025
Total Views |

mukhyamantri swarojgar yojana
 
 
मुंबई : १ जानेवारी २०२६ पासून मुख्यमंत्री स्वरोजगार योजना सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत पाच लाख युवकांना तीन टक्के व्याजदराने सहा लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यापैकी तीन टक्के व्याज हे राज्य सरकार भरणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या एकूण सव्वा लाख युवकांना या योजनेत दहा टक्के प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अधिवेशनात दिली. राज्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून सरकारतर्फे प्रयत्न केले जाणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा लवकरच राज्य सरकारतर्फे केली जाईल.
 
 
युवक-युवतींसाठी राबविण्यात येणारी ही योजना प्रामुख्याने कौशल्य प्रशिक्षणासाठी असून या अंतर्गत युवकांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यात दुकान, स्टार्टअप्स किंवा व्यावसाय करू इच्छिणाऱ्या युवकांना ही महत्वाची योजना गेमचेंजर ठरणार आहे. २०२२मध्ये मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली. ज्यात आत्तापर्यंत १ कोटी १६ लाख युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले.



त्यासाठी आत्तापर्यंत एकूण ८१० कोटी इतका निधी खर्च झाला. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असणारा प्रशिक्षणाचा कालावधी हा एकूण ११ महिन्यांचा करण्यात आला. नव्या पुरवणी मागण्यांत यात ४०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरुपी आहे, त्यात कुठलाही खंड पडलेला नाही, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या योजनेतून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येकासाठी राज्य सरकार स्वतंत्र कृती आराखडा तयार करत आहे. आयटीआयमध्ये कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी १० टक्के आरक्षण आणि मोफत प्रवेश दिला जाणार आहे.