मुंबई : ( Chandrashekhar Bawankule ) ठाकरे बंधू एकत्र आल्याने आमच्यावर काहीही परिणाम होणार नसून आम्ही ५१ टक्के मते घेऊन जिंकणार आहोत, असा विश्वास महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ठाकरे बंधू बुधवारी युतीची घोषणा करणार असून यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "ठाकरे बंधू एकत्र आल्याने आमच्यावर काहीही परिणाम होणार नसून आम्ही ५१ टक्के मते घेऊन जिंकणार आहोत. लोक विकसित महाराष्ट्र आणि विकसित महानगराच्या बाजूने उभे आहेत. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आमच्या विरोधात जेवढे लोक एकत्र आलेत तेवढा फायदा आहे. त्यांनी एकत्र यावे आणि लढावे. निवडणुकीत जो निकाल येईल तो बघू. ठाकरे बंधूंची युती त्यां लखलाभ आहे. आम्ही दोन तृतीयांश मते घेऊन जिंकणार आहोत. ग्रामीण महाराष्ट्राने महायुतीच सरकारते काम स्वीकारले आहे. आतापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात जेवढे बहुमत मिळाले नाही, तेवढे बहुमत या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळेल, असा मला विश्वास आहे."
"३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे असून आज आमची संपूर्ण महानगरपालिकेमधील शिवसेनेची बोलणी पूर्ण होणार आहे. उद्यापर्यंत आमचे महायुतीचे निर्णय होतील आणि मग आपापल्या पक्षाचे उमेदवारसुद्धा ठरतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आम्ही सर्वांनी बसून याबद्दल काल चर्चा केली आहे. यामध्ये त्या त्या विभागातील प्रमुख समन्वयकांनी यामध्ये लक्ष घालायचे असून आज आणि उद्यामध्ये अंतिम निर्णय होईल," असेही त्यांनी सांगितले.
शक्य तिथे यूती अन्यथा मैत्रीपूर्ण लढत
"पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कार्यकर्ते अधिक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेससोबत यूती होणार नाही, असे आम्ही ठरवले आहे. मात्र, काही ठिकाणी बोलणी सुरु असून एक दोन दिवसांत चर्चा होईल. शक्य आहे तिथे तिन्ही पक्षांची यूती होईल आणि जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढण्याचा प्रस्ताव आहे," असेही त्यांनी सांगितले.
मुंबईत भाजप-शिवसेना युतीची चर्चा
"मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे. मुंबईचे अध्यक्ष अमीत साटम, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण चर्चा करतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय करतील.अधिवेशन काळात झालेल्या बैठकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे ठरले होते. आता फक्त जागा वाटपाबद्दल शिवसेनेच्या पाच आणि भाजपच्या पाच स्थानिक नेत्यांची समन्वय समिती बसली आहेत आणि ते जागा वाटपाचा अंतिम निर्णय करत आहेत. मुंबईतील जागांवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय करतील. मुंबईसंदर्भात उद्यापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असे दिसते."
राहुल गांधी यांचे बोलणे मोठा जोक
"ज्या ३० ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष जिंकले त्यांचे काय? ते अवैध मार्गाने, मशीन बंद करून किंवा मतचोरी करून निवडून आले का? ज्या ठिकाणी काँग्रेसला मते मिळाली तिथे मशीन चांगली आहे, पण जेव्हा भाजपा जिंकते तेव्हा मात्र, मतचोरीचा आरोप होतो. लोकांना आता राहुल गांधी यांचे बोलणे एक मोठा जोक असल्याचे वाटू लागले आहे. जोकर आणि जोक अशी तुलना लोक करत आहेत. त्यामुळे आता हा नरेटिव्ह संपलेला आहे. त्यांच्याकडे दुसरे काही नसल्याने ते असे बोलतात," असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.
आम्ही सर्व मुनगंटीवार यांच्या पाठीशी
"एखाद्या निवडणूकीवर वारंवार टीका करण्यापेक्षा जिथे भाजपचा पराभव झाला तिथे आम्ही आत्मचिंतन करत आहोत. आम्ही कुणालाही दोष देत नाही. आत्मचिंतनातून शिकून पुढे जाऊ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व लोक आहोत. पण काही ठिकाणी निवडणुकीमध्ये पराजय झाल्यामुळे त्यांनी काही भावना व्यक्त केल्या. त्यावर आता मुख्यमंत्री चर्चा करतील," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.