साताऱ्याच्या साहित्य संमेलनात नवीन प्रयोगांचा अभाव!

23 Dec 2025 15:48:36
satara sahitya sammelan
 
मुंबई : ( satara sahitya sammelan ) नवीन वर्षाच्या सुरुवातीला पार पडणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या साहित्य संमेलनाची अधिकृत कार्यक्रम पत्रिका नुकतीच प्रकाशित झाली. मात्र, या वर्षी देखील साहित्य संमेलनातील नेहमीच्या मांडणी, यात नव्या प्रयोगांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देशाच्या राजधानीमध्ये पार पडलेले साहित्य संमेलन तथा मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाची वर्षपूर्ती लक्ष्यात घेता, काही नवीन गोष्टी होतील अशी अपेक्षा होती, मात्र कार्यक्रम पत्रिका पाहता साहित्यप्रेमींचा रसभंग झाल्याचे दिसून येत आहे.
 
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संवाद व परिचर्चेच्या सत्रांमध्ये मराठी प्रकाशन व्यवहार, कोशवाडमयासंदर्भात विचारविमर्श होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सदर साहित्य संमेलनामध्ये मनोरंजनपार कार्यक्रमांवर अधिक भर दिला असल्याचे दिसून येते. छत्रपतींच्या नगरीमध्ये साहित्य संमेलन भरलेले असताना, शिवकालाविषयी, शिवरायांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना या संमेलनात स्थान नाही का, असा सवाल उपस्थित होतो.
 
अभिजात मराठीच्या कक्षा आता रुंदावल्या असून, वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर लेखन केले जात आहे. मात्र या समाजमाध्यमांवरील नवोदित लेखकांना यामध्ये स्थान नसल्याचे दिसून येते. बोली भाषेचं समृद्ध दालन उपलब्ध असताना, साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही. महाराष्ट्रामध्ये सध्या वेगळा विचार मांडणारी पिढी कात टाकते आहे. अशा वेळेला प्रस्थापित लेखक संपादकांची मुलाखत घेण्याऐवजी नवोदित लेखकांना, युवकांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तिमत्वांना संधी देणे जास्त सयुक्तिक ठरले असते.
 
हेही वाचा : भारतीय महिला क्रिकेट संघानं घेतलं श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात जाऊन दर्शन
 
साहित्य वजा संमेलन होऊ नये!
 
संमेलनाचे स्वरूप अनेक वर्षे तसेच आहे. मात्र, यावर्षी विषयात वैविध्य आहे. काही विषय उत्तमच आहेत.पण, स्त्री स्वातंत्र्य चळवळीची ५० वर्षे हा विषय 'या व्यासपीठावर' अनावश्यक वाटला. किमान 'स्त्री स्वातंत्र्याचे साहित्यात प्रतिबिंब' अशा अंगाने तरी असायला हवा होता. (आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कम्युनिस्ट पक्षाची शंभरी याचाही समावेश का नाही?) उर्वरित विषय छान असले तरी, साहित्याबाह्य घटकांचा भाषणांवर नकळत दबाव येऊन साहित्य वजा होऊन संमेलन म्हणजे ठराविक विचाराचे राजकीय व्यासपीठ बनते असा अनुभव येतोय. ते टाळण्याचा प्रयत्न व आग्रह धरला पाहिजे.
 
 
Powered By Sangraha 9.0