Santosh Deshmukh Case : ‘मला बोलायचंय!’ म्हणणाऱ्या वाल्मिक कराडचं तोंड कोर्टानेच केलं बंद; सुनावणीत नेमकं काय घडलं?

23 Dec 2025 13:44:55
Santosh Deshmukh Case  
 
मुंबई : (Santosh Deshmukh Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. बीड येथील विशेष मकोका (MCOCA) न्यायालयात मंगळवारी दि. २३ डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयाने मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर खून, खंडणी, अपहरण आणि संघटित गुन्हेगारीचे आरोप औपचारिकरीत्या वाचून दाखवले. सर्व आरोपींनी हे आरोप अमान्य असल्याचे सांगितले. (Santosh Deshmukh Case)
 
कोर्टातील नाट्यमय घडामोडी
 
सुनावणीदरम्यान आरोपी पक्षाकडून खटला लांबवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला. चौथा आरोपी प्रतीक घुले याने शेवटच्या क्षणी वकील बदलत स्वतंत्र वकील नियुक्त केला आणि पुरावे पाहण्यासाठी वेळ मागितला. लॅपटॉपमधील फॉरेन्सिक डेटा व अहवालांच्या प्रती मिळाल्या नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. यावर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी तीव्र आक्षेप घेत, "आरोपींकडून खटला 'डी फॉर डिले' आणि 'डी फॉर डिरेल' करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा घणाघाती आरोप निकम यांनी केला. (Santosh Deshmukh Case)
 
हेही वाचा : Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर दोष निश्चित; ८ जानेवारीला पुढील सुनावणी 
 
न्यायालयाची कडक भूमिका
 
प्रतीक घुलेच्या वकिलांनी "हा AI चा जमाना आहे, पुराव्यांशी काहीही छेडछाड होऊ शकते, मला अधिक वेळ द्यावा," अशी विनंती केली. मात्र, वारंवार वकील बदलणे आणि तांत्रिक कारणांवर वेळ मागण्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. “प्रत्येक तारखेला अशी कारणे चालणार नाहीत,” असे सुनावत कोर्टाने उपलब्ध डेटा आजच तपासून घेण्याचे आदेश दिले. तपास अधिकाऱ्यांनी लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये असल्याचे आणि खाजगी माहिती असल्याने सरसकट डेटा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने मध्यस्थी करत, डेटा उपलब्ध होताच वकिलांना देण्याचे निर्देश दिले. (Santosh Deshmukh Case)
 
‘फक्त हो किंवा नाही सांगा’
 
आरोपींच्या साक्षीदरम्यान न्यायालयाने थेट प्रश्न विचारला, “खंडणी, अपहरण, हत्या आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे आरोप तुम्हाला मान्य आहेत का?” यावर वाल्मिक कराडने चार वेळा “आरोप अमान्य” असे उत्तर दिले. “मला बोलायचं आहे,” असे म्हणताच न्यायालयाने कराडला स्पष्ट शब्दांत बजावले, “फक्त हो किंवा नाही सांगा.” त्यामुळे कराडचे अधिक बोलणे न्यायालयाने रोखले. (Santosh Deshmukh Case)
 
हे वाचलात का ?: Thackeray Brothers : मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब, राऊतांच्या पोस्टमध्ये नेमकं काय? 
 
उज्ज्वल निकम यांचे महत्त्वाचे मुद्दे
 
अ‍ॅड. निकम यांनी युक्तिवादात ठामपणे मांडले की, खंडणीमध्ये अडथळा ठरल्यामुळे संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींचा उद्देश दहशत निर्माण करून गुन्हेगारी साम्राज्य उभे करणे हाच होता. प्रत्यक्ष पुराव्यांचे सादरीकरण लवकरच सुरू होणार असून, ८ जानेवारीनंतर हा खटला फास्ट-ट्रॅक पद्धतीने चालवला जाईल, असे त्यांनी सांगितले. (Santosh Deshmukh Case)
 
नेमकं प्रकरण काय ? 
 
९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले होते. सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले. या ठिकाणापासून एका बाजूला सुदर्शन घुलेचे शेत आहे. त्याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केली. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. १५ व्हिडीओ आणि ८ फोटो आरोपीकडे मिळाल्याची नोंद आहे. या व्हीडिओत ते आरोपी प्रत्यक्ष मारताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहेत. हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली होती. १२ मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात १८०० पानांचे चार्जशीट सादर केले होते. त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील दिले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. नंतर अटकसत्र सुरू झाले होते. 
 
 
Powered By Sangraha 9.0