इस्लामवादाचे पोषण आणि इस्लामवादावर प्रहार

23 Dec 2025 10:17:05
Rising Islamist
 
सध्या अमेरिकेमध्ये इस्लामवाद फोफावला असून, हे विचारसरणी राजकीय असल्याची टीका अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी नुकतीच केली. या विरोधात लढण्याचे त्या म्हणत असल्या तरी, अमेरिका जगामध्ये अनेक देशात ‘इस्लामवाद’ पसरवणार्‍या देशांकडे कानाडोळाच करताना दिसते.
 
अमेरिकेत राजकीय आणि अन्य कायदेशीर मार्गांचा वापर करून इस्लामी विचारसरणी रुजविण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत, त्यावर अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्याच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी कडाडून टीका केली आहे. इस्लामी तत्त्वे ही अमेरिकेच्या लोकशाही आणि स्वातंत्र्यविषयक चौकटीस अत्यंत धोकादायक असल्याचेही गबार्ड यांनी म्हटले आहे. "अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात इस्लामी विचारसरणी रुजत चालल्याचे दिसून येत आहे. ही रुजत असलेली इस्लामी विचारसरणी, व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचा विचार करता धोकादायक आहे,” असेही तुलसी गबार्ड यांनी म्हटले. तुलसी गबार्ड यांच्या या वक्तव्याची समाजमाध्यमांवर वेगाने दखल घेतली जात असून, या मुद्द्यावर व्यापक चर्चा व्हावी, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.
 
आपल्या भाषणात तुलसी गबार्ड यांनी ’इस्लामी श्रद्धा’ आणि ’इस्लामवाद’ यामध्ये फरक केला आहे. त्या म्हणतात, "इस्लामवाद ही पूर्णपणे राजकीय विचारसरणी असून, ती विचारसरणी अमेरिकेमध्ये वेगाने पसरत आहे. ही राजकीय विचारसरणी अमेरिकेच्या तत्त्वांशी सुसंगत अशी नाहीच तसेच, ही विचारसरणी अमेरिकेच्या सामाजिक भावनिष्ठांशीही विसंगतच आहे. अमेरिकेच्या काही भागात ही राजकीय विचारसरणी फैलावत चालली असून, कायदेशीर आणि राजकीय माध्यमांद्वारे ही इस्लामी तत्त्वे अमेरिकेत रुजविण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत,” असेही तुलसी गबार्ड यांनी म्हटले आहे. पॅटरसन (न्यू जर्सी) या शहरास, स्वत:ला पहिले मुस्लीम शहर म्हणवून घेण्याचा अभिमान वाटत आहे. कायदा किंवा हिंसाचार यांच्या माध्यमातून, ही इस्लामिक तत्त्वे लोकांवर लादण्याचा प्रयत्न होत आहे. ह्युस्टनसारख्या शहरामध्येही असे प्रकार याआधीपासून सुरू झाले आहेत. असे प्रकार आपल्या सीमांच्या आत सुरू असून, अमेरिकेच्या संस्कृतीचा विचार करता, इस्लामी विचारसरणी ही पूर्णपणे त्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे, याकडेही तुलसी गबार्ड यांनी लक्ष वेधले.
 
धार्मिक स्वातंत्र्य आणि राजकीय विचारसरणी यामध्ये फरक असल्याचे तुलसी गबार्ड यांनी म्हटले आहे. "आमचे स्वातंत्र्य हे ईश्वराकडून आले आहे. ते अन्य कोणाकडून आलेले नाही,” असे जेव्हा म्हटले जाते, त्यावेळी आम्ही इस्लामी विचारसरणीचा धोका गांभीर्याने समजून घेतला पाहिजे, असेही तुलसी गबार्ड म्हणाल्या. टोकाच्या विचारसरणीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठाच धोका निर्माण होऊ शकतो, याकडेही गबार्ड यांनी लक्ष वेधले. अमेरिकेचे सामाजिक, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष ताणेबाणे उसवले जाऊ शकत नाहीत. अशी कोणतीही टोकाची कृती घडल्यास अमेरिका त्याविरुद्ध निर्णायक कृती करील, असे गबार्ड यांनी ठामपणे म्हटले आहे.
 
आपल्या देशात रुजू पाहत असलेल्या इस्लामी विचारसरणीच्या संदर्भात अमेरिकी गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांना काय वाटते, हे वरील वक्तव्यावरून लक्षात येते. ‘अमेरिका प्रथम’ या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारांशी सुसंगत असे हे विचार असले, तरी जागतिक राजकारणात पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशाला हवी ती मदत करणार्‍या अमेरिकेला त्या देशातील टोकाचा ’इस्लामवाद’ दिसत नाही, असे कसे म्हणणार?
 
‘जागो माँ’ गीत म्हणतच राहणार!
 
प्रसिद्ध बंगाली गायिका लग्नजिता चक्रवर्ती हिने गायलेले ‘जागो माँ’ हे गीत बंगालमध्ये सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. गेल्या दुर्गापूजा उत्सवाच्या वेळी, हे गीत सर्वत्र गाजत होते. बंगाली चित्रपट ‘देवी चौधुरानी’ या चित्रपटातील हे गीत आहे. बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमध्ये एका खासगी शाळेमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात लग्नजिता चक्रवर्ती ‘जागो माँ’ हे गीत गात असताना, त्या गीताच्या गायनास एका व्यक्तीने हरकत घेतली. व्यासपीठावर जाऊन त्या व्यक्तीने गायिकेवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. ज्या व्यक्तीने या गीतास आक्षेप घेतला, त्या व्यक्तीचे नाव मेहबूब मलिक असे आहे. ‘’जागो माँ... जागो माँ... खूप झाले, काहीतरी सेक्युलर गाणे गा,” असे हा मेहबूब व्यासपीठावर येऊन सांगत होता. त्याला व्यासपीठावरून दूर केले, तरी त्याचा हा ओरडा सुरूच होता. त्या गायिकेचा एकेरी उल्लेख करून त्याने तिचा अपमानही केला. या कार्यक्रमात मेहबूब मलिक याने जो गोंधळ घातला, त्यानंतर लग्नजिता चक्रवर्ती हिने आपला कार्यक्रम थांबविला आणि या घटनेची माहिती लगेच पोलिसांना दिली. तशी तक्रारही पोलिसांकडे नोंदविली आहे. ज्या शाळेमध्ये हा कार्यक्रम सुरू होता, त्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा मेहबूब मलिक हा सदस्य आहे. याप्रकरणी, मेहबूब मलिक यास अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपल्या गाण्याचे कार्यक्रम ग्रामीण आणि निमशहरी भागात आपण करणारच आहोत, त्यापासून आपणास कोणी रोखू शकणार नाही. आपण यापुढेही ‘जागो माँ’ हे गीत गात राहणार असल्याचे, या गायिकेने ठामपणे सांगितले. प. बंगालमधील वातावरण कसे बनत चालले आहे, त्याची या घटनेवरून कल्पना यावी.
 
दुर्गापूजा उत्सवाच्या वेळी ‘जागो माँ’ हे गीत सर्वत्र लोकप्रिय झाले होते. ते गीत गाणार्‍या लग्नजिता चक्रवर्ती हिच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात ‘जागो माँ’ या गीतास आक्षेप घेण्यात आला. आक्षेप कोणी घेतला, तर मेहबूब मलिक या मुस्लिमाने! ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीतास आक्षेप घेणारे अनेक महाभाग, अद्याप आपल्या देशात आहेत. आता बंगालमधील एका मुस्लिमाने ‘जागो माँ’ या गीतास आक्षेप घेतला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासंदर्भात काय भूमिका घेतात, हे अद्याप प्रकट झालेले नाही. त्याकडे बंगाल आणि देशातील राष्ट्रप्रेमी जनतेचे लक्ष आहे.
 
न्यूझीलंड : ‘शीख नगर कीर्तन’वरून तणाव
 
न्यूझीलंडच्या दक्षिण ऑकलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या शीख समाजाने, अत्यंत शांततापूर्ण वातावरणात धार्मिक मिरवणूक काढली होती. ‘शीख नगर कीर्तन’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या या धार्मिक मिरवणुकीस, त्या शहरातील काही लोकांनी आक्षेप घेतला. या निदर्शकांनी मिरवणुकीचा मार्ग अडविला. या निदर्शकांनी हातामध्ये ‘हा न्यूझीलंड आहे, भारत नव्हे’, अशा आशयाचे फलक धरले होते. या घटनेनंतर त्या देशात असलेल्या शीख आणि अन्य भारतीय समाजाकडून चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, त्या देशात असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे जे उल्लंघन झाले, त्याबद्दलही काळजी व्यक्त करण्यात आली.
 
या घटनेचा भारतातील शीख नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. त्या देशातील शीख समाजाकडून दरवर्षी ही धार्मिक मिरवणूक काढली जाते पण, यंदा त्या मिरवणुकीस आक्षेप घेण्यात आला. ‘गुरू नानक जयंती’च्या निमित्ताने रविवार दि. २१ डिसेंबर रोजी ही मिरवणूक काढण्यात आली होती. शीख समाजाची मिरवणूक ‘गुरू ग्रंथसाहिब’मधील पदे म्हणत, शांततापूर्ण वातावरणात चालली होती. स्थानिक निदर्शकांनी ही मिरवणूक अडवली. काही निदर्शक हातात, ‘हा न्यूझीलंड आहे, भारत नव्हे’, असे फलक घेऊन उभे होते. तर, काही ‘हाका’ नावाचे पारंपरिक मावरी नृत्य, अत्यंत आक्रमकपणे करताना दिसत होते. या घटनेचे तीव्र पडसाद भारतातही उमटले. ’शिरोमणी अकाली दला’चे अध्यक्ष सुखबिरसिंह बादल यांनी या घटनेचा निषेध करून हा धार्मिक स्वातंत्र्यावर घाला आहे, असे म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा सर्व मुद्दा न्यूझीलंड सरकारकडे उपस्थित करावा, अशी मागणीही बादल यांनी केली आहे. त्या देशात असलेल्या शीख आणि अन्य भारतीयांच्या धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली गेली पाहिजे, असे आवाहनही बादल यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0