देश‘विरोधी’ पक्षनेता...

23 Dec 2025 10:28:57
Rahul Gandhi
 
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींची परदेश दौर्‍यांमधील भारतविरोधी वक्तव्ये ही नित्याचीच. पण, आताचा जर्मनी दौरा आणि यापूर्वीच्याही त्यांच्या परदेश दौर्‍यांमागचा उद्देश एकच- भारतविरोधी शक्तींना हाताशी घेऊन मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचणे. त्यांच्या या देशविरोधी षड्यंत्राचे आकलन...
 
नुकताच ‘फिगरिंग आऊट’ हा राज शमानीचा एक ‘पॉडकास्ट’ ऐकण्यात आला. यंदाच्या ‘पॉडकास्ट’चे पाहुणे होते अमर भूषण, जे निवृत्त सरकारी अधिकारी असून, त्यांनी ‘रॉ’, ‘आयबी’ आणि ‘बीएसएफ’सारख्या देशाच्या सुरक्षेशी निगडित सरकारी यंत्रणांमध्ये कित्येक वर्षे सेवा बजावली आहे. यावेळी भूषण यांना कोणत्याही देशाच्या गुप्तचर यंत्रणांची नेमकी कर्तव्य कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर क्षणभराचाही संदेह न करता, भूषण यांनी गुप्तचर संस्थेचे पहिले कर्तव्य सांगितले ते म्हणजे, अडचणीच्या ठरणार्‍या शेजारी अथवा शत्रूराष्ट्रातील सरकार उलथवून टाकणे आणि त्या सरकारच्या जागी आपल्याला अनुकूल सिद्ध होतील, त्या विरोधकांना सत्तापदावर बसविणे.
 
भूषण यांचे हे विधान भारताच्या शत्रूंबाबतही अतिशय तंतोतंत जुळावे. कारण, भारताची सर्वांगीण प्रगती, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जागतिक करिश्मा आणि एकूणच भारताचे वाढते वैश्विक महत्त्व, हे अमेरिकेसह कित्येक पाश्चात्त्य देशांना आजही रुचणारे नाही, हे यापूर्वी कित्येक उदाहरणांतून सिद्ध झाले आहे. शिवाय, भारताला आता आपण कोणत्याच बाबतीत गृहीत धरू शकत नाही की, हवे तसे वागवू शकत नाही, याची पूर्ण कल्पना पाश्चात्त्य देशांना आहेच. मग, अशा वेळी विरोधी पक्षांना आणि त्यातही राहुल गांधींसारख्या तोंडाळ, अननुभवी, भारतीय मूल्यांपेक्षा पाश्चात्त्य मूल्यांचेच आकर्षण असलेल्या आणि डावीकडे झुकलेल्या नेत्याच्या हाती भारताची सूत्रे आली की, मग त्याला कळसूत्री बाहुले म्हणून कसेही नाचवता येईल, हाच पाश्चिमात्य शक्तींचा अजेंडा! त्याचाच प्रत्यय राहुल गांधींच्या आजवरच्या सगळ्या परदेश दौर्‍यांतून येतो आणि तसाच तो त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या जर्मनीच्या दौर्‍यावरूनही आलाच.
 
एकट्या २०२५चा विचार करता, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या देशांच्या दौर्‍यांमध्ये अमेरिका, युएई, मलेशिया, ब्राझील, कंबोडिया आणि आता जर्मनीचा समावेश आहे. (यात त्यांच्या निवडणुकांनंतरच्या ‘श्रमपरिहारा’साठी केलेल्या अन्य खासगी दौर्‍यांचा समावेश नाही, बरं का!) या प्रत्येक देशांत जेव्हा-जेव्हा राहुल गांधींनी तोंड उघडले, ते भारतविरोधी गरळ ओकण्यासाठीच! त्यांच्या या सगळ्या देशांमधील दौर्‍यादरम्यानचा समान बिंदू म्हणजे, ‘भारतात आज लोकशाहीच जिवंत नाही.’ जर्मनीतही बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही; पण लोकशाहीत उत्तरदायी राहावे लागते.
 
काँग्रेस सत्यासोबतच कायम उभी आहे. आमचा पक्ष भारताच्या सत्याच्या संरक्षणार्थ कायम सज्ज आहे.” या विधानांमधील ‘लोकशाही’, ‘उत्तरदायित्व’, ‘सत्य’ या कशाचाही काँग्रेसशी यापूर्वीही कधी तिळमात्र संबंध नव्हता, आताही नाही आणि तो भविष्यातही नसेल. कारण, हे सगळे मुळी काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्येच नाही, हे भारतीय जनताही पुरते जाणून आहे. म्हणूनच, अगदी ‘पंचायत’पासून ते ‘पार्लमेंट’पर्यंत काँग्रेस पक्षाचा ‘हात’ हा मुरगळलेलाच दिसतो. असो. पण, जनतेने २०१४ पासून तब्बल ९०हून अधिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला नाकारून वारंवार लाथाडल्यानंतरही त्यांच्यातील अहंकाराचा दर्प काही कमी होत नाही. उलट, मोदी सरकारशी लढा देण्यासाठी पाश्चिमात्य शक्तींनाच कसे हाताशी धरून आपला स्वार्थ साधता येईल, यासाठीच राहुल गांधी सदैव प्रयत्नशील दिसतात.
 
अमेरिकेतील कट्टर भारतद्वेष्टा जॉर्ज सोरोस म्हणूनच राहुल गांधींचा लाडका! यापूर्वीही सोरोसशी संबंधांवरून राहुल गांधींना वेळोवेळी भाजपकडून लक्ष्य करण्यात आले होते. कारण, ‘सोरोस बोले, राहुल चाले’ अशी ही स्थिती. आता जर्मनी दौर्‍यातही सोरोसप्रणीत ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ आणि ‘सेंट्रल युरोपियन युनिर्व्हर्सिटी’शी संबंधित हर्टी स्कूलच्या डॉ. कॉर्नेलिया वोल यांची राहुल गांधींनी भेट घेतली. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विदेशातील भेटीगाठी या अशाच लोकांशी निगडित असतात, ज्यांचे फंडिंग सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’कडून होते, जे पाश्चात्त्य तथाकथित बुद्धिवादी भारतातील लोकशाही, काश्मीर धोरण आणि अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचारांवर वारंवार एकांगी टिप्पणी करतात आणि विदेशातील असे काही राजकारणी, ज्यांचे भारतविरोधी लागेबांधे आहेत. हीच मंडळी जर्मनीमध्येही ‘थिंक टँक’ म्हणून वावरतात, ज्यांची राहुल गांधींनी आवर्जून भेट घेतली.
 
त्यातच राहुल गांधींच्या या परदेश दौर्‍यांमागील ‘टायमिंग’संदर्भात आणखीन एक बाब मुद्दाम अधोरेखित करावीशी वाटते. ती म्हणजे, ज्या-ज्या वेळेला संसदेचे अधिवेशन सुरू असते, त्याचदरम्यान राहुल गांधींना विदेश खुणावतो. एकीकडे, "संसदेत आम्हाला बोलू दिले जात नाही, आमचे सरकार ऐकत नाही,” म्हणून बेछूट आरोप करायचे आणि दुसरीकडे अधिवेशन सोडून विदेशातून भारताची बदनामी करायची, मोदी सरकारची मुद्दाम प्रतिमा मलीन करायची, असा हा सगळा दुटप्पीपणा. त्यातच राहुल गांधींच्या परदेश दौर्‍याचा भारताला अर्थोअर्थी उपयोग तो काय? ते जर्मनीत ‘बीएमडब्ल्यू’ फॅक्टरीत गेले, तेही फोटोसेशनसाठी. तसेच राहुल गांधी परदेशात गेल्यामुळे ना त्या देशाशी भारताच्या परराष्ट्र संबंधांमध्ये कोणती सुधारणा होते, ना कोणती गुंतवणूक भारतात आकर्षित होते.
 
राहुल गांधींच्या लेखी तर ही सारी सरकारची जबाबदारी. पण, जर ते स्वत:ला सच्चे भारतीय समजत असतील, तर त्यांनी आजवर अशा दौर्‍यांतून भारतासाठी, भारतीयांसाठी काय ठोस केले? अटलजींनाही विरोधी पक्षनेतेपदी असताना १९९४ साली तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी संयुक्त राष्ट्रांत भारताची बाजू मांडण्यासाठी पाठवले होतेच की. याउलट, राहुल गांधी जर्मनीत असताना समोरुन ‘जय हिंद’, ‘वन्दे मातरम्’चे नारे दिल्यानंतरही, त्यांच्या मनात राष्ट्रभाव जागृत झालेला दिसला नाही आणि ते तोंडातून ‘ब्र’ही न काढता तसेच ढिम्म उभे होते. म्हणूनच की काय, रशियाचे अध्यक्ष पुतीन भारत दौर्‍यावर असताना राहुल गांधींना नव्हे, तर संसदेतील परराष्ट्र व्यवहारसंबंधांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांना सरकारतर्फे आमंत्रित करण्यात आले असावे.
 
त्यामुळे राहुल गांधींचा वापर सोरोस आणि अन्य पाश्चात्त्य भारतद्वेष्ट्या शक्तींकडून केवळ एक कठपुतळी म्हणून होतोय आणि राहुल गांधीही तसा स्वत:चा वापर करू देतात, हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायानेच केवळ सत्तास्वार्थासाठी राहुल गांधींचे हे देशविरोधी उद्योग सुरू आहेत. पण, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग तीनवेळा नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत धोक्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय दबावतंत्र, परकीय हस्तक्षेपाच्या षड्यंत्रांचा चक्रव्यूह कसा आत्मविश्वासाने भेदायचा, याचे पुरते भान मोदींना आहे. पण, आज वयाच्या ५५व्या वर्षीही राहुल गांधींना विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारीचेही साधे भान नाही. असो. प्याद्यांचा वापर एकदा का करून झाला आणि नंतर ते बिनकामाचे ठरले की, त्यांचे काय होते, हे वेगळे सांगायला नकोच!
 
 
Powered By Sangraha 9.0