केळवणाची पंगत आणि आरोग्यमंत्र

23 Dec 2025 11:25:29
Kelvan
 
सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम. अशातच लग्नापूर्वी नातेवाईकांकडून, मित्रपरिवाराकडून भावी वर-वधूंच्या केळवणाचीही अगदी जय्यत तयार केली जाते. हल्ली केळवणालाही हॉटेलमधील जेवण आणि पार्टीचे स्वरुप प्राप्त झालेले दिसते. त्यानिमित्ताने नेमकी केळवणाची परंपरा, त्यामागील आहारभान आणि महिलांचे आरोग्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
"ए आई, उद्या रात्री मी घरी जेवायला नाही येणार आणि रात्री घरीपण येणार नाहीये. आमची बॅचलर पार्टी आहे.” हे ऐकलं आणि आजी म्हणाली, "काय चाललं असतं हल्ली या मुलांचं! आठ दिवसांवर लग्न आले आहे आणि याचा तर घरात पाय पण टिकत नाही.” तशी सायली आजीला म्हणाली, "अगं, दादाचं केळवण आपण करणार आहोत की नाही आता? तेव्हा तू घरातल्या सगळ्या नातेवाईकांना बोलावणार आहेस की नाही? तसंच दादाचे केळवण त्याचे मित्र करणार आहेत.” आजी गप्प झाली. मग आईने सायलीला विचारले, "तुला माहीत आहे का, केळवण म्हणजे काय? कसे करायचे? कशासाठी करायचे? ते ऐक मग आता.”
 
लग्न, मुंज यांच्यापूर्वी आपल्या घरी किंवा आप्तेष्ट नातेवाईक यांच्या घरी होणारा जेवणाचा समारंभ यालाच ‘गडगनेर’ किंवा ‘गडंगणेर’सुद्धा म्हणतात. ‘गडू’ म्हणजे पाण्याचा तांब्या आणि ‘नीर’ म्हणजे पाणी. तर नुसते तांब्याभर पाणी नव्हे, तर पाहुण्यांसाठी मेजवानी देणे. पूर्वीच्या काळी जेवणासाठी केळीची पाने किंवा पत्रावळीचा उपयोग होत असे. दक्षिणेमध्ये अजूनही केळीच्या पानावरच जेवण वाढतात. महाराष्ट्रात आता केवळ गणपती, गौरी यांसारख्या सणांना देवाचा नैवेद्य यावर वाढला जातो.
भावी वर किंवा वधूला केळीच्या पानावर जेवण वाढणे, म्हणजे ‘केळवण’ असाही अर्थ लागतो. केळीचे झाड हे नाजूक असते. त्याची नीट मशागत करावी लागते. काळजी घ्यावी लागते. वधूची माहेरी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे ती सासरीही घेतली जावी, असाही त्यामागे उद्देश असेल. काही ठिकाणी तर हा केळवणाचा कार्यक्रम केळीच्या बागेमध्येसुद्धा करतात.
केळवणाचा कार्यक्रम हा खरं तर नववधूसाठी करतात. त्या मागचे शास्त्रीय कारण बघूया.
 
केळीला ‘बहुप्रसवा’ म्हणतात. केळी हे विपुल संततीचे सौभाग्याचे मांगल्याचे प्रतीक आहे. केळीच्या फुलापासून फळ तयार होताना चरचर आवाज होतो. केळीप्रमाणेच घरात येणारी स्त्री ही सौभाग्यवान, विपुल संतती होईल, अशी व्हावी. अशी भावना या समारंभात आहे. म्हणून या समारंभाला ‘केळवण’ म्हणतात.
 
आज २०२५ साली जेव्हा आपण समाजाकडे बघतो, तेव्हा एकतर मुलांची लग्नं उशिरा होताना दिसत आहेत किंवा त्यांना केवळ एकच मूल हवे असते किंवा हल्ली अशी कित्येक जोडपी बघण्यात आली आहेत की, त्यांना मूलच नको असते. आपला सुदृढ सुसंस्कृत सुविधा असा समाज आपल्या भारतवर्षाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी योग्य संतती होणं. किमान दोन मुले असणं हे आवश्यक वाटू लागले आहे.
 
अजूनही एक प्रथा अशी आहे की, नववधूला उपयोगी पडतील अशा वस्तू आलेले नातेवाईक मित्रमंडळी देत असतात. लग्नात रुखवतात वधूपिता ते ठेवत असे. केळवणामध्ये नवरीला आवडतील, अशा गोष्टी-पदार्थ बनवत असत. त्यामध्ये पुरणपोळीपासून मोदक, श्रीखंड पुरी असे अनेक पदार्थ बनवत असत.
 
हल्ली केळवण हे घरी फारच कमी वेळा करतात, तर हॉटेलला जाणे सगळे पसंत करतात किंवा ते सोयीस्करपण ठरते. तरीसुद्धा हॉटेलमध्ये खाणे म्हणजे पनीर, पिझ्झा आणि चीज याशिवाय कुठल्याही डिशची सुरुवातच होत नाही. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पार्ट्या, होणारी जागरणे, त्यामुळे होणारे पित्ताचे आजार हे सगळे दुष्टचक्र सुरू होते.
 
हल्लीची मुले-मुली ही हॉटेलचे खाणे, बाहेरचे खाणे यातच मोठेपणा मानतात. हे त्यांच्या लाईफस्टाईलचा एक भाग बनलेला असतो. या सगळ्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे, याची त्यांना जाणीवच नसते. त्यामुळे मुलींना ‘पीसीओडी’सारखे विकार सुरू होतात. त्यामुळे त्यांची पाळी अनियमित होते, वजन वाढणे, केस गळणे, चेहर्‍यावर पिंपल्स येणे असे नानाविध विकार जडतात. ‘पीसीओडी’ची योग्य चिकित्सा केली गेली नाही, तर ती मुलगी वंध्यत्व या खूप दुःखदायक गोष्टीकडे जाऊ शकते. दर महिन्याला नेमाने मासिक पाळी येणे, तीन ते चार दिवस व्यवस्थित अंगावर जाणे, यामुळे स्त्रीचे आरोग्य नीट राहते.
 
हल्ली रात्री उशिरा झोपणे; सकाळी उशिरा उठणे; सतत मोबाईलच्या संपर्कात राहणे; व्यायाम न करणे या सगळ्या गोष्टी तिचे वजन वाढवतात. ब्लड शुगर वाढवतात. अशा अनेक ‘मेटाबोलिक डिसऑर्डर’जन्य व्याधी सुरू होतात. परत त्या स्त्रीला मूल होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
 
केळीच्या झाडाचे, पानांचे, फळांचे, अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. केळफुलाची भाजी निवडायला जरा किचकट असते. चवीला तुरट असते. पण, ती औषध म्हणून खाल्ली, ती भाजी चव घेऊन खाल्ली, तर स्त्रीसाठी खूप उपयुक्त ठरते. ‘पीसीओडी’च्या पेशंटना ही भाजी खाणे फायदेशीर ठरते.
 
केळीच्या पानावरती गरमागरम वरण-भात, तूप घेतले असता, त्याची चव उत्तम अमृततुल्य लागते. तेवढेच ते आरोग्यदायी असते. त्यामुळे प्लास्टिकचा, थर्माकोलच्या प्लेटचा वापर करण्यापेक्षा ज्यांना जेव्हा शक्य असेल, तेव्हा केळीच्या पानांचा जेवणासाठी उपयोग करा. आपल्याकडे आपण केळवणासाठी लोकांना बोलावणार असू, तर केळीच्या पानावरच मेजवानीचे पान जरूर वाढा. घरी बनवलेले ताजे सात्त्विक जेवण करा. आरोग्यदायी गोष्टी बनवा. साजूक तुपाचा डोळसपणे वापर करा. पनीर, चीज, बटरचा अतिरिक्त वापर जाणीवपूर्वक टाळा.
 
विवाहाचा उद्देश संतानप्राप्ती असतो. त्यामुळे स्त्री व पुरुष हे निरोगी असतील, तर त्यांच्या पोटी जन्मणारी मुले-बाळेही निरोगी होतील. हल्ली तर लग्नानंतर मूलच नको, हे विचारसुद्धा अतिप्रबल आहेत. हेसुद्धा एक प्रकारचं मानसिक प्रदूषण म्हणू शकतो. आपण जसा आहार घेतो, तसे आपले मन बनते. तसा आपला देह बनतो. चुकीचा आहार-विहार त्या बाळात काही आजार निर्माण करू शकतो. ‘खाण तशी माती’ या म्हणीचा नीट विचार करणे गरजेचे आहे.
 
काही वर्षांपासून जगाच्या जवळजवळ सर्व प्रदेशांमध्ये प्रजननदर कमी झाला आहे. भारतीयांमध्येसुद्धा हे प्रमाण जवळजवळ ४० टक्के खाली आले आहे. (WHO चा अहवाल असं सांगतो.) हल्ली मुली सुशिक्षित असतात. मोठ्या हुद्द्यावर नोकरीत असतात. लग्नं उशिरा होतात. त्यानंतर मूल किती वर्षांनी व्हावे, यात वेळ जातो. यात मूल होण्याचे वय वाढत जाते. शारीरिक ताकद कमी होऊ शकते. कधीकधी मूल होत नसल्यास अनेक चाचण्या, वेगवेगळ्या ट्रीटमेंट यांत वेळ, पैसा आणि मानसिक शांती खर्च होते. त्यामुळे योग्य वयात लग्न करणे. २४ ते २६, २७ वर्षे अगदी योग्य वय ठरते.
 
त्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे, गीर गायीच्या दुधाचा, तुपाचा वापर करणे, या सगळ्या गोष्टींमुळे तिचे आरोग्य टिकून राहते. तिच्या पोटी निपजणारी संतती, ही निरोगी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे युवतींनी किंबहुना छोट्या वयाच्या मुलीपासूनच त्याची योग्य काळजी घेतली, तर भावी माता व तिची भावी प्रजा निरोगी दीर्घायुषी होईल.
सर्वे सन्तु निरामयः|
- डॉ. अरुणा टिळक
(लेखिका बीएएमएस., एम.ए. योगशास्त्र आहेत.)
आरोग्य भारती कोकण प्रांताद्वारे प्रकाशित
 
 
Powered By Sangraha 9.0