संस्कृत अन् सावरकरांचा ‘प्रांजल’ संगम

23 Dec 2025 10:56:12
Pranjal Akkalkotkar
 
कालसुसंगत भविष्याभिमुख संस्कृत रचनाकार, संगीतकार, गायक, वादक आणि एक तपापेक्षा अधिक काळ सावरकरांच्या चरित्राचा अभ्यास करणार्‍या प्रांजल अक्कलकोटकर यांच्याविषयी...
 
वेद-उपनिषदे हे पूज्य ग्रंथ आहेतच. पण, पोथीनिष्ठ न होता, त्यांचं अनुकरण कसं करायचं, ते आपण आपल्या विवेकानुसार ठरवावं,” हा स्वा. वि. दा. सावरकरांचा आधुनिकतेचा विचार संस्कृत प्रसाराच्या कार्यदिशेमध्ये गुंफून घेणार्‍या प्रांजल अक्कलकोटकर यांचे नाव संपूर्ण देशाला प्रथम कळलं, ते २०१४ साली. मोदी सरकार केंद्रात आल्यावर दि. २८ मे रोजी सावरकर जयंतीला ‘दूरदर्शन’वर पहिली मुलाखत झाली, ती प्रांजल अक्कलकोटकर यांची!
 
प्रांजल अक्कलकोटकर यांचे आजोबा संस्कृतपंडित. आई-वडील दोघेही उच्चशिक्षित आणि आयुर्वेदातील वैद्य. त्यामुळे ‘हिंदू धर्म आणि संस्कृत भाषा हे जणू देह आणि आत्मा,’ हीच अक्कलकोटकर घराण्याची शिकवण. पुण्यातील ‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये प्रांजल यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्याच काळात प्रांजल यांना सावरकरांचे चरित्र वाचायचे जणू व्यसनच लागले. स्वा. सावरकरांविषयी उपलब्ध असलेलं प्रत्येक पुस्तक अभ्यासून त्यांनी काही स्वरचित पद्यरचना केल्या. कीबोर्ड वाजवायचा छंद असल्यामुळे त्या आपोआपच संगीतबद्धदेखील झाल्या. सावरकरांचे जाज्वल्य विचार पारंपरिक पद्धतीने आधुनिक पिढीपर्यंत मांडण्याऐवजी, त्यांना आवडेल त्याच प्रकारात ते सादर करावे, या भावनेतून प्रांजल यांनी आपल्या महाविद्यालयीन मित्रांच्या सोबतीने ‘बंदे हिंदुवानी’नामक बॅण्ड तयार केला. त्यात ते सावरकरांचे चरित्रकथन आणि स्वरचित १२ गाणी सादर करत असत. याचदरम्यान रणजीत सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी प्रांजल यांचे नाव सूचवले आणि ‘दूरदर्शन’वर त्यांची मुलाखतसुद्धा घेतली गेली.
 
सावरकरांचे चरित्र अभ्यासताना स्वतःची तल्लीनता जाणून प्रांजल यांनी ओळखले की, त्यांना ‘इतिहास’ विषयात अधिक रस आहे. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘ज्ञान प्रबोधिनी’ शाळेत इतिहासाचा अध्यापक म्हणून नोकरी केली. सोबतच, त्यांनी ‘बी.एड.’ पूर्ण केलं आणि ‘सेट’ परीक्षासुद्धा उत्तीर्ण झाले.
 
ते इतिहास शिकवत असले, तरी आपली संस्कृतची आवड जपत, तेथील संस्कृत शिक्षकांच्या साहाय्याने ते संस्कृत अध्ययन करत असत. त्याच काळात झालेल्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवासाठी त्यांनी एका संस्कृत गाण्याची रचनादेखील केली. तसेच, सर्वश्रुत ‘डिस्ने’ चॅनेलवरील एका इंग्रजी गाण्याचा संस्कृत अनुवादही केला. या रचनांना यश मिळाल्यावर त्यांना आत्मविश्वास तर मिळालाच होता आणि योगायोगाने तेव्हा ‘लॉकडाऊन’ लागल्यामुळे त्यांना मिळालेला निवांत वेळ त्यांनी संस्कृतच्या स्वयंअध्ययनात सार्थकी लावला.
 
विरंगुळा म्हणून युट्यूब पाहताना त्यांना डॉ. श्रीहरि गोकर्णकर यांच्या विविध गाण्यांचे संस्कृत भावानुवाद करणार्‍या ‘संस्कृतश्री’ चॅनेलबद्दल कळले. प्रांजल यांनी त्यांना संपर्क करून ओळख तर करून घेतलीच; पण त्या दोघांची कौशल्ये एकमेकांना पूरक ठरून कालांतराने ‘गंधर्वसख्यम्’ कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याची संकल्पनादेखील प्रांजल यांना ‘डिस्ने’वरील कार्यक्रमातूनच सूचली होती. त्यावर श्रीहरि यांनी लेखन केले आणि प्रांजल यांनी संगीत आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आज यशस्वी १२ प्रयोग केले आहेत.
 
प्रांजल यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, ‘लॉकडाऊन’ काळात रा. स्व. संघाकडून स्वयंसेवक म्हणून काम करताना त्यांची सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी झालेली भेट. दोघेही कलाकार आणि सावरकरांचे गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांची पुढे गट्टीच जमली. त्यातून त्यांनी लिहिलेलं ‘मुक्ताईप्रशस्ती’ हे गाणं ‘ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला सादर करायची संधी मिळाली. प्रांजल यांना ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाची संधीदेखील त्यांच्या दिग्पालदादांमुळेच मिळाली. ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी चित्रपटाचे पार्श्वगायन करत, ते आता चित्रसंगीतातदेखील पदार्पण करत आहेत.
 
यासोबतच प्रांजल यांचा सावरकरांविषयीचा अभ्यास तर चालूच आहे. याचवर्षी त्यांनी ‘मी सावरकर’ या नामांकित स्पर्धेत भाग घेऊन ‘सावरकरांच्या विचारांतील हिंदू’ या विषयावर आपले विचार मांडत स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले आहे. त्याचबरोबर त्यांच्या सावरकर अभ्यासाच्या तपश्चर्येचे फळ म्हणून अलीकडेच त्यांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक कार्यकारिणी’वर तीन वर्षांसाठी निवडदेखील झाली आहे. त्यात ते ‘संस्कृत’ याच विषयावर काम करणार आहेत. सावरकरांचे विचार, ती पुरातन तत्त्वे आपण आजच्या काळात कशी लागू करून घेऊ शकतो, यावर काम करून ती कालसुसंगत करत वापरात आणणे, या उद्दिष्टाने ते कार्य करत आहेत. सावरकरअभ्यासक आणि संस्कृतप्रेमी प्रांजल अक्कलकोटकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
- ओवी लेले 
 
 
Powered By Sangraha 9.0