भारतीय अर्थव्यवस्था सध्या समतोल अवस्थेत आहे. फार वेगही नाही आणि मंदावण्याची भीतीही नाही. अशा वेळी गुंतवणूक करताना संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत आवश्यक. त्याविषयी सविस्तर...
भारतीय अर्थव्यवस्था सध्या एका विशेष अवस्थेतून जात आहे. या अवस्थेला जागतिक अर्थविश्लेषणात ‘गोल्डीलॉक्स पॉझ’ असे संबोधले जाते. म्हणजेच, ना फार वेग ना संथ; तर समतोल साधणारी अवस्था. म्हणजेच, वाढ मजबूत आहे, महागाई नियंत्रणात आहे आणि धोरणात्मक अनिश्चितता तुलनेने कमी आहे. या टप्प्यावर अर्थव्यवस्था धावतेही आणि मंदावतही नाही. उद्योगांना विस्ताराची संधी मिळते, ग्राहक खर्च करतो आणि गुंतवणूकदाराचा विश्वास कायम राहतो. मात्र, याच विश्वासाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारासमोर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे, आता लगेच गुंतवणूक करावी का की, अजून चांगल्या वेळेची वाट पाहावी? हा प्रश्न विशेषतः सोन्यासारख्या पारंपरिक, सुरक्षित मानल्या जाणार्या गुंतवणुकीच्या संदर्भात अधिक गुंतागुंतीचा ठरतो. कारण, सोने हे भारतीय मानसिकतेचा विचार करता; विश्वासाचे, सुरक्षिततेचे आणि अनिश्चिततेपासून संरक्षण देणारे माध्यम आहे. मात्र, अर्थव्यवस्था जेव्हा समतोल अवस्थेत असते, तेव्हा सोन्याची भूमिका नैसर्गिकरित्या बदलते आणि ती प्रमुख नव्हे, तर पूरक अशी ठरते.
‘गोल्डीलॉक्स’ अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय गुंतवणुकीचा निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. या अवस्थेत आर्थिकवाढ कायम असते; पण ती महागाई नियंत्रणात ठेवणारी असते. व्याजदरांमध्ये अनपेक्षित बदल होत नाहीत. सरकार आणि मध्यवर्ती बँक दोघेही वेग आणि त्यावरील नियंत्रण यांचा समतोल साधण्याच्या प्रयत्नात असतात. परिणामी, बाजारात एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. तथापि, हाच आत्मविश्वास कधीकधी अतिविश्वासात बदलतो आणि तेथेच गुंतवणूकदाराच्या निर्णयात चूक होते. अनेक गुंतवणूकदारांना असे वाटते की, बाजाराची वाढ जास्त वेगाने झाली आहे, किमती वाढलेल्या आहेत, त्यांच्यात घसरण झाली की, मग बाजारात प्रवेश करू. हा विचार तर्कसंगत वाटतो. पण, प्रत्यक्षात तो अनेकदा स्वतःचाच शत्रू ठरतो. कारण, ‘योग्य वेळ’ ही संकल्पना आकर्षक असली, तरी ती नेमकेपणाने मांडता येत नाही. बाजाराचे अचूक मूल्यमापन करणे, हे तज्ज्ञांनाही जमलेले नाही. त्यामुळे वेळेची वाट पाहत बसणे म्हणजे अनेकदा सोन्यासारखी संधी गमावणे, असाही असतो.
अशा वेळी संयत तथापि, सातत्याने गुंतवणूक करण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.
बाजार वर असो वा खाली, दर महिन्याला गुंतवण्यात येणारी ठरावीक रक्कम जोखीम विभागण्याचे काम करतेच. त्याशिवाय, अशी करण्यात येणारी गुंतवणूक गुंतवणूकदाराच्या मानसिकतेलाही शिस्त लावण्याचे मोलाचे काम करते. ‘गोल्डीलॉक्स’ अवस्थेत बाजार फार वेगाने वर जात नाही. पण, त्याच्या गतीत सातत्य असते. अशा वेळी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास चढ-उतारांचा बसणारा फटका कमी होतो आणि दीर्घकालीन परताव्याची शक्यता वाढीस लागते. मात्र, अशा परिस्थितीत सोन्याला पूर्णपणे दुर्लक्षून चालत नाही. उलट, सोन्याची भूमिका समजून घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्था मंदीत असताना युद्ध, जागतिक संकटे, चलनाचे अवमूल्यन किंवा महागाई भडकते, तेव्हा-तेव्हा सोन्याच्या दरात वाढ होते. अनिश्चित वातावरणात सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय ठरतो. परंतु, अर्थव्यवस्था एका स्थिर अवस्थेतून जात असताना, उद्योग गुंतवणूक करत असताना, तसेच नफ्याच्या संधी उपलब्ध असताना, सोने तुलनेने मागे पडते. याचा अर्थ हा नाही की, सोन्यात गुंतवणूक करूच नये. प्रश्न हो किंवा नाहीचा नसून, किती आणि कशासाठी हा आहे. सोने हे पोर्टफोलिओमधील विम्यासारखे आहे. विमा आपण नफ्यासाठी घेत नाही, तर अपघातासाठी घेतो. त्याचप्रमाणे सोने अनिश्चिततेपासून संरक्षण देते. पण, ते वाढीचे मुख्य इंजिन ठरत नाही. ‘गोल्डीलॉक्स’ अवस्थेत वाढीचे इंजिन बहुधा समभाग, व्यवसाय, उत्पादन आणि सेवा क्षेत्रच असते.
भारतीय गुंतवणूकदार अनेकदा भावनिक निर्णय घेताना दिसून येतो. बाजार वाढीस लागत असताना त्याला अशी भीती असते की, उशीर झाला का? आणि बाजार कोसळत असताना त्याला अशी भीती वाटते की, आता सगळे बुडेल. या दोन्ही टोकाच्या भावना गुंतवणुकीसाठी घातक अशाच ठरतात. ‘गोल्डीलॉक्स’ अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, ती अतिउत्साह किंवा अतिभय या दोन्ही भावना निर्माण करत नाही. मात्र, ती संयमाची परीक्षा पाहणारी ठरते. सोने अशा अवस्थेत मानसिक आधार देण्याचे काम करते. पोर्टफोलिओमध्ये थोडे सोने असल्याने गुंतवणूकदार धाडसाचे निर्णय घेऊ शकतो. कारण, संपूर्ण भांडवल एका जोखमीवर अवलंबून राहत नाही. मात्र, सर्व गुंतवणूक सोन्यात करणे म्हणजे ‘गोल्डीलॉक्स’ अवस्थेचा अर्थच न समजणे असाच होतो. कारण, ही अवस्था सांगत असते की, संधी आहेत म्हणून अतिरेक नको.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गुंतवणुकीचा कालावधी. अल्पकालीन दृष्टीने पाहणार्या गुंतवणूकदारासाठी बाजारातील चढ-उतार महत्त्वाचे ठरतात. दीर्घकालीन दृष्टी असलेल्या गुंतवणूकदारासाठी मात्र अर्थव्यवस्थेची दिशा अधिक महत्त्वाची असते. ‘गोल्डीलॉक्स’ अवस्था ही दिशा सकारात्मक असल्याचे सूचित करते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदाराने ‘वाट पाहावी का?’ या प्रश्नापेक्षा ‘मी सातत्य ठेवतो आहे का?’ हा प्रश्न स्वतःला विचारणे अधिक उचित ठरते. सोने दीर्घकाळ कायम राहिलेल्या महागाईपासून संरक्षण देत असले, तरी परतावा देण्यात ते बहुधा मागे राहते. त्यामुळे युवा गुंतवणूकदार, ज्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी सोन्याकडे गुंतवणुकीचा एकमेव पर्याय म्हणून पाहू नये. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिक किंवा मर्यादित उत्पन्नावर अवलंबून असलेल्यांनीही सोन्यावरचे अवलंबन टाळावे.
‘गोल्डीलॉक्स’ अवस्थेचा सर्वात मोठा धोका म्हणजे आत्मसंतोष. सगळे ठीक चालले आहे, ही भावना कधीकधी सावधपणा कमी करते. गुंतवणूकदाराने हे लक्षात ठेवले पाहिजे की, समतोल ही कायमस्वरूपी अवस्था नसते, ती बदलणार असेतच. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ लवचीक असणे, त्याचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे आणि गरजेनुसार समायोजन करणे आवश्यक असते. सोने या समायोजनात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. पण, तो एकमेव पर्याय नाही. प्रश्न कायम राहतो तो हा की, गुंतवणूक थोडीथोडी अशीच करावी की, योग्य वेळेची वाट पाहावी? ‘गोल्डीलॉक्स’ अर्थव्यवस्था याचे सूचक उत्तर देते. ती सांगते की, अति घाई करू नका. पण, अति विलंबही नको. स्वयंशिस्तीची गरज ती अधोरेखित करते. तसेच, भीतीवर मात करा, असेही ती सांगते. भारतीय अर्थव्यवस्थेचा सध्याचा टप्पा हा संधी आणि सावधपणा यांचा संगम आहे. यात यशस्वी तोच गुंतवणूकदार ठरतो, जो भावनांवर नव्हे; तर समजूतदारपणे निर्णय घेतो. सोने चांगल्या मित्राची भूमिका बजावू शकते. पण, ते मार्गदर्शक नाही. अशा परिस्थितीत एकच मार्गदर्शक असतो आणि तो म्हणजे संयम, सातत्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोन. भारतीय अर्थव्यवस्था सध्या या अवस्थेतून जात असल्याने गुंतवणूकदारांनी अशा वेळी संयमाबरोबरच दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणेच, त्यांच्या हितावह ठरेल.
- संजीव ओक