मुंबई : ( Indian Women’s Cricket Team ) श्रीलंकेविरूध्दच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघानं श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. यावेळी खेळाडू स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, रेणुका सिंग, शफाली वर्मा, अमरप्रीत कौर, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, श्री चरणी त्यासोबत पंच डीएस लक्ष्मी आणि वृंदा राठी उपस्थित होत्या. सिमचलम मंदिर हे विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
दरम्यान, खेळाडूंचे आगमन झाल्यावर मंदिर अधिकाऱ्यांनी पारंपारिक पध्दतीने संघाचे स्वागत केले. यानंतर खेळाडूंनी नरसिंह स्वामींचे दर्शन घेतले. गर्भगृहात विशेष विधींमध्ये ही भाग घेतला. मंदिर परिसरात पवित्र कप्पस्थंभाला देखील आलिंगन दिले. वैदिक विद्वानांनी दर्शन झाल्यानंतर खेळाडूंना आशीर्वाद ही दिले. उपस्थित मंदिर अधिकाऱ्यांनी संघातील खेळाडूंना पवित्र रेशमी वस्त्रे आणि प्रसाद दिला. यापूर्वी विराट कोहलीने देखील भारताच्या एकदिवसीय मालिका विजयानंतर सिंहचलम मंदिराला भेट दिली होती.
हेही वाचा : '२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'ची सुरूवात ९ जानेवारीपासून
पहिल्या टी-२० सामन्याच्या दमदार यशानंतर आता २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत महिला संघ श्रीलंकेच्या महिला संघाचा सामना करणार आहे.