काटा रुते कुणाला...

22 Dec 2025 12:48:57
Salman Rushdie
 
प्रख्यात लेखक सलमान रश्दी म्हणजे साहित्यविश्वातील गाजलेलं नाव. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये त्यांनी, भारताबद्दलची काळजी बोलून दाखवली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष करता-करता त्यांची गाडी भारतावर घसरली, आणि आपल्या कर्तव्यनिष्ठ भूमिकेला साक्षी ठेवून ते म्हणाले की, "भारतामध्ये सध्या इतिहास पुनर्लेखनाचा जो घाट घातला जात आहे, तो चिंताजनक आहे.” इतर राष्ट्रांप्रमाणेच भारतामध्ये कशाप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, याबद्दल त्यांनी मुक्ताफळंही उधळली. अशातच, हिंदू राष्ट्रवादावर महाशय बोलले नसते, तरच नवल. पंतप्रधानांच्या नेतृत्वातील हिंदू राष्ट्रवादावरसुद्धा त्यांनी ‘री’ ओढलीच. अशी टिप्पणीमुळे अर्थातच, त्यांचा चाहतावर्ग खूश झाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे शिलेदार म्हणून मनोमन त्यांचा गौरवही अनेकांनी केला असावा. मात्र, इंटरनेटच्या युगात डोळस लोकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे व्यक्तीच्या उक्ती-कृतीतील विरोधाभास चटकन लक्षात येतो.
 
रश्दी यांना मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी जाणीव करून दिली की, त्यांच्यावर हल्ला करणारा एक कट्टरतावादी मुस्लीम युवक होता. २०२२च्या ऑगस्ट महिन्यात, २७ वर्षांच्या हादी मतरने एका कार्यक्रमामध्ये सलमान रश्दी यांच्यावर चाकूहल्ला केला होता. १९८८ साली सलमान रश्दी यांनी लिहिलेल्या ‘द सेटेनिक वर्सेस’ या पुस्तकाच्या विरोधात, आखाती राष्ट्रांमध्ये रान उठले होते. रश्दी यांच्याविरोधात फतवाही काढण्यात आल्याने, तेव्हापासूनच रश्दी यांची ‘पलायन यात्रा’ सुरू झाली. परंतु, तब्बल तीन दशकांच्या कालावधीनंतर अमेरिकेच्या मातीवर अशा पद्धतीचा हल्ला रश्दी यांच्यावर होऊ शकतो, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. रश्दी यांच्या पुस्तकावर बंदी आणावी म्हणून अनेक राष्ट्रांमध्ये आंदोलनं, जाळपोळ, झाली. कट्टरतावादी मानसिकतेच्या विखारी चेहर्‍याचे दर्शनच त्यावेळी अनेकांना झाले.
 
एका बाजूला रश्दी आणि त्यांच्यासारख्या अनेक विचारवंतांना, भारत आणि तत्सम देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता असते. मात्र, दुसर्‍या बाजूला ही मंडळी आंतरराष्ट्रीय राजकारणातील कळीच्या मुद्द्यांबाबत सोयीने मौन धारण करतात. सलमान रश्दी हे इस्लामी कट्टरतावादी विचारसरणीचे बळी ठरले परंतु, त्यांच्यापेक्षा दुर्दैवी व्यक्ती म्हणजे दीपू चंद्र दास. २७ वर्षांच्या या युवकाला बांगलादेशमधल्या कट्टरपंथीयांनी केवळ मारलेच नाही, तर झाडाला टांगून जाळलेही. रश्दी यांच्यावर हल्ला झाला, सुदैवाने ते बचावले, त्यांच्यावर इलाज झाला. मात्र, दुसर्‍या बाजूला दास यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, वेदना आहे तशीच राहिली. बांगलादेशमधील हिंदू युवकांना, स्त्रियांना इतक्या क्रूरपणे मारण्याची ही पहिली वेळ नव्हे. ९०च्या दशकानंतर तिथल्या कट्टरतावादाचा भस्मासुर, अल्पसंख्याकांच्या आणि विशेषतः हिंदूंच्या मानगुटीवर बसला आहे. मोहम्मद युनूस सत्तापदी विराजमान झाल्यानंतर तिथल्या कट्टरतावाद्यांना खुली सूट मिळाली आहे की काय? अशीच परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये आहे. मृत्यूचे सावट आज या लोकांवर अधिकाधिक गडद होत जाते आहे.
 
अशाप्रसंगी, प्रतिभावंत साहित्यिकांनी हा भवताल आपल्या लेखणीतून साकारायला हवा. आपण आणि पीडित व्यक्ती ज्या एका वेदनेच्या धाग्यातून गुंफले गेले आहोत, त्यातूनही संवेदनशीलता प्रकट व्हायला हवी. मात्र, असे न करता; मर्यादित आकलनातून मोघमपणे टीकेचे कागदी बाण सोडायचे, येनकेन प्रकारे शासन यंत्रणेला, राजकारण्यांना सातत्याने दोष देत राहायचा, लोकस्मृतीत विरून गेलेल्या वादांची मढी उकरून काढायची व ‘औट घटकेचा राजा’ म्हणून प्रसिद्धी मिळवायची, असले छद्मी उद्योग हल्ली सर्रास सुरू आहेत. साहित्य लेखनाचे नेमके प्रयोजन काय? याचाच पुनर्विचार अशा मंडळींनी करणे आवश्यक झाले आहे. रश्दी यांच्यावर त्या हल्ल्याचा गंभीर परिणाम झाला. मरणाच्या दारातूनच रश्दी परत आले. मूळचा साहित्यिकाचा पिंड असल्यामुळे त्यांनी ही अनुभूती शब्दबद्ध केली. ‘नाइफ : मेडिटेशन्स आफ्टर अ‍ॅन अटेम्पटेड मर्डर’ हे त्यांचे पुस्तक २०२४ साली प्रकाशित झाले. चाकूप्रमाणेच भाषा देखील एक शस्त्र असल्यायाचा साक्षात्कार, त्यांना त्यावेळी झाला. येणार्‍या काळात आपल्या याच साक्षात्काराशी ते प्रामाणिक राहतील, हीच अपेक्षा.
 
 
Powered By Sangraha 9.0