पोमेंडीची देवराई

22 Dec 2025 13:38:58
Pomendi Devarai
 
जैवविविधतेचे कोंदण लाभलेल्या रत्नागिरीतील ‘पोमेंडी’ या देवराईविषयी माहिती देणारा हा लेख...
 
अरे, कुठे आहे देवराई" असा मुलांच्या घोळक्यातून आवाज आला. रत्नागिरी शहरातील बांधकामाच्या सततच्या जाणिवेने निसर्गाच्या परिसस्पर्शाची वाट पाहणार्‍या मुलांचे ते सूर होते. जे रत्नागिरीनजीकच्या ‘पोमेंडी देवराई’च्या वेशीवर घुमत होते. खरेतर ‘देवराई’ ही संकल्पनाच विलक्षण. देवाच्या नावाने आमच्या वाडवडिलांनी राखून ठेवलेले गावातले एक वनक्षेत्र. सकाळच्या कोवळ्या उन्हात सुमारे ९० मुलांचा चमू निसर्गाच्या साक्षीने आज देवराई म्हणजे काय, हे अनुभवणार होता. शिक्षकांच्या सूचनेनुसार, पायाखाली नजर ठेवत सगळे काही डोळ्यांत आणि नंतर मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद करणारे हात पुढे सरसावले.
 
सुरुवात झाली वेशीवरच्या धामण, उंबर या वनस्पतींच्या ओळखीतून. धामणाच्या खरखरीत पानांच्या स्पर्शाने वनस्पतीमधील संरक्षणाचे तंत्र विद्यार्थी जाणून घेत होते. उंबराच्या फळांच्या प्रसारातून देवराईतल्या पक्ष्यांना मिळणारे हक्काचे स्थान पाहत, पायांनी वेग धरला. चालत असलेला रस्ता आता पायवाटेत रूपांतरित झाला. पायवाटेच्या ठरावीक अंतरावर बेसुमार वाढलेली हिरवी वनस्पती आता दृष्टीत भरत होती. म्हायाच्या फुलांप्रमाणे दिसणारी; पण त्याहून अगदी छोटी अशी फुले त्यात फुललेली. काही ठिकाणी नुसत्या कळ्याच दिसत होत्या, ती होती रानमोडी. कोकणच्या प्रत्येक परिसंस्थेत अतिक्रमण केलेल्या या वनस्पतीचा शिरकाव या देवराईतदेखील झालेला दिसला. आपल्या स्थानिक वनस्पतींना मारक असणारी वनस्पती भविष्यात आपली वनसंपदा कशी नष्ट करू शकते, हे ऐकत असतानाच एक हात पिवळसर गुलाबी रंगात डुंबलेल्या फुलाकडे खुणावू लागला. ते फूल होते घाणेरीचे. रानमोडीसारखेच आपले अस्तित्व टिकवत, बाकी सगळे क्षेत्र आपल्याच अधिपत्याखाली घेऊ पाहणार्‍या या दोन्ही वनस्पती. वळणावळणातून पायवाट आता संपत आली होती. सुरुवात झाली होती, कोकणातल्या पाखाडीची.
 
काही ठिकाणी जुन्या दगडाने तयार केलेल्या पायर्‍या, तर काही ठिकाणी त्या दगडात कोरलेल्या दिसत होत्या. उतरणीच्या या वाटेत पेंडकुळी, रानअबोली मधेच फुललेली दिसत होती. गुलाबी-निळ्या रंगाच्या या फुलांच्या छटा सावलीतल्या हिरव्या रंगाला पुसट करत होत्या. वाकणात काजर्‍याचे एक झाड फळांनी भरलेले होते. गोलाकार हिरव्या फळांच्या स्पष्टतेतून फांद्याफांद्यातून झाडाला उभारी आली होती. झाडाच्या बुंध्यात पडलेल्या पक्व फळाची साल फोडत आत असलेल्या चमकदार बियांच्या चकत्या दाखवण्याचा मोह मला थांबवू शकला नाही. बिया जितक्या चमकदार, तितक्याच विषारी. मात्र, आयुर्वेदात बर्‍याच औषधीगुणासाठी उपयुक्त आहेत. इथे उन्हाची जाणीव कमी होत, उंच-उंच झाडांची गर्द सावली चालण्याचा थकवा गायब करून जाते. समोर अगदीच उतरंडीला सुरमाड, किंजळीचे आणि आंब्याचे महाकाय वृक्ष नजरेत भरता येत नाहीत, इतक्या दूरवर पसरले होते.
 
एक वेगळीच अनुभूती या परिसरात येते. शांततेच्या या आल्हादी अनुभवातून छोट्या-छोट्या रोपट्यांतून अनंतमूळ खोडावर एकाआड एक पानात दिसून येते. देवराईत बर्‍याच अंशी सुरमाड वाढताना दिसतात. धनेश पक्ष्याच्या करामतीतून देवराईत या वृक्षाची भरघोस वृद्धी झालेली दिसते. एका वळणात पाखाडीची एक कडा निसटताना दिसते. तिथून सावकाश पुढे चालावे लागते अन् मग दिसू लागते देशी वृक्षांचे प्रचंड घनदाट जंगल. जांभूळ, दिंडा आणि काटेसावर; मग फणस, साग होतात इथेच स्थिरस्थावर. इतके सारे बघितल्यावर आजूबाजूला डोकावताना मुरुडशेंगेची लाल फुले, कुठे केण्याची गुलाबी फुले डोकावू लागतात. आता शेवटच्या टप्प्यात येऊन आम्ही एका छोट्याशा पुलावर येऊन पोहोचलो. पुलाखाली थंडगार पाण्याच्या प्रवाहाने काळ्या दगडातून आपला रस्ता निर्माण केला होता.
 
पाण्याच्या ओढीने मुलांचे गट पाण्याजवळ एकवटले. पाण्यात पाऊल पडताच नदीतल्या माशांनी पाय स्वच्छ केले, हा असा अनुभव पराकोटीचे सुख देऊन गेला. थोड्याच वेळात थोडासा चढणीचा घाट चढून देवी महालक्ष्मीच्या मंदिरात आम्ही प्रवेश केला. संपूर्णपणे जांभ्या दगडाने बांधलेल्या या मंदिरात आई महालक्ष्मीची एक सुंदर मूर्ती दिसते. मूर्तीच्या डाव्या बाजूला इतर देवतांच्या मूर्तीदेखील पाहायला मिळतात. देवळाजवळील सारा परिसर निसर्ग अन् मानवामध्ये एक अध्यात्माची जोड निर्माण करतो. आई महालक्ष्मीच्या नावाने राखलेल्या या देवराईत कुठेही जंगलतोड दिसली नाही. कोकणात काही मोजक्याच देवरायांमध्ये हे चित्र बघायला मिळते. नाहीतर सर्रास मंदिराच्या जीर्णोद्धारात महाकाय वृक्षांचा उद्धार केलेला दिसतो. अशा विलक्षण वृक्षांच्या सावलीत विसावलेली कोकणातली ही देवराई म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंदच. असा वनसंपदेचा आनंद लुटून पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झालो, देवराई मनात जपत अन् निसर्गाचे वेगळेपण टिपत!
- परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सहा. प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र म्हणून कार्यरत आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0