लिओनेल इंडिया टूर...

22 Dec 2025 11:57:30
Lionel Messi
 
क्रिकेट जरी भारतीय खेळांमध्ये सर्वाधिक पसंतीस उतरलेला खेळ असला, तरीही फुटबॉलचे चाहतेही मोठ्या संख्येने भारतात आहेत. या चाहत्यांना पर्वणी म्हणून अर्जेंटिना फुटबॉल संघाचा लिओनेल मेस्सीचा भारत दौरा नुकताचा पार पडला. अर्थातच, हा दौरा विविध अंगाने चर्चेत राहिला. मेस्सीच्या या ‘इंडिया टूर’चा घेतलेला आढावा...
 
जगातील क्रीडा क्षेत्रात सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये ज्याचे स्थान वरचे आहे असा अर्जेंटिना येथे दि.२४ जून १९८७ साली जन्मलेला जगद्विख्यात फुटबॉलपटू लिओनेल आन्द्रेस मेस्सी, याआधी २०११ साली भारतात आला होता. त्यावेळेस कोलकाता येथे अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यात झालेल्या एका सामन्यात मेस्सी सहभागीही झाला होता. त्यानंतर खासगी दौर्‍याच्या निमित्ताने मेस्सी दि. १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत, पुन्हा भारतभेटीवर आला होता. आपल्या चार दिवसांच्या भारतभेटीदरम्यान मेस्सीने कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीला भेट दिली. मेस्सीचा हा दौरा मुळात तीन दिवसांचाच होता. पण, अनंत अंबानी यांच्या जामनगर येथील ‘वनतारा’ या वन्यजीव बचाव, देखभाल आणि पुनर्वसन केंद्राला भेट देण्यासाठी मेस्सीनेे आपला मुक्काम एक दिवसाने वाढवला. तेथूनच मग त्याने बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी मियामी येथे प्रयाण केले. जाण्यापूर्वी त्याने, "भारतात फुटबॉलचे भवितव्य उज्ज्वल आहे” असे मत व्यक्त करत, त्याला सर्वत्र मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल आभारही व्यक्त केले.
 
मेस्सीप्रेमींची नाराजी...
 
मेस्सीच्या या दौर्‍यात त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी चार हजार ते १२ हजार रुपयांची, तर काहींनी काळ्या बाजारातून चक्क २० हजार रुपयांपर्यंतचीही तिकिटे विकत घेतली होती. देशातील शेकडो फुटबॉलप्रेमी, बॉलीवूड, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील नामांकित आणि प्रतिष्ठित व्यक्ती ‘मेस्सी’दर्शनास उतावीळ झाले होते. त्यातील काहीजण यशस्वी ठरले, तर अनेकांच्या पदरी निराशा आली. कोलकाता विमानतळावर मेस्सीला पाहण्यासाठी, पहाटेपासूनच चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. कोलकात्यातील लेक टाऊन इथे मेस्सीच्या सन्मानार्थ ७० फुटी पुतळाही उभारण्यात आला होता. त्याचे अनावरण मेस्सीने याच त्याच्या दौर्‍यात केले. त्यानंतर कोलकात्यामधील सॉल्ट लेक येथील युवा भारती क्रीडांगणावर, उपस्थित असलेल्या सुमारे ५० हजार चाहत्यांना मेस्सीने हात उंचावून अभिवादन केले. मेस्सी स्टेडियमवर केवळ २२ मिनिटांसाठी आला आणि फार कमी काळ कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिला. राजकारणी, व्हीव्हीआयपी, पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सहकार्‍यांचाच मेस्सीभोवती गराडा असल्याने ज्यांनी तिकिटे विकत घेतली होती, अशा चाहत्यांना त्याला व्यवस्थितपणे पाहताही आले नाही. परिणामतः त्यांनी मैदानाच्या दिशेने रिकाम्या बाटल्या, खुर्च्या भिरकावत आपली नाराजी व्यक्त केली. यामुळे तिथे तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.
 
मेस्सी-बॅनर्जी भेट : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या गोंधळावर नंतर प्रतिक्रिया देत, त्यांना दुःख झाले आणि धक्का बसल्याचे म्हटले. या घटनेबद्दल बॅनर्जी यांनी मेस्सी, तसेच चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच, स्वतःदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमकडे निघाल्याचेही त्यांनी म्हटले.
 
ममता बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, ’या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी, घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार आहे.’
 
मेस्सी-रेड्डी भेट : मेस्सी कोलकाताहून हैदराबादला गेला. तेथे तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना मेस्सीसोबत फुटबॉल खेळण्याची सुवर्णसंधी होती. पण, खेळाच्या पेहरावात मैदानात थाटात आलेले रेड्डी, मेस्सीला एक साधा पासही देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःचेच हसे करून घेतले. मेस्सीकडे फुटबॉल किक मारताना तो चेंडू कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे खूप लांब जात असे. त्यामुळे तो चेंडू परत आणण्यासाठी, मेस्सीलाच धावपळ करायला लागत होती.
 
मेस्सी-फडणवीस भेट : महाराष्ट्रातील १३ वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सुरू केलेल्या, ‘प्रोजेक्ट महादेव’ या योजनेचा प्रारंभ मुंबईत वानखेडे मैदानावर मेस्सीच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय देवगण यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. वानखेडेवरचे मेस्सीप्रेमी मात्र कोलकात्यापेक्षा नशीबवान होते. त्यांच्यावर ‘सॉल्ट लेक’सारखी वेळ येणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.
 
मेस्सी-मोदी भेट : लिओनेल मेस्सीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त, २०२२च्या फुटबॉल विश्वचषक विजयाची स्वाक्षरी असलेली जर्सी पाठवली होती. पंतप्रधान मोदी यांनी त्याचा स्वीकार करून, त्याबद्दल धन्यवादही दिले होते. तेव्हाच खरेतर मेस्सी-मोदी यांच्या भेटीचे आणि मेस्सीच्या भारतभेटीचे नियोजन सुरु होते. तथापि, मेस्सी आणि मोदी यांची भेट दि. १५ डिसेंबर रोजी विमानाला झालेल्या विलंब आणि नंतर मोदींच्या पूर्वनियोजित विदेश दौर्‍यामुळे होऊ शकली नाही.
 
मेस्सी-रेखा गुप्ता भेट : "पुढील वेळेस मला सामना खेळण्यास नक्की आवडेल. ते जमले नाही, तरी भारतात मी पुन्हा नक्की येईन,” असे मेस्सी त्याच्या दिल्लीभेटीत म्हणाला. त्यावेळी दिल्लीच्या अरुण जेटली क्रीडांगणावर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भाईचुंग भुतिया आणि जय शहोसुद्धा, मेस्सीसह मंचावर उपस्थित होते. दिल्लीतील तासभराच्या कार्यक्रमात मेस्सीने स्टेडियमला फेरी मारून, चाहत्यांना अभिवादन केले. लहान मुलांसह फुटबॉल खेळण्याचा आनंदही त्याने लुटला.
 
मेस्सी-केरळ भेट : या भारतभेटीच्या नियोजनानुसार, आधी केरळमध्ये मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फुटबॉल सामना खेळवला जाणार होता. तथापि, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना अर्थात ‘फिफा’ची मान्यता मिळण्यास विलंब झाल्याने, नोव्हेंबरमध्ये कोची येथे होणारा हा मैत्रीपूर्ण सामना रद्द झाला. या सामन्यासाठी अर्जेंटिना फुटबॉल संघटनेच्या प्रतिनिधींनी, कोचीच्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमची पाहणीही केली होती. केरळ सरकार आणि त्यांच्या खासगी भागीदारांनी यापूर्वी स्वतःच्या अर्जेंटिना दौर्‍यासाठी भव्य योजना जाहीर केल्या होत्या, ज्यामध्ये दि. १७ नोव्हेंबर रोजी एक मैत्रीपूर्ण सामना, चाहत्यांची परेड आणि मेस्सी आणि त्याच्या सहकार्‍यांसह सार्वजनिक संवादाचा समावेश होता.
 
कोचीचा तो सामना होणार असे गृहीत धरून, प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन होणार्‍या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्चही करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अधिकृत आयोजक, रिपोर्टर ब्रॉडकास्टिंग कंपनी, नूतनीकरणाचा खर्च भागवण्याची जबाबदारीही ज्याला-त्याला देण्यातही आली होती. स्टेडियमच्या नूतनीकरणात आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणे, तसेच व्हीव्हीआयपी लाऊंज, हॉस्पिटॅलिटी बॉक्स आणि वाढीव गर्दीची क्षमता, तसेच प्रेक्षकांसाठी सुलभ प्रवेश आणि निर्गमन सुनिश्चित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. केरळ मुख्यमंत्री कार्यालय आणि विशेष नियोजन समित्यांच्या समन्वयाने, नूतनीकरणाचे हे काम सुरूही झाले होते. मेस्सीच्या आगमनामुळे उत्साह अनेक पटीने वाढण्याची अपेक्षा होती पण, केरळचे मेस्सीप्रेमी मात्र सामाना रद्द झाल्याने नाखूश होते. लाखोवारी केलेला खर्च आता कसा सत्कारणी लावता येईल, हा त्यांच्या समोरचा यक्ष प्रश्न होता.
 
मेस्सी-केरळ क्रीडामंत्री भेट : मेस्सीच्या भेटीचे आयोजन करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून, केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी, सप्टेंबर २०२४मधील स्पेनच्या अधिकृत दौर्‍यावर १३ लाख रुपये खर्च मेस्सीला आमंत्रित करण्यासाठी केल्याची चर्चा केरळमधील क्रीडावर्तुळात गाजली होती. मंत्र्यांच्या त्या दौर्‍याच्या आधी सांगण्यात येत होते की, या आमंत्रणामुळे राज्याला एक रुपयाचाही खर्च येणार नाही. मंत्री, क्रीडा विभागाचे सचिव आणि क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक असे सारे स्पेनला गेले. त्यानंतर अर्जेंटिनाचा केरळमध्ये प्रदर्शनीय सामना खेळण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी, त्यांनी आयोजकांची भेट घेतली. सुरुवातीला यावर्षीच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मेस्सीच्या केरळ भेटीचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. या नियोजनानुसार अर्जेंटिना संघाला केरळ राज्याचे पाहुणे म्हणून सन्मान दिला जाणार होता. तथापि, ऑक्टोबरमध्ये अर्जेंटिना संघाला आलेल्या प्रवासाच्या अडचणींमुळे,हा कार्यक्रम रद्द झाला. प्रायोजक हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपलब्ध असलेला अवधी, अत्यंत स्वल्प असल्याचे सांगत होते.
 
केरळमध्ये अर्जेंटिनाची लोकप्रियता प्रचंड आहे, विशेषतः मलप्पुरम आणि कोझिकोड या फुटबॉलप्रेमी जिल्ह्यांमध्ये. या ठिकाणी मेस्सीच्या संघाने २०२२च्या ‘फिफा विश्वचषक’ जिंकल्यानंतर, चाहत्यांनी प्रचंड जल्लोषही केला होता. स्वतः मलप्पुरमचे अब्दुरहिमान यांनी, मेस्सीला राज्यात आणण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली होती. अब्दुरहिमान यांच्या स्पेन दौर्‍यातील बेसुमार खर्चावरही, विरोधी पक्षांनी आवाज उठवला होता. सरकार करदात्यांच्या पैशाचा वापर राजकीय प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप, विरोधक सरकारवर करत होते. मेस्सीची ती केरळभेट नंतर अधिकृतपणे रद्द झाल्यामुळे, अनायासेच केरळ सरकार समोरचे सार्वजनिक निधीच्या वापराबद्दलचे अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न टळले होते.
 
गरज अभिनव विचारांची...
 
‘लिओनेल इंडिया टूर...’चा समारोप करताना मला असे वाटते की, आपणही अभिनव विचार करायला शिकले पाहिजे. ‘ऑलिम्पिक सुवर्णपदक’ विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचे एक परखड मत, समाजमाध्यमांतून प्रसिद्ध होताना दिसत होते. अभिनव बिंद्राने त्यात मेस्सीच्या भारत दौर्‍यावरून, भारतीय क्रीडा-संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिंद्राला मेस्सीच्या चाहत्यांसाठी करोडो रुपये खर्च करणे पटलेले नसून, यातून भारतीय खेळाडूंना काय मिळाले? असा सवाल त्याने केला उपस्थित केला आहे. बिंद्राच्या मते, या पैशांचा विनियोग देशाच्या क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व्हायला हवा होता. बिंद्राने मेस्सीच्या भारत दौर्‍यावरील प्रचंड खर्च आणि सेलिब्रिटीपूजन यावर नाराजी व्यक्त केली आहे. बिंद्रा म्हणतो की, ”आपण काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत? यातून भारतीय खेळाडूंच्या विकासाला गती मिळू शकली असती.” बिंद्रा म्हणाला की, "मेस्सीसारख्या महान खेळाडूची प्रशंसा करणे स्वाभाविकच आहे पण, आपण आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. सेलिब्रिटींच्या मागे धावण्याऐवजी, देशातील खेळांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरेल.” थोडयात, बिंद्राच्या मते; मेस्सीसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा आदर करणे महत्त्वाचे असले, तरी त्याच्या दौर्‍यासाठी होणारा प्रचंड खर्च हा भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी वापरला जावा. मला खात्री आहे की, माझ्या जोडीने तुमच्यासारख्या क्रीडाप्रेमींचीही अशीच अभिनव भूमिका असेल.
 
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
 
 
Powered By Sangraha 9.0