दख्खनच्या पठारावरील अनमोल ठेवा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात पसरलेला माणदेश हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही, तर तो पश्चिम महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराचा एक अत्यंत अनमोल आणि वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. येथील संवर्धनात्मक प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...
एक हजार, ४५१.१९ चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण पट्ट्यात पसरलेला माणदेशाचा भूभाग आपल्या उघड्या माळरानांसाठी आणि दुष्काळी परिस्थितीसाठी ओळखला जातो. परंतु, वरकरणी रूक्ष वाटणार्या या भूभागाच्या पोटात एक समृद्ध आणि संवेदनशील जीवसृष्टी दडलेली आहे. नुकतेच महाराष्ट्र वन विभागाने आटपाडी तालुक्यातील ‘आटपाडी-दबईकुरण संवर्धन’ राखीव क्षेत्र घोषित करून या परिसराच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे माणदेशातील जैवविविधतेच्या संवर्धनाच्या चळवळीला नवे बळ मिळाले असून, आता माण आणि खटाव तालुक्यातील उर्वरित महत्त्वपूर्ण अधिवासांकडे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.
भौगोलिक रचना आणि हवामान
माणदेशाचे नावच येथील वैशिष्ट्यपूर्ण जमिनीच्या थरावरून पडले आहे; ज्या भागात ‘माण’ प्रकारची जमीन सापडते, तो माणदेश होय. भौगोलिकदृष्ट्या हा प्रदेश अत्यंत विलोभनीय आहे. याच्या पश्चिम आणि उत्तर दिशेला संरक्षकासारख्या उभ्या असलेल्या उंच डोंगररांगा आहेत. उत्तरेकडील डोंगररांगेत शंभू महादेवाचे प्रसिद्ध ‘शिखर शिंगणापूर’ वसलेले आहे. त्यापलीकडे नजर टाकल्यास सुमारे चार हजार फूट खोल दरीत नीरा नदीचे खोरे आणि सलग ५० ते ६० मैल लांब पसरलेला प्रदेश डोळ्यांचे पारणे फेडतो. तर दुसरीकडे, पूर्वेला भीमा नदीचे खोरे आणि दक्षिणेला येरळा नदीचे खोरे अशा नैसर्गिक सीमांनी हा प्रदेश बांधलेला आहे. येथील हवामान हे मानवी आणि निसर्गाच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारे असते. उन्हाळ्यात तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते आणि माळराने आगीसारखी तापतात. याउलट, हिवाळ्यात तापमान १० ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान अवघे ४७३ मिमी असल्याने, येथे पाण्याचे दुर्भिक्ष पाचवीला पुजलेले असते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही येथील ‘गवताळ कुरणे’ (Grasslands) आणि काटेरी झुडपांच्या जंगलात (Thorn Forest) निसर्गाचा अद्भुत खेळसुरू असतो. ही माळराने निर्जीव नसून ती अनेक दुर्मीळ जीवांचे हक्काचे घर आहेत.
लोकसहभाग आणि यशाची दिशा
या सर्व पार्श्वभूमीवर माणदेशातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागातूनच या प्रदेशाचे दीर्घकाळ चालणारे संवर्धन शक्य होऊ शकते. अलीकडच्या काळात माणदेशातील ग्रामपंचायती, स्थानिक युवक, जैवविविधता व्यवस्थापन समित्या आणि वन्यजीव अभ्यासकांनी एकत्र येऊन महत्त्वपूर्ण काम केले आहे. माझे स्वतःचे आदर्शगाव किरकसाल हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. येथे माझ्या मार्गदर्शनाखाली काही स्थानिक युवकांनी २०२०पासून नियमितपणे पक्षीनिरीक्षण करणे, ट्रॅप कॅमेर्यांच्या मदतीने वन्यजीवांचा अभ्यास करणे, स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचे दस्तऐवजीकरण करणे, लोकसहभागातून जनजागृती करणे आणि गावपातळीवरील निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये योगदान दिले आहे. विशेषतः WWF India च्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पातून स्थानिकांना या माळरानांचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
आव्हाने
दुर्दैवाने, आजही शासन दरबारी आणि सामान्य लोकांच्या मनात झाडे नाहीत म्हणजे जंगल नाही, अशी चुकीची संकल्पना आहे. त्यामुळे गवताळ प्रदेशांना ’waste land’ किंवा ‘पडीक जमीन’ मानले जाते. याच मानसिकतेतून माणदेशातील ‘खुली नैसर्गिक परिसंस्था’ (open natural ecosystems- ONES) धोक्यात आली आहे. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक गरजांमुळे माणदेशात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढते मानवी अतिक्रमण, खाणकामासाठी स्टोनक्रशर्सचा धुरळा आणि माळरानांवर उभे राहणारे सौरऊर्जा प्रकल्प यामुळे वन्यजीवांचे अधिवास तुकड्यांमध्ये विभागले (Fragmented) जात आहेत. लांडगा, जो लांबपल्ल्याचा प्रवास करतो, त्याच्या मार्गात हे अडथळे मृत्यूचे सापळे बनत आहेत. याव्यतिरिक्त वारंवार येणार्या दुष्काळाच्या तीव्रतेमुळे काही ठिकाणी स्थानिक लोकांनी उपजीविकेसाठी शिकारीचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे भारतीय लांडगा, पट्टेरी तरस आणि इतर वन्यजीवांना आवश्यक असलेली खुली माळरान जागा झपाट्याने कमी होत चालली आहे, ही गंभीर चिंतेची बाब आहे.
बिबट्या आणि तरस: गैरसमज आणि सत्य
सध्याच्या काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये (उदा. जुन्नर, नाशिक, अहमदनगर) उसाच्या शेतीत राहणार्या बिबट्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सुदैवाने, माणदेशातील दुष्काळी पट्ट्यात, विशेषतः माण आणि खटाव तालुक्यांत अद्याप बिबट्याचा (Leopard) वावर किंवा त्याचे स्थैर्य दिसून आलेले नाही, ही या भागासाठी एक जमेची बाजू आहे. मात्र, येथे एक वेगळीच समस्या पाहायला मिळते, ती म्हणजे अज्ञान आणि भीती. माणदेशात ‘पट्टेरी तरस’ (Striped Hyena) आढळतो. अनेकदा रात्रीच्या वेळी शेतात पाणी देताना किंवा गाडीवरून जाताना शेतकर्यांना तरस दिसतो. त्याच्या अंगावर पट्टे असल्याने अनेक स्थानिक लोक त्याला चुकून बिबट्या समजतात आणि भीतीने गांगरून जातात. या भीतीपोटी अनेकदा निरुपद्रवी तरसाला हुसकावून लावले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्यांना बिबट्या आणि तरस यांच्यातील फरक शास्त्रीयदृष्ट्या समजावून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणदेशात सध्यातरी केवळ तरसांचे अस्तित्व असल्याने शेतकर्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट, माझ्या शेतातील मेलेली जनावरे फुकटात साफ करणारा निसर्गमित्र म्हणून शेतकर्यांनी तरसाचे रक्षण केले पाहिजे. तरीही, वाढती उसाची शेती भविष्यात बिबट्या येण्याचे संकेत देत असल्याने ही जनजागृती सध्याच्या संवर्धन मोहिमेचा अविभाज्य भाग आहे.
माणदेशातील समृद्ध जैवविविधता
माणदेशाला खर्या अर्थाने वन्यजीवांचे आश्रयस्थान म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
१. भारतीय लांडगा (Indian Wolf): या माळरानांचा खरा राजा म्हणजे भारतीय लांडगा (canis lupus pallipes). संपूर्ण भारतात लांडग्यांची संख्या वेगाने घटत असताना आणि ते नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, माणदेशात मात्र हे चित्र आशादायक आहे. वळई, शेणवडी, वडजल, पर्यंती, म्हसवड, नरवणे आणि किरकसाल या परिसरात लांडग्यांची संख्या तुलनेने चांगली आहे. लांडगा हा केवळ एक प्राणी नसून तो या गवताळ परिसंस्थेचा सर्वोच्च शिकारी (pex predator) आहे, जो अन्नसाखळी संतुलित ठेवतो.
२. पक्षी-संपदा : येथे २४५पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. यामध्ये शिकारी पक्ष्यांचे (raptors) महत्त्व विशेष आहे. भारतीय गरुड (Indian spotted eagle), लाल मानेचा ससाणा (red-necked falcon), आणि विविध प्रकारची गिधाडे येथे आढळतात. याशिवाय, पट्टेरी तरस (striped hyena), खोकड (Indian fox), कोल्हा (golden jackal), आणि रानमांजर (jungle cat) हे सस्तन प्राणी येथे गुण्यागोविंदाने नांदतात.
३. वनस्पती : या परिसरात २००हून अधिक वनस्पती प्रजातींची नोंद झाली आहे. निंब, खैर, दुरंगी बाभूळ, करवंद यांसारख्या स्थानिक प्रजातींसोबतच ‘सिरोपिजिया’ (ceropegia) सारखी दुर्मीळ कंदील पुष्पे आणि अनेक औषधी वनस्पती या रूक्ष मातीतही बहरतात.
पक्षीगणनेचे महत्त्व
माणदेश केवळ गवताळ प्रदेशच नाही, तर येथील विस्तीर्ण तलाव आणि जलाशये (wetlands) हिवाळ्यात परदेशी पाहुण्यांनी गजबजून जातात. युरोप, रशिया, सायबेरिया आणि मंगोलियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी येथे येतात. या जैवविविधतेची नोंद घेण्यासाठी माण-खटाव परिसरात ‘एशियन वॉटरबर्ड सेन्सस-२०२५’ची सुरुवात झाली आहे. वन्यजीव अभ्यासक चिन्मय प्रकाश सावंत आणि डॉ. प्रवीण शिवलिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माण आणि खटाव तालुक्यांतील २५ प्रमुख ठिकाणांवर हे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये किरकसाल-नळी, येरळवाडी, पिंगळी, अंधळी धरण, राजेवाडी आणि मायणी यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात रड्डी शेलडक, बार-हेडेड गूज, नॉर्दर्न शोव्हलर, पेंटेड स्टॉर्क आणि विविध प्रकारचे बदक आढळले आहेत. तसेच, माळरानावर मंगोलियन लार्क, विविध प्रकारचे हॅरियर्स आणि गरुड यांच्या नोंदी ’eBird’ वर केल्या जात आहे. या माहितीचा उपयोग भविष्यात पाणथळ जागांचे आरोग्य तपासण्यासाठी आणि संवर्धनाचे धोरण ठरवण्यासाठी केला जाणार आहे.
सांस्कृतिक महत्त्व
माणदेशातील निसर्ग केवळ जैविकदृष्ट्याच महत्त्वाचा नाही, तर त्याचे सांस्कृतिक महत्त्वही खूप मोठे आहे. इथली पारंपरिक शेती पद्धती, मेंढपाळ व्यवसाय, माणदेशी गजी लोककला आणि विविध सण-उत्सव हे सर्व घटक निसर्गाशी घट्टपणे जोडलेले आहेत. म्हणूनच, या भागाला OECM'(Other effective area-based conservation measures) किंवा BHS (Biodiversity heritage sites) म्हणून घोषित करणे ही आता काळाची गरज आहे. सध्या सुरू असलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, माण आणि खटाव तालुक्यांचा सीमावर्ती भाग हा जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ आहे. त्यामुळे आता केवळ अभ्यासावर न थांबता, कायदेशीर संरक्षणाची गरज आहे. माण-खटाव तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील किरकसाल, काळेवाडी, डांभेवाडी, दोरगेवाडी, बोंबाळे, तडवळे आणि पिंगळी खुर्द या गावांमधील सलग असलेल्या राखीव वन क्षेत्राला अधिकृत संवर्धनाचा दर्जा (conservation status) द्यावा. या मागणीला वैज्ञानिक आधार देण्यासाठी या क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या WWF india - किरकसाल संवर्धन प्रकल्पाअंतर्गत करण्यात आलेल्या तीन वर्षांच्या सखोल जैवविविधता संशोधनाचा एक संक्षिप्त अहवाल पुढच्या महिन्यात प्रकाशित करण्यात येत आहे. हा अहवाल या क्षेत्राचे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व शासनासमोर मांडण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा ठरेल.
शेवटी, माणदेशातील ही काटेरी झुडपे आणि पिवळेधमक गवत केवळ निसर्गाचे सौंदर्य नाही, तर ते एका सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या परिसंस्थेचे कवच आहे. येथील लांडगा, तरस आणि गरुड हे आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. जर आपण त्यांना ‘पडीक’ म्हणून दुर्लक्षित केले, तर आपण एक नैसर्गिक वारसा गमावून बसू. गरज आहे ती केवळ कायद्याची नाही, तर लोकसहभागाची. शेतकर्यांनी तरसाला शत्रू न मानता मित्र मानण्याची, आणि शासनाने या माळरानांना जंगलाइतकाच मान देण्याची. माणदेशाचा हा अनमोल ठेवा जपण्यासाठी उचललेले हे छोटे पाऊल भविष्यात एका मोठ्या क्रांतीची नांदी ठरेल, यात शंका नाही.
-चिन्मय सावंत
(लेखक किरकसाल संवर्धन प्रकल्पात वन्यजीव अभ्यासक व समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.)