२५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी.स्टूडियो येथे कार्निव्हलचे आयोजन

22 Dec 2025 14:18:40

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्गत एन. डी. आर्ट आर्ट वर्ड लिमिटेड येथे शुक्रवारी पत्रकार, टूर ऑपरेटर यांची भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी या संपूर्ण स्टुडीओची सफर घडवण्यात आली. प्रसिद्ध एन डी. स्टुडीओचे निर्माते आणि कलेच्या क्षेत्रात अभिमानास्पद काम करणारे कलाकार म्हणजेच नितीन देसाई. याच एनडी स्टुडीओची जबाबदारी सध्या महाराष्ट्र शासनाकडे सोपवण्यात आलेली आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक तथा एन.डी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल जोगळेकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे , उप अभियंता ( स्थापत्य) विजय बापट, एन.डी.चे प्रशासकीय अधिकारी सचिन निबाळकर श्रीकांत देसाई उपस्थित होते. यावेळी २५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी.स्टूडियो येथे होणाऱ्या कार्निव्हलच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील म्हणाल्या, नितीन देसाई हे आधुनिक विश्वकर्मा होते, त्यांनी केलेल्या कार्याची आपल्याला सदैव आठवण राहील. एन.डी स्टुडिओचे परिचलन आता गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून केले जात असून या स्टुडिओचे संकेतस्थळ आणि बुकिंग ॲप सुरू केले आहे. आगामी काळात विविध सोई-सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

यावेळी प्रास्ताविक करताना मीनल जोगळेकर म्हणाल्या, भव्यता काय असते हे नितीन देसाई या मराठी माणसाने दाखवून दिले. त्यांचे शासनाशी ऋणानुबंध होते, असे सांगत नितीन देसाई यांच्या आठवणी त्यांनी जागवल्या.

भव्य एन.डी.कार्निव्हलचे आयोजन

दिनांक २५ ते ३१ डिसेंबर २०२५ रोजी, एन.डी. कर्जत येथे सकाळी १० ते ५ यावेळेत कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये खेळ, मनोरंजनासह सेलिब्रेटीसोबत गप्पाचा कार्यक्रम नियमितपणे होणार आहे.

पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ १४९९ रुपये कार्निव्हल तिकीट असून त्यामध्ये जेवण आणि नाश्त्याचा समावेश आहे.
२५ आणि त्यापेक्षा जास्त बुकिंग एकाच वेळी केले तर १३९९ रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आहे. www.ndartworld या संकेतस्थलावर ऑनलाईन तिकिट उपलब्ध आहे.

Powered By Sangraha 9.0