बीजा मंडल, विदिशा अज्ञात, अद्भुत वारसा

21 Dec 2025 14:33:09
Bija Mandal
 
मध्य भारताच्या हृदयस्थानी वसलेले विदिशा हे शहर प्राचीन इतिहास, पुरातत्त्व आणि सांस्कृतिक वैभवाने समृद्ध आहे. नर्मदा नदीच्या वरच्या बाजूला वसलेला हा भाग प्राचीन काळात ‘भिलसा’ म्हणून ओळखला जात असे आणि हे भारताच्या विविध राजवंशांचे एक महत्त्वाचे केंद्र होते. भारतातून सोन्याचा धूर निघत होता, त्या गुप्त राजांनी राज्य केलेला हा समृद्ध भूभाग. विदिशा परिसरात असलेले भग्नावशेष, स्तंभ आणि पुरातात्त्विक अवशेष आजही आपल्या प्राचीनतेच्या गूढतेची साक्ष देतात. आज आपण फेरफटका मारणार आहोत, इथल्या एका भव्य; पण भग्न मंदिरात. बीजा मंडल मंदिराचे अवशेष आणि जवळच स्थित हेलिओडोरस स्तंभ; ज्या दोघांमध्ये प्राचीन भारतीय धर्म, कला, आणि सामाजिक समन्वयाची एक अद्भुत कथा दडलेली आहे.
 
बीजा मंडल हे ११व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा १२व्या शतकाच्या प्रारंभी परमार राजवंशाच्या काळात बांधलेले एक अत्यंत भव्य हिंदू मंदिर होते. त्याचा अर्थ ‘बीजमंडल’ असा घेतला जातो आणि हे प्राचीन काळात विदिशा शहराच्या पूर्वेच्या भागात वसले होते. या मंदिराचे अधिष्ठान किंवा पाया हाच मुळी १०-१२ फुटांचा आहे, ज्यावर मंदिर उभारण्यात आले होते. तीन बाजूंनी पायर्‍या असलेली ही संरचना आणि अनेक कलात्मक पट्ट्यांनी सजलेला हा अधिष्ठानाचा भाग आजही त्याच्या भव्यतेचा अंश सांगतो. हे उंच अधिष्ठान, त्यावर ‘मंडोवर’ म्हणजे बाह्य भिंत आणि त्यावर अतिभव्य शिखर अशी या मंदिराची रचना असेल. विचार करूनच थक्क व्हायला होतं की, हे मंदिर पूर्ण असेल त्यावेळी किती सुंदर दिसत असेल.
 
भारतातल्या सर्व मंदिरांप्रमाणे, बीजा मंडल मंदिराचा इतिहासही संघर्षांनी भरलेला आहे. अनेक मध्ययुगीन आक्रमकांनी - पहिले शहंशाही सुलतान इलतुमिश, नंतर अलाउद्दीन खिलजी, गुजरातचा बहादूरशहा वगैरे सुलतानांनी मंदिरावर आक्रमण करून ते भग्न केले. पण, सर्वाधिक धक्कादायक आणि भयंकर नुकसान १६८२मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात झालं, ज्याने मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करून तिथे एक मशीद बांधली आणि तिला ‘आलमगिरी मशीद’ असे नाव दिले. या मशिदीच्या बांधकामासाठी मंदिराचे स्तंभ, अर्धस्तंभ आणि शिल्पांचा वापर झाला. अनेक स्तंभांवर आजही परमार काळाचे नक्षीकाम आणि संस्कृत शिलालेख स्पष्ट दिसतात, ज्यातून मंदिराच्या मूळ धर्मपरंपरेचा इतिहास वाचता येतो. १९९१ मध्ये मशिदीची एक भिंत कोसळल्यानंतर ३०० वर्षांपासून गाडलेल्या हिंदू मूर्ती उघडकीस आल्या, ज्यामुळे हे हिंदू मंदिर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) १९७२-१९७४ मध्ये केलेल्या उत्खननात, उत्तर दिशेच्या प्लॅटफॉर्मखाली (जिथे नमाज पठण केले जात असे) महिषासुरमर्दिनी आणि गणेशाच्या मूर्ती सापडल्या होत्या.
 
पुरातत्त्वज्ञांच्या मते, हे मंदिर भूमीज (नागर मंदिर शैलीमधील एक उपप्रकार, मुंबईमधील अंबरनाथ शिव मंदिर या प्रकारचे आहे.) शैलीत बांधले गेले होते. त्या भागात त्याकाळी राज्य करणार्‍या परमार राजांनी अशा पद्धतीच्या अनेक मंदिरांची निर्मिती केली. या मंदिराचे शिखर तारकाकृती आकाराचे असून, चार लतांमध्ये (Offsets) विभागलेले होते आणि प्रत्येक लतेवर लघुशिखराच्या पाच पंक्ती होत्या. हे मंदिर उत्तर भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक होते आणि त्याच्या भव्यतेची तुलना ओडिशामधील कोणार्क मंदिराशी केली जाते. या रचनेतील काही स्तंभांवर नरवर्मन (१०९३-११३४) या राजाचे संस्कृत शिलालेख सापडले आहेत, ज्यात देवी चाचिका (चामुंडा) आणि शिवाच्या स्तोत्राचे वर्णन आहे. या मंदिराचा आकार खजुराहो येथील सर्वात मोठ्या कंदारिया महादेवाच्या मंदिरापेक्षाही मोठा आहे.
 
आज बीजा मंडलचे अवशेष केवळ भग्नप्रेत नाहीत, तर भारतीय शिल्पकलेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक संघर्षाचा एक जीवित दस्तऐवज आहेत. तिथे पसरलेल्या कचर्‍यातील विटांचे तुकडे, अनवट पायाभूत अवशेष, कोरवलेले पॅनेल, तोरणे, विविध मूर्तींचे तुकडे हे सर्व ऐतिहासिक सांगाडे आहेत. इथे अनेक सुंदर शिल्पं आहेत, त्यात महिषासुरमर्दिनी, अष्टभुजा गणेश, नृत्यरत सप्तमातृका, शिव-पार्वती आणि नंदी, गजलक्ष्मी, नारायण-लक्ष्मी अशा देवतांचे भव्य चित्रण आहे. यातल्या काहींचा परिचय आपण करून घेऊयात.
 
उमामहेश्वर
 
शिव आणि पार्वती इथे एकत्र दिसतात. दुर्दैवाने या शिल्पाचे अतोनात नुकसान झालेले आहे. चेहरे, हात, पाय, या गोष्टी फोडलेल्या आहेत. स्त्री-मूर्तीच्या पायाशी असणारा सिंह, पुरुष-मूर्तीच्या पायाशी असणारा नंदी आणि शेजारी असणारा शिवाचा साधक भृंगी यावरून या मूर्तीचा परिचय होतो. दोघांच्याही अंगावर अतिशय सुंदर आभूषणे आहेत. वस्त्रांवर नाजूक कोरीवकाम केलेले दिसते. आपल्या मांडीवर बसलेल्या पार्वतीला प्रेमाने शिवाने धरलेले आहे. आक्रमकांनी मूर्ती भग्न केल्या. पण, त्यातले सौंदर्य आणि भावना नष्ट करू शकले नाहीत.
 
कृष्ण आणि पुतना
 
मुख्य मंदिराच्या जवळच एक बारव आहे. तिथे स्तंभांवर कृष्णलीला कोरलेल्या आहेत. यात एक महत्त्वाची कथा आहे. बाळकृष्णाला मारण्याच्या हेतूने पुतना असुर दासीच्या रूपात आली आणि कृष्णाला स्तनपान देण्यासाठी कुशीत घेतले. कृष्णाला लक्षात आल्यावर आपल्या सामर्थ्याने त्याने त्या राक्षशीणीचा अंत केला, अशी ही कथा आहे. पण, हे शिल्पं फार बोलके आहे. आई आणि खोटी दासी यातला फरक इथे ठळक दाखवला आहे. मातृत्वाचे सर्वात पवित्र, महत्त्वाचे काम म्हणजे स्तनपान, ते करताना आई बाळाला कुशीत घेते, जवळ घेते. पण, ते न करता, इथे त्या स्त्रीचे दोन्ही हात वर आहेत, म्हणजे ती आई नाही. यातली मूर्ती आणि अनेक अवशेष आज भारतीय पुरातत्त्व विभागाद्वारा संरक्षित आहेत आणि जवळच्या संग्रहालयांत ठेवण्यात आले आहेत. ही सांस्कृतिक संपदा इतिहासप्रेमींना, विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अनेक प्राचीन प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत करते. इथल्या भल्यामोठ्या कमानी, स्तंभशीर्ष, कीर्तिमुख या गोष्टीदेखील आकर्षक आहेत.
 
बीजा मंडल मंदिराचे भग्नावशेष हे फक्त पुरातत्त्वाशी मर्यादित नाहीत, हे आपल्या सांस्कृतिक आत्म्याशी जोडलेले आहेत. प्राचीन काळातील लोकांची श्रद्धा, कलाकारांचा निपुणतायुक्त हात आणि विविध राजवंशांच्या उत्थान-पतनाच्या इतिहासाची कविता, याची एकत्रित कहाणी हे अवशेष आजही सांगतात. या अवशेषांमध्ये प्राचीन देवीपूजा, शैव-शक्ती संस्कार, परकीय प्रभाव, ग्रीक-भारतीय सांस्कृतिक संवाद यांचे संकेत आहेत, ज्यातून भारताच्या महान विविधतेचा संपूर्ण वृत्तांत समोर येतो.
 
इथून जवळच असणार्‍या वासुदेव मंदिर, हेलिओडोरस खांब, उदयगिरी लेणी या जागासुद्धा इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. भीमबेटका, भोजपूर, भोपाळ आणि वर उल्लेख केलेल्या जागा, असा एकत्रित प्रवास तुम्हाला करता येईल. सर्व ठिकाणी राहण्याची-जेवण्याची व्यवस्था आहे. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत हा भाग फिरण्यासाठी छान असतो. पावसाळ्यातदेखील याचे सौंदर्य खुलून दिसते. पण, आपल्या फिरण्यावर मर्यादा येऊ शकतात. पण, सर्वांनी आवर्जून बघावा असा हा प्रदेश आहे. कदाचित, म्हणूनच मध्य प्रदेशला ‘देश की धडकन’ म्हणत असावेत.
 
- इंद्रनील बंकापुरे
 
 
Powered By Sangraha 9.0