शिल्पसाधनेचा सूर्यास्त...

21 Dec 2025 14:36:35

शिल्पसाधनेचा सूर्यास्त...
 
धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या राम सुतार यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं. शिल्पकलेच्या साधनेतून जगविख्यात शिल्पं तर घडवलीच. मात्र, त्याचबरोबर आपल्या कार्यातून त्यांनी या शिल्पांना भारतीय ज्ञानपरंपरेचा स्पर्शसुद्धा दिला. त्यांच्या सहवासात जी माणसं आली, त्यांच्या जीवनातदेखील आमूलाग्र बदल घडले. प्रख्यात शिल्पकार विवेक खटावकर यांनासुद्धा सुतार यांचा सहवास लाभला. मागील ४० वर्षांहून अधिक काळ शिल्पकलेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या विवेक खटावकर यांनी अमेरिका, जपान आदी देशांमध्ये शिल्पं उभारली आहेत. शिल्पकार राम सुतार यांच्या सहवासातील आठवणींचा विवेक खटावकर यांनी उलगडलेला हा पट...
काही माणसं आपल्यातून निघून जातात, तेव्हा केवळ ती व्यक्तीच आपल्याला सोडून जाते असे नाही, तर त्या व्यक्तीने आपल्या कार्यकर्तृत्वाने जो अवकाश निर्माण केलेला असतो, त्या अवकाशातदेखील पोकळी निर्माण होते.
राम सुतार गेले, याचा अर्थ भारतीय शिल्पकलेतील एका अध्यायाचा सूर्यास्त झाला. त्यांच्या निधनाने अर्थातच कला क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. राम सुतार आणि माझ्या वडिलांचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं होतं. जेव्हा-जेव्हा रामजी पुण्याला यायचे, तेव्हा-तेव्हा ते आमच्या घरी येत असत. इथे मला एक आठवण सांगितल्याशिवाय राहवत नाही.
एकदा माझ्या स्टुडिओमध्ये मी एक शिल्प करत होतो, त्यावेळी रामजी उपस्थित होते. माझं काम बघताना त्यांनी मला विचारलं की, "यावर मी एकदा करेशन करू का?” त्याक्षणी मला जे वाटलं, ते मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्यासारख्या एका छोट्या शिल्पकाराला इतया महान शिल्पकाराने काही सूचना करणं, ही खूप मोठी गोष्ट होती.
 
रामजी सुतारांच्या शिल्पकलेबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्या शिल्पकलेतील भव्यता, अचूकता, शिस्त आणि त्याचबरोबर त्यांची सामाजिक जबाबदारी आदी गोष्टी प्रत्येक कलाकाराने आत्मसात कराव्यात अशाच होत्या. त्यांनी छन्नी आणि हातोड्याला हात लावला की, त्यांच्या हातून असाधारण शिल्प रूप घेत असे. मध्यंतरी, मी ज्यावेळेला त्यांच्या दिल्लीच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो, त्यावेळी वयाच्या ९२व्या वर्षीसुद्धा हा तपस्वी काम करत होता. त्यावेळेला महात्मा गांधींच्या एका पुतळ्यावर ते काम करत होते. तोदेखील असा पुतळा, ज्याच्या चेहर्‍याची उंची आठ फूट होती. रामजी स्वत: स्टुलावर उभं राहून काम करत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या वयातसुद्धा त्यांचे हात कुठेही थरथरत नव्हते. ते दृश्य बघताना मी थक्कच झालो. त्यावेळी त्यांचे साहाय्यक ‘मी येतो आहे’ असे सांगण्यासाठी पुढे सरसावले. इतयात, मी त्याला शांत राहण्यासाठी खुणावले. आपल्या कामामध्ये तल्लीन असणार्‍या या कलाकाराला थांबवणे मला चुकीचे वाटले. त्यानंतर जवळपास पुढची १५ ते २० मिनिटे ते काम करण्यात दंग होते. जणू त्यांचा भवताल केवळ त्यांच्या शिल्पानेच व्यापला होता.
 
खरंतर, कुठलंही शिल्प ज्यावेळेस आकाराला येत असतं, त्यावेळेला त्या शिल्पाची प्रमाणबद्धता खूप महत्त्वाची असते. राम सुतारांच्या प्रत्येक शिल्पामध्ये ती प्रमाणबद्धता आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच त्यांची शिल्पं आपल्याला जिवंत वाटतात. आपणसुद्धा अशाच पद्धतीचं एखादं जिवंत शिल्प साकारावं, असा विचार आमच्या सारखे शिल्पकार कायम करत असतात. दिल्लीमध्ये महात्मा जोतिबा फुले यांचा एक पुतळा उभारायचा होता. त्याअनुषंगाने रामजी पुण्याला आले. त्यांनी त्यासाठी बर्‍याच लोकांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मला महात्मा फुलेंचा ‘गेटअप’ करायला सांगितला होता. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या अँगलने फोटोग्राफी करून घेतली. त्यावरून त्यांनी एक छोटेखानी प्रतिकृती साकारली होती. यातून कलाकार म्हणून आम्ही असा बोध घेतला की, कुठलंही शिल्प साकारताना ते किती वास्तवदर्शी होईल, याचा विचार आपल्याला इतका खोलात जाऊन करावा लागतो. पुण्यामध्ये त्यांनी भोसरीजवळ छत्रपती संभाजी महाराजांचं जे भव्य शिल्प साकारलं आहे, ते वारंवार जाऊन बघावं असंच आहे. एखादी भव्य कलाकृती कशी उभी केली जाते, त्याला किती श्रम लागतात, याची आपल्याला त्यातून प्रचिती येते. त्यांच्या स्टुडिओमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची छोटी-छोटी ‘मिनीएचर मॉडेल्स’ होती. एखादं मोठं शिल्प तयार करायचं असेल, तर त्यासाठी आधी त्याची छोटी प्रतिकृती तयार करावी लागते. इथे कलाकाराचा खरा कस लागतो. कारण, त्यातूनच तो मोठं शिल्प साकारू शकतो. राम सुतारांनी या छोट्या-छोट्या शिल्पांवर अत्यंत कलाकुसरीने काम केलं.
 
मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आपल्याकडे पुण्याजवळच्या लोणी येथे ‘एमआयटी’मध्ये जो मोठा डोम तयार केलेला आहे, त्या डोममध्ये अनेक संतांची व शास्त्रज्ञांची शिल्पं उभारली आहेत. राम सुतारांच्या हस्ते ही शिल्पं ज्यावेळेला जन्माला येत होती, त्यावेळी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. एखाद्या वस्तूची गुणवत्ता तेव्हाच टिकते, ज्यावेळेला त्या कामांमध्ये काही एक प्रमाणात तांत्रिक शिस्त असते. ही तांत्रिक शिस्त आत्मसात करण्याचा प्रयत्न आम्ही सुतारांकडून केला.
 
शिल्पं उभं करायचं, म्हणजे एक तपश्चर्याच असते. ही तपश्चर्या करताना अनेकविध कसोटीतून कलाकाराला काम करावं लागतं. या कसोटीतूनच शिल्पकार आणि त्याचं शिल्प सातत्याने घडत जातं. व्यक्तिगत पातळीवर जितका काळ माझ्यासारख्या कलाकारांना त्यांचा सहवास लाभला, त्यातून आम्ही कायमच नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा स्वभाव अत्यंत मृदू होता, नम्र होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जे अनुभव आले, ते अनुभव ते लोकांपर्यंत सच्चेपणाने पोहोचवत असत. अशाप्रकारच्या अनुभूती ज्यावेळेला आपल्याला घडवत जाते, त्यावेळेला ती व्यक्ती आपल्यातून गेल्याचे दुःख अधिकच गहिरे होते. शिल्पकलेच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक नामवंत, कीर्तिवंत कलाकार होऊन गेले. मात्र, राम सुतार यांनी आपल्या कार्यातून मराठीपणाचा जो एक आगळावेगळा ठसा उमटवला होता, तो खर्‍या अर्थाने वाखाणण्याजोगा आहे. त्याचबरोबर, त्यातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
 
राम सुतारांच्या हातांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य असा पुतळा नर्मदेच्या काठी उभा केला. ते काम ज्यावेळी सुरू होतं, त्यावेळेला मी प्रत्यक्ष त्यांना भेटलो. सरदारांचा चेहरा तेव्हा आकाराला येत होता. आजसुद्धा तिथल्या वस्तुसंग्रहालयामध्ये त्या चेहर्‍याची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. ते काम बघत असताना सातत्याने एकच गोष्ट जाणवली की, एखाद्या माणसाची आपल्या कामावरची निष्ठा किती सत्त्वशील असावी. त्या चेहर्‍याचे बारकावे टिपताना, त्यांनी यत्किंचितही भाव बदलू दिले नाहीत.
शिल्प साकारताना ते शिल्प केवळ वास्तवदर्शी किंवा वास्तववादी न साकारता, भारतीय पारंपरिक शैलीतलं जे काम आहे, ते कामसुद्धा आपल्याला त्यांच्या शिल्पांमध्ये बघायला मिळतं. त्यांनी साकारलेल्या मूर्तीमध्ये अक्षरश: प्राण फुंकले. शिल्पाला एक आत्मा असतो, याची प्रचिती त्यांच्या कामामधून सातत्याने अधोरेखित होते. त्यांच्या परंपरेचा हा वारसा पुढे अनिल सुतार चालवत आहेत.
 
राम सुतार यांच्या जाण्यामुळे निश्चितच एक पोकळी निर्माण झाली आहे. धुळ्यातील एका छोट्याशा गावातून एक माणूस शिल्पकलेच्या क्षेत्रामध्ये पाय रोवतो आणि दिल्लीसारख्या ठिकाणी एक स्वतंत्र स्टुडिओ उभारतो; आपल्या कामातून आपल्या मातीचा, लोकजीवनाचा विचार सगळीकडे पोहोचवतो; ही बाब माझ्यासारख्या अनेक शिल्पकारांना, कलाकारांना कायमच प्रेरणादायी ठरणारी. राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 
- विवेक खटावकर
Powered By Sangraha 9.0