संघसाधनेचा योजक महर्षि

21 Dec 2025 12:00:38

Moropant Pingale
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असताना, संघाच्या विचारधारेसाठी आणि कार्यासाठी आयुष्य वेचलेल्या प्रचारकांच्या ओळखी आपण त्यांच्या चरित्रग्रंथांच्या माध्यमातून करून घेत आहोत. या सर्वांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे मोरोपंत पिंगळे. रवींद्र गोळे लिखित आणि ‘विवेक प्रकाशन’प्रकाशित ‘योजक संघमहर्षी’ हे पुस्तक म्हणजे माननीय मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आणि अभ्यासपूर्ण आलेख आहे. त्या पुस्तकाचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
देशाच्या विविध भागांत संघकार्याचा विस्तार, कार्यकर्त्यांची जडणघडण, वैचारिक अधिष्ठान मजबूत करणे, तसेच समाजजीवनाशी संघकार्याची सांगड घालणे, या सर्व बाबींमध्ये मोरोपंतांचे योगदान मोलाचे आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे अतिशय समर्पक शब्दांत लिहितात, "मोरोपंत पिंगळे हे महर्षी आहेत; पण ते अध्यात्मातील महर्षी नसून संघकार्यातील महर्षी आहेत. संघकार्य ही म्हटली तर आध्यात्मिक साधना आहे; पण ती व्यक्तिगत पातळीवर राहात नाही, तर ही संघसाधना आहे. मोरोपंत या साधनेतील योजक होते!” या विधानातून मोरोपंतांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या कार्यपद्धतीची आणि संघकार्याविषयीच्या दृष्टीची गहिरी जाणीव होते.
 
जबलपूर येथे ‘डेप्युटी कॅनॉल कलेक्टर’ म्हणून काम करणार्‍या निळकंठ पिंगळे यांच्या घरी दि. ३० ऑटोबर १९१९ रोजी जन्माला आलेल्या पुत्ररत्नाचे नाव मोरेश्वर ठेवले गेले. मोरेश्वरला घरामध्ये ‘मोरू’ या नावाने संबोधले जाऊ लागले. १९२५च्या सुमारास पिंगळे कुटुंब धंतोलीत स्थायिक झाले. याचवर्षी विजयादशमीच्या दिवशी नागपूरमध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार या युगद्रष्ट्या पुरुषाने ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाच्या संकल्पाला प्रत्यक्ष रूप दिले. यातून अनेक ठिकाणी संघशाखा सुरू झाल्या.
 
मोरू आपल्या ज्येष्ठ बंधू गुणाकर याच्यासोबत शाखेत जात असे. डॉ. हेडगेवार धंतोलीत आले की, शाखेतील बाल त्यांच्याभोवती जमत, त्यांच्यात मोरू अग्रेसर असे. काहीही झाले, तरी शाखा चुकवायची नाही, हा जणू मोरूचा जीवनमार्गच झाला होता. पण, केवळ एक तासाची शाखा म्हणजे संघ नव्हे, हे त्याला उमगले होते. एक तासाची शाखा म्हणजे ऊर्जाकेंद्र, तेथे ऊर्जा घ्यावी आणि त्या ऊर्जेतून आसपासचा परिसर उजळून टाकावा, ही संघरीत त्याला बालवयातच उमगली. पुढे स्वतः संघ शिक्षक झाल्यावर संघात विभूतिपूजेला स्थान नाही, याची शिकवण मोरू सतत देत असे. मोठा झाल्यावर पदवी परीक्षेचा निकाल लागताच मोरू संघशिक्षावर्गाला निघाला आणि या वर्गानंतर संघ सांगेल तेथे प्रचारक म्हणून जाण्याचा त्याने निश्चय केला. पुण्याला निघताना आई-वडिलांच्या पाया पडून मोरू म्हणाला, "तुम्हाला तीन मुले आहेत, त्यातील फक्त एकच बाहेर जात आहे. उरलेली दोन तुमच्याजवळ राहणार आहेत. ते तुमची सर्वतोपरि काळजी घेतील, याची मला खात्री आहे. तेव्हा तुम्ही मला प्रेमाने निरोप द्या.” जाज्वल्य ध्येयनिष्ठेची शिदोरी घेऊन धंतोली गावातला हा स्वयंसेवक संघ प्रचारक बनून पुण्याला पोहोचला आणि तिथे तो ‘मोरोपंत’ म्हणून ओळखला जाऊ लागला तो कायमचाच!
 
रवींद्र गोळे यांनी या ग्रंथात मोरोपंतांची स्थितप्रज्ञता दर्शविणारे अनेक दाखले दिले आहेत. त्यांपैकी एक असा - १९४६च्या प्रारंभी मोरोपंत महाराष्ट्रात म्हणजे मुंबई प्रांतात सहप्रांतप्रचारक म्हणून आले. एकदा शारीरिक शिक्षण विभागाच्या व्यवस्थेची बैठक मोरोपंत घेत होते. बैठक चालू असताना मोरोपंतांच्या नावाने तार आली. ती त्यांनी स्वीकारली, वाचली आणि तो कागद घडी घालून तसाच खिशात ठेवला. बैठकीत नेहमीप्रमाणे हास्यविनोद चालू होते. संध्याकाळी शाखा भरली, खेळही झाले, उपस्थित स्वयंसेवकांसोबत भोजनदेखील झाले. मोरोपंत या सर्व बैठकीत सहभागी होते. दुपारी आलेली तार ही त्यांच्या बंधूंच्या निधनाची वार्ता सांगणारी होती; पण मोरोपंतांनी हे दुःख दाखवले नाही. स्थितप्रज्ञ राहून कोणत्याही सुखदुःखात मोरोपंत गुंतले नाहीत.
पुढे गांधीहत्येचे निमित्त करून तत्कालीन सरकारने संघावर बंदी घातली.
 
श्रीगुरुजींना अटक झाली. संघाने या अन्यायकारक बंदीविरुद्ध सत्याग्रह पुकारला आणि स्वयंसेवक स्वतःला अटक करून घेऊ लागले. पुण्यात दररोज काही स्वयंसेवक स्वतःहून पोलिसांना सूचना देत, सायंकाळी कोठे शाखा लावणार, याची माहिती देत. सायंकाळी स्वयंसेवक निश्चित केलेल्या जागी एकत्र येत त्याचबरोबर पोलीसदेखील त्या ठिकाणी हजर असत. ध्वजप्रणाम व प्रार्थना झाली की घोषणा दिली जाई, ‘भारतमाता की जय!’ पोलीस स्वयंसेवकांना पकडायला पुढे येत व सर्व स्वयंसेवक कोणताही प्रतिकार न करता पोलिसांच्या गाडीत जाऊन बसत. अटक केलेल्या स्वयंसेवकांना तीन महिने कारावासाची शिक्षा होई. मोरोपंत या काळात पायाला भिंगरी लावून प्रवास करीत होते. स्वतः सत्याग्रह न करता, सत्याग्रह यशस्वी करण्यावर त्यांचा भर होता.
 
त्यासाठी ते कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते होते, त्यांच्या भेटी घेऊन सत्याग्रहाची योजना करीत होते. अशा घटनांमधून लेखक ‘योजक’ मोरोपंत आपल्यासमोर उभे करतात. पुढे संघावरची बंदी बिनशर्त उठवली गेली. संघबंदीच्या काळात पुण्यातील स्वयंसेवकांनी गुरुदक्षिणेची रक्कम ज्या बँकेत ठेवली होती, ती रक्कम कलेक्टरने जप्त केली. संघबंदी उठल्यावरही ही रक्कम पुन्हा मिळाली नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मोरोपंतांनी दत्तोपंत जमदग्नी यांच्या साथीने संघाची स्वतंत्र बँक चालू करण्याचे ठरवले आणि सर्व नियोजन करून ती बँक चालू केलीदेखील. ती बँक म्हणजेच ‘जनता सहकारी बँक!’ केवळ मोरोपंतांच्या भक्कम आधारामुळे कोणत्याही पूर्वानुभवाशिवाय संघ स्वयंसेवकांनी हा खटाटोप सुरू केला आणि प्रत्यक्षात उतरवला. या पुस्तकातून मोरोपंतांचे नेतृत्वगुण असे आपल्यासमोर येतात.
 
पुस्तकामध्ये ‘आणीबाणी पर्व’ या प्रकरणात आणीबाणीच्या काळात स्वयंसेवकांनी दिलेल्या लढ्याचे सविस्तर वर्णन केले आहे. संघाच्या सर्व प्रचारकांप्रमाणेच मोरोपंतदेखील या काळात भूमिगत राहून कार्यरत होते. पोलिसांच्या हाती न लागण्याकरिता मोरोपंतांनी नेहमीचा धोतर-सदरा हा पोशाख त्यागला होता आणि पॅन्ट-शर्ट परिधान केले होते. भारदस्त मिशांनादेखील कात्री लावली होती. पोलिसांनी जंगजंग पछाडूनही मोरोपंत त्यांच्या हाती लागले नाहीत. आणीबाणीला विरोध करू इच्छिणार्‍या सर्वांचा, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, मोरोपंतांनी उपयोग करून घेतला आणि आंदोलनाची ज्वाला तेवत ठेवली.
 
रामजन्मभूमी आंदोलन हे मोरोपंतांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्वच म्हणावे लागेल. हे देशव्यापी आंदोलन उभे राहण्यामागे मोरोपंतांची कल्पकता, योजकता आणि नियोजनाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ‘विश्व हिंदू परिषदे’ची स्थापना, रथयात्रांचे नियोजन, त्यासाठी लागणार्‍या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणे, या सर्व कामात मोरोपंत हिरिरीने पुढे असत. १९८४ मध्ये ‘राम-जानकी रथयात्रे’ची घोषणा झाली, यामागे मोरोपंतांचे चिंतन उभे होते, ज्याचा दीर्घकाळ उपयोग ‘विश्व हिंदू परिषदे’च्या कार्यविस्तारासाठी झाला. रामजन्मभूमीमुक्ती हे जीवनध्येय साध्य करण्यासाठी आपल्या प्रकृतीची काळजी न करता, मोरोपंत स्वतःला झोकून देत होते. त्यांनी प्रस्तावित राम मंदिराचे स्थूलचित्रही तयार करून घेतले होते. ‘श्रीराम मंदिर असे असेल,’ असा विश्वास यामुळे सर्वसामान्यांच्या मनात उत्पन्न झाला. रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाची सुरुवात ते दि. ६ डिसेंबर रोजी कारसेवेदरम्यान ढासळलेला बाबरीचा ढाँचा ही सर्व कथा सदर पुस्तकात लेखकाने अगदी विस्तृतपणे सांगितली आहे.
 
मोरोपंतांजवळ कायमच काही ना काही योजना तयार असत. त्यामुळे रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनानंतर काय, असा प्रश्न त्यांना पडला नाही. मरगळ आलेल्या इतिहास संशोधनकार्याला नवचैतन्य देण्याचा त्यांनी चंग बांधला. आपला इतिहास आतापण स्वतः अभ्यास करून शोधावा आणि त्याचे पुनर्लेखन करावे. इंग्रजांनी जी भारतीय इतिहासात भेसळ केली आहे, ती दूर करून पुन्हा नव्याने आपला देदीप्यमान इतिहास नव्या पिढीपुढे ठेवावा, असे त्यांचे म्हणणे होते. यातूनच शोध सुरू झाला, इतिहासात लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा. त्यासाठी साहजिकच मोरोपंतांनी योग्य आणि कार्य तडीस नेणारे कार्यकर्ते शोधले आणि प्रकल्प पूर्णत्वास नेला. उत्तरआयुष्यात मोरोपंतांनी गोरक्षा, गोविज्ञान हे विषय हाती घेतले. त्याद्वारे देवळापार येथे गोविज्ञान अनुसंसाधन संस्था उभी राहिली. अनेक छोट्या-मोठ्या शेतकर्‍यांनी गोआधारित शेतीची कास धरली. मोरोपंत अखेरपर्यंत संघविचार, संघकार्य यांच्यात गुंतले होते.
 
संघकार्याच्या प्रत्येक टप्प्यावर निष्ठा, त्याग आणि विचारांची स्पष्टता जपत मोरोपंतांनी आयुष्यभर अविरत कार्य केले. गेल्या १०० वर्षांच्या संघाच्या कार्यकाळात असंख्य प्रचारक होऊन गेले; परंतु प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे किंवा अपेक्षित चर्चांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे असे अनेक संघ प्रचारक काहीसे अंधारातच राहिले. मात्र, यामुळे त्यांच्या कार्याची उंची किंवा समाजावर पडलेला प्रभाव कधीही कमी झाला नाही. पद-प्रतिष्ठेची अपेक्षा न बाळगता त्यांनी संघविचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. रवींद्र गोळे यांनी मोरोपंतांचे हे विस्तृत, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी चरित्र आपल्यासमोर आणले, याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण, अशा कर्तृत्ववान, पण दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनकार्य नव्या पिढीसमोर येणे ही काळाची गरजच आहे.
 
पुस्तकाचे नाव : योजक संघमहर्षी
 
लेखक : रवींद्र गोळे
 
प्रकाशक : विवेक प्रकाशन
 
पृष्ठसंख्या : २५६
 
मूल्य : ५०० रु
 
- ओंकार जोशी
 
 
Powered By Sangraha 9.0