कोणतेही पद नसताना नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या सोनाली विनोद कांबळे यांनी शताब्दी नगरमधील नागरिकांना हक्काची घरे मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका आणि व्हिजन जाणून घेण्यासाठी मुंबई तरूण भारत प्रतिनिधी वृंदा लासे यांनी साधलेला संवाद.
राजकारणात यावं असं तुम्हाला का वाटलं? तुम्ही राजकारणात आल्याने तुमच्या विभागासाठी कोणते बदल घडवू इच्छिता?
राजकारणात येण्याची प्रेरणा मला माझे पती विनोदजी कांबळे यांच्याकडून मिळाली. ते गेल्या १० ते १२ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय निष्ठेने काम करत आहेत. ते आधी भाजपा युवा मोर्चा विधानसभा महामंत्री, त्यांनंतर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा धारावी विधानसभा अध्यक्ष होते. आता द. मध्य. मुंबई जिल्हा कार्यकरणी सदस्य म्हणून जबाबदारी पाहत आहेत. विभागासाठी कोणते बदल घडवून आणायचे याबद्दल बोलायचे झालेच तर, मी एक पदवीधर शिक्षिका असून लहानपणापासूनच इथे १८३ वार्डामध्ये राहत आहे, त्यामुळे इथल्या समस्यांशी मी चांगलीच परिचित आहे. या प्रभागातल्या पाणी आणि शौचालयाच्या समस्या फारच मोठ्या आहेत. रात्री १२ नंतर शौचालये बंद होतात, अशा परिस्थितीत महिलांनी कुठे जायचे. या सर्व समस्यांवर आम्ही काम करत आहोत. मात्र, जर पक्षाने मला संधी दिली, तर आणखी खोलवर जाऊन या सर्व समस्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.
तुम्हाला उमेदवारी मिळावी अशी तुमची इच्छा आहे. मात्र, पक्षाने ही जबाबदारी तुम्हाला का द्यावी, असे तुम्हाला वाटतं?
कोणतेही पद नसतानाही आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे शताब्दी नगरमधील नागरिकांचा प्रश्न. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत २०१६ मध्ये सेक्टर पाच मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी नगरमध्ये ५२४ घरांचा सर्वेक्षण करण्यात आले होते. पात्र झोपडीधारकांना पीएमजीपी कॉलनीतील शताब्दी टॉवरमध्ये स्थलांतरित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, घरे तयार असूनही गेल्या ५ ते ६ वर्षांपासून त्यांचे स्थलांतर करण्यात आले नव्हते. ही सर्व कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होती. यासाठी माझे पती विनोदजी कांबळे यांनी डीआरपी कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला. सहकार्यांच्या मदतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न अखेर मार्गी लावला. अखेर या वर्षी त्या सर्व कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली. त्यामुळे, अधिकृतपणे जबाबदारी दिल्यास समाजासाठी अधिक तत्परतेने आणि प्रभावीपणे काम करता येईल.
गेल्या काही वर्षांपासून आपण ग्राऊंडवर उतरुन जनसंपर्क वाढवत आहात, तर लोकांचा अनुभव कसा आहे?
गेल्या काही वर्षांपासून तळागाळात सामाजिक कार्य करत असताना नागरिकांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता नागरिक स्वतःहून सध्या समाजाला पदवीधर, सुशिक्षित आणि संवेदनशील उमेदवारांची गरज तर “ताई, तुम्ही निवडणुकीला उभ्या राहा,” अशी मागणी करतात. त्यामुळे एकूणच नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे.
तुमच्या प्रभागातील तुम्ही किंवा विनोद कांबळे यांच्या माध्यमातून केलेलं सर्वात मोठं काम काय आहे?
आम्ही आजपर्यंत प्रभागातील नागरिकांसाठी विविध स्तरांवर सातत्याने काम केले आहे. काही मुलांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींमुळे शाळेत प्रवेश मिळत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक भार न पडता शाळेत प्रवेश मिळवून दिले. तसेच या भागात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर असून, अनेक घरांमध्ये नळ कनेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, आमच्या माध्यमातून झालेलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत शताब्दी नगरमधील नागरिकांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देणं.
शेवटचा प्रश्न मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता?
मतदारांना मी एवढंच आवाहन करते की, निष्ठावंत, प्रामाणिक, इमानदार आणि सुशिक्षित उमेदवार हवा असेल, तर त्यांनी मला नक्कीच संधी द्यावी.